मीर अल्ताफ
सध्या अल्गोरिदम बहुतकरून समाजात फूट पाडण्याचं आणि गुस्सा वाढवण्याचं काम करणाऱ्या कंटेंटला बढावा देतं. पण खरं म्हणजे अशा परिस्थितीत भारतीय मुस्लिमांना एक मोठा मौका आहे एक अशी सार्वजनिक तहजीब घडवण्याचा जी अधिक आत्मविश्वासू आणि विधायक असेल.
काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. काश्मीरमधल्या विद्यार्थ्यांबरोबर अनौपचारिक चर्चा सुरू होती. तेव्हा एका शिक्षकाने एक अतिशय सोपा प्रश्न विचारला. आजच्या काळात तुमची ओळख बहुतांशवेळा कशाच्या आधारे ठरवली जाते?
प्रश्न चांगला होता. या प्रश्नाच्या जवाबातून एका संपूर्ण पिढीची गुंतागुंत समोर आली. काहींनी मजहबचा जिक्र केला. काहींनी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, राजकीय कंटेंट, कोरियन मौसिकी, ऑनलाइन वाद किंवा जागतिक लोकप्रिय संस्कृतींची नावं घेतली. एका विद्यार्थ्याने मात्र शांतपणे एक गोष्ट सांगितली. स्वतःच्या तहजीबबाहेरील लोकांबद्दलची त्याची बहुतांश समज आता शॉर्ट व्हिडिओ आणि ऑनलाइन कमेंट्समधूनच तयार होते, असं तो म्हणाला.
हा जवाब मौजुदा हकीकतवर प्रकाश टाकणारा आहे. लोक आज डिजिटल माध्यमांवरून एकमेकांशी पूर्वीपेक्षा कितीतरी जास्त जोडलेले आहेत हे सत्य आहे. पण त्याच वेळी ते भावनिक आणि सामाजिक स्तरावर एकमेकांपासून दुरावत आहेत, हेही खरं आहे.
२१ मे रोजी जगभरात 'सांस्कृतिक विविधता, संवाद आणि विकासाचा जागतिक दिवस' साजरा केला जातो. या निमित्ताने विविधतेवरील चर्चेत अधिक सखोलपणे काम करण्याची जरुरत आहे. आज समाजासमोर तहजीबी फर्क जपण्याचं आव्हान आहे. शिवाय या सर्व भेदांच्या पलीकडे जाऊन एकमेकांशी अर्थपूर्ण संवाद साधण्याची मानवी क्षमता जिवंत ठेवण्याचंही मोठं आव्हान आहे.
तंत्रज्ञानाने सामाजिक संवादाचं स्वरूप पूर्णपणे बदलून टाकलं आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची रचनाच लोकांचं जास्तीत जास्त लक्ष्य वेधून घेण्यासाठी करण्यात आली आहे. तिथे समजुतीपेक्षा गुस्सा वेगाने पसरतो. जज्बाती, भडकवणाऱ्या स्टोरीजसमोर अगदी विचारपूर्वक केलेल्या चर्चा बऱ्याचदा टिकत नाहीत. वेगवेगळे समाज इमानदारीने एकमेकांना भेटत नाहीत. उलट पूर्वग्रह, सोयीस्करपणे निवडलेल्या व्हिडिओ क्लिप्स आणि अल्गोरिदमने ठरवलेल्या नजरियातून एकमेकांकडे पाहतात.
हा बदल जगभरातील समाजांना एक नवीन आकार देतोय. अनेक लोकशाही देशांमध्ये सियासी ओळख ही आता कितीतरी जज्बाती आणि केवळ दिखाव्याची गोष्ट बनलीय. सार्वजनिक स्तरावरच्या संवादामध्ये आता सखोल विचारांऐवजी नुसत्या उथळ प्रतिक्रिया पाहायला मिळतात. कारण डिजिटल अर्थव्यवस्थेत गुस्सा व्यक्त केल्यानेच माणसाला शोहरत मिळते. अल्गोरिदम सखोल विचारांऐवजी ठामपणाला बढावा देतं. गुंतागुंतीपेक्षा चिथावणीखोरपणाला प्रोत्साहन देतं.
मुळात भारताला भरपूर विविधता लाभलेली आहे. त्यामुळे भारतासमोर आता हे मोठंच आव्हान उभं राहिलेलं आहे. भारतात शतकानुशतकं विविध समाज, जुबान, रिवायत आणि मजहब यांच्यामधल्या सततच्या देवाणघेवाणीतून एक सामाजिक तानाबाना तयार झाला आहे. इथली विविधता पुस्तकी किंवा तात्विक राहिलेली नाही. ती आपल्या वस्त्या, शैक्षणिक संस्था, बाजारपेठा, शायरी, खाद्यसंस्कृती आणि सामाईक समाजस्थळ अशा सर्व ठिकाणी मौजूद होती. भारतीय बहुलवाद कशाने टिकला? तो फक्त फर्क मिटल्याने टिकला नाही तर रोजच्या जिंदगीत लोकांनी एकत्र राहण्याला प्रोत्साहन दिलं, म्हणून तो टिकून राहिला.
पण आता डिजिटल युगात या सर्व समाजांचं एकमेकांशी असलेलं नातं बदलत आहे. टीव्हीवरच्या चर्चा बघा. त्या बऱ्याचदा संवादापेक्षा टकरावला बढावा देतात. सोशल मीडियावर सुद्धा सखोल विचारांऐवजी तात्काळ फैसले सुनावण्याला उत्तेजन दिलं जातं. आजचे नौजवान मोठ्या प्रमाणावर मालूमात मिळवत आहेत. पण सामाजिक आणि खयाली सरहद्दी ओलांडून होणारी अर्थपूर्ण चर्चा मात्र दुर्मिळ होत चालली आहे. ऑनलाइन विश्वात सतत संवाद साधणारी पिढी सामाजिकदृष्ट्या आणि कल्पनेच्या पातळीवर मात्र एकमेकांपासून वेगळी राहू शकते, हे आपण पाहतो आहोत.
ही हकीकत भारतीय मुस्लिमांसाठीही महत्त्वाचा सबक आहे. सध्या डिजिटल व्यवस्था आपल्याला एका चौकटीत कैद करते आहे. प्रतिक्रिया देणं, बचावात्मक पवित्रा घेणं आणि ओळखीवर आधारित एकाकीपणाच्या आहारी जाणं यात समाज अडकतो आहे. अशा वेळी भारतीय मुस्लिमांनी एक अतिशय महत्त्वाची इल्मी निवड करण्याची वेळ आली आहे. केवळ सततच्या शिकायती, ऑनलाइन व्यक्त केलेला गुस्सा किंवा बंदिस्त सामाजिक चौकटीत माघार घेऊन भविष्याची उभारणी करता येणार नाही. व्यापक नागरी सहभागापासून दूर जाऊन आपल्याला टिकून राहता येणार नाही.
भारतीय इस्लामची ऐतिहासिक विरासत काही नेहमीच एकाकी राहिलेली नाही. उलट ती संवादाची आणि शिरकतची राहिलेली आहे. अलिगढच्या इल्मी रिवायतींपासून ते उपखंडातील सुफी संतांच्या रुहानी आणि तहजीबी प्रभावापर्यंत हेच दिसतं. शिवाय भारतीय मुस्लिमांनी जुबान, मौसिकी, अदब, वास्तुकला, तालीम आणि सार्वजनिक अखलाकमध्येही मोठं योगदान दिलेलं आहे. उर्दू शायरी ही कधीच एका बिरादरी पुरती मर्यादित राहिलेली नाही. ती सर्वसमावेशक समाजाच्या सर्वांत शक्तिशाली अभिव्यक्तींपैकी एक बनली. भारताची खाद्य आणि कलात्मक परंपरादेखील अनेक शतकांच्या तहजीबी देवाणघेवाणीतूनच विकसित झाली. ती कधीही कठोर एकाकीपणातून निर्माण झाली नाही.
हा ऐतिहासिक तजुर्बा आजच्या काळात महत्त्वाचा आहे. सहिष्णुतेची पुनर्बांधणी करण्याच्या प्रवासात भारतीय मुस्लिम आज एका अद्वितीय आणि योग्य वळणावर आहे. कारण त्यांच्या जगण्यात एकाच वेळी अनेक ओळखींचा ताळमेळ साधलेला पाहायला मिळतो. यात मजहबी, भाषिक, प्रादेशिक आणि राष्ट्रीय ओळखींचा समावेश आहे. भारतातील मुस्लिमांच्या सामजिक तजुर्ब्यात एक समज आधीपासूनच दडलेली आहे. एकत्र राहणे ही काही कमजोरी नाहीय, तर ती एक परिपक्वता आहे, हे त्यांना पक्कं माहिती आहे.
पण ही विरासत जपण्यासाठी बौद्धिक आत्मविश्वासाची नितांत जरुरत आहे. डिजिटल विश्वात सतत मग्न असलेल्या या पिढीने आपली ओळख केवळ प्रतिक्रियेपुरती मर्यादित ठेवणं टाळलं पाहिजे. ऑनलाइन जगात केवळ प्रतीकात्मक अस्तित्व दाखवून भरवसा निर्माण होणार नाही. त्यासाठी संस्थांची उभारणी, तहकीक, उद्योग, नागरी शिरकत आणि अखलाकी नेतृत्वातूनच हा आत्मविश्वास उदयास येईल. त्यामुळे आता असुरक्षिततेविषयी बोलण्यातून बाहेर पडून योगदानाच्या भाषेवर लक्ष केंद्रित करण्याची जरुरत आहे.
हा बदल विशेष महत्त्वाचा आहे. कारण डिजिटल चर्चा अनेकदा समाजाला भावनिक थकव्याच्या चक्रात अडकवतात. त्यामुळे एकतर सतत गुस्सा निर्माण होतो किंवा माणूस स्वतःला लोकांपासून दूर ठेवतो. या दोन्ही गोष्टी शाश्वत सामाजिक भरवसा निर्माण करू शकत नाहीत. समाज शैक्षणिक संस्था बांधतो, तहकीक करतो, सार्वजनिक जिंदगीत भाग घेतो आणि केवळ प्रतिक्रिया न देता स्वतःच्या योगदानातून राष्ट्रीय चर्चांना दिशा देतो. तेव्हाच तो खऱ्या अर्थाने अधिक मजबूत होतो.
संपूर्ण भारतात या शांत परिवर्तनाची उदाहरणं आधीपासूनच पाहायला मिळतात. मुस्लीम महिलांमध्ये शिक्षणाचं वाढतं प्रमाण, कारोबार उभारणारे तरुण उद्योजक, नागरी सेवा आणि तालीम क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणारे विद्यार्थी, आंतरधर्मीय सामाजिक उपक्रम आणि स्थानिक तहजीबी सहयोग यांसारख्या गोष्टी सहसा बातम्यांच्या मथळ्यांमध्ये झळकत नाहीत. पण त्या सामाजिक भरवशाचं अतिशय महत्त्वाचं स्वरूप आहेत.
भारतीय मुस्लिमांच्या एका नौजवान पिढीचा उदय ही तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे. ही पिढी स्वतःच्या शर्तींवर तंत्रज्ञान, मीडिया आणि उद्योजकतेत उतरत आहे. स्वतंत्र पत्रकारिता आणि डिजिटल प्लॅटफॉर्मपासून ते सामाजिक उपक्रम आणि तखलीकी कलांपर्यंत अनेक तरुण मुस्लिम आता तन्हाईऐवजी शिरकतचा रस्ता निवडत आहेत. हा बदल सकारात्मक आहे. कारण त्यातून निरोगी सार्वजनिक तहजीबची शक्यता निर्माण होते.
तखलीकी क्षेत्रातही मुस्लिम कंटेंट क्रिएटर्स, स्टँड-अप कॉमेडियन, चित्रपट निर्माते, पॉडकास्टर्स, मौसिकीकार आणि लेखक आता मुख्य प्रवाहातील डिजिटल जागा व्यापत आहेत. ते स्वतःला केवळ स्वतःच्या मजहबी ओळखीपुरते मर्यादित ठेवत नाहीत. झाकीर खानसारखे कलाकार आणि झोया अख्तर, रीमा कागती यांसारख्या चित्रपट निर्मात्यांची मशहूरियत एका नव्या पिढीचं प्रतिनिधित्व करते. ही पिढी खयाली तन्हाईऐवजी मजाक, किस्सेगोई, सिनेमा, मौसिकी आणि मिश्र सांस्कृतिक तजुर्ब्यातून एका व्यापक प्रेक्षक वर्गाशी जोडण्याची कोशिश करत आहे.
इथे शैक्षणिक संस्थांची भूमिका महत्त्वाची ठरते. शाळा, विद्यापीठे, मदरसे आणि सामाजिक संस्थांनी नौजवानांना नोकरीसाठी तयार करण्याबरोबरच सहिष्णुतेसाठीही तयार केलं पाहिजे. नफरत न करता असहमती दर्शवणं, खौफशिवाय शिरकत करणं आणि दुश्मनीशिवाय स्वतःची ओळख जपणं ही अत्यंत महत्त्वाची नागरी कौशल्यं आहेत. समाजाला ती जाणीवपूर्वक जोपासावी लागतील.
याच कारणासाठी सामाईक तहजीबी जागांचं जतन करणं जरुरी आहे. अदबी जलसे, विद्यापीठं, शेजाऱ्यापाजाऱ्यांशी होणाऱ्या गप्पा, खेळ, स्थानिक सामाजिक उपक्रम किंवा सामाजिक सरहद्दी ओलांडून लोकांना आकर्षित करणारे सुफी दर्गे या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. याच प्रत्यक्ष गुफ्तगूतूनच सहिष्णुता टिकून राहते. समाज एकमेकांकडे माणूस म्हणून बघेनासा झाला, एकमेकांकडे केवळ खयाली प्रतिमा म्हणून पाहू लागला की सहिष्णुता कमजोर होते.
भारतातील विविधतेचं भविष्य फक्त घटनात्मक तत्त्वांवर किंवा सरकारी संस्थांवर अवलंबून नाहीये. आवाम स्वतःला अल्गोरिदमच्या नफरतीचं कैदी होण्यापासून कसं वाचवते, यावरही ते अवलंबून असेल.
मीडियाने फक्त गुस्सा वाढवण्याऐवजी सखोल विचार आणि बारकाव्यांना बढावा दिला पाहिजे. शैक्षणिक संस्थांनी चिकित्सक विचार आणि गुफ्तगूची तहजीब रुजवली पाहिजे. सार्वजनिक गुफ्तगूमध्ये माणसाला कमी न लेखता असहमतीसाठी जागा असायला हवी. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, समाजाने स्वतः माघार घेण्याऐवजी गुफ्तगूत शिरकत करण्याचा मार्ग शोधून काढला पाहिजे.
भारतीय मुस्लिमांसाठी हा काळ आव्हानात्मक आहे. तसाच हा एक मौकाही आहे. केवळ प्रतिक्रिया आणि संशय यात न अडकता इज्जत, शिरकत आणि सहिष्णुतेवर आधारित लोकशाही समाज घडवण्यासाठी हा एक उत्तम मौका आहे.
आच्या युगात समाजाला संतुलन, सबर आणि संवादाचं रक्षण करू शकणाऱ्या गटांची नितांत जरुरत आहे.
ही जिम्मेदारी सर्वांचीच आहे. पण एकत्र राहण्याचा मोठा ऐतिहासिक तजुर्बा असलेल्या समाजांना याची कदर अधिक चांगल्या प्रकारे असते. ही सहिष्णुता नष्ट होऊ लागते, तेव्हा त्याचं मूल्य सर्वाधिक जाणवतं. आणि शेवटी भारताच्या बहुलवादी लोकशाहीच्या भविष्यामध्ये भारतीय मुस्लिम हेच योगदान देऊ शकतात.
(लेखक हे काश्मीरमधील शिक्षणतज्ज्ञ आहेत.)
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter