बँकॉक
म्यानमारमधील राखाईन राज्यामध्ये एका बाजारपेठेजवळ लष्कराने केलेल्या भीषण हवाई हल्ल्यात किमान ४९ जण ठार झाले असून ५८ जण जखमी झाले आहेत. बंडखोरांच्या नियंत्रणाखाली असलेल्या भागात सोमवारी हा हल्ला झाल्याची माहिती बंडखोर गट आणि मदत पथकाने दिली आहे.
म्यानमारमध्ये फेब्रुवारी २०२१ मधील लष्करी राजवटीच्या विरोधात सुरू असलेल्या संघर्षादरम्यान ही अत्यंत घटना घडली आहे. राखाईन राज्यातील क्याउकताव (Kyauktaw) शहरात हा हल्ला झाला. 'अराकान आर्मी' या शक्तिशाली वांशिक सशस्त्र गटाच्या नियंत्रणाखाली हा परिसर येतो. स्थानिक वेळेनुसार दुपारी एका स्थानिक बाजारपेठेजवळ फायटर जेटने दोन बॉम्ब टाकले, ज्यामध्ये विक्रेते, खरेदीदार आणि पादचाऱ्यांचा मृत्यू झाला.
हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या ५८ जणांपैकी २२ जणांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. राखाईन भागातील वरिष्ठ मदत अधिकारी वाई हुन आंग यांनी या जीवितहानीस दुजोरा दिला आहे. या हल्ल्याला लवकरच प्रभावी प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा अराकान आर्मीने दिला आहे. म्यानमारच्या लष्कराने यावर तात्काळ कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, लष्कराकडून केवळ कायदेशीर लष्करी लक्ष्यांवरच हल्ले केले जात असल्याचा दावा यापूर्वी करण्यात आला आहे.