उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यातून एक अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. या घटनेने समाजासमोर एक मोठा प्रश्न उभा केला आहे. त्याचबरोबर आशेचा एक किरणही दाखवला आहे. नॅशनल हायवेवर मृत्यूचं तांडव सुरू होतं. तिथे एक कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती. यावेळी बघ्यांची गर्दी मोबाईलवर व्हिडिओ बनवण्यात मग्न होती. तेव्हा तिथेच जवळच्या मदरशामधले तीन शिक्षक धावून आले आणि स्वतःच्या जीवाची बाजी लावत त्यांनी पेटत्या गाडीतून सहा जणांना सुखरूप बाहेर काढलं. धर्म आणि भीती यापलीकडे जाऊन केवळ 'माणुसकी'ला आपला धर्म मानणारीच ही घटना आहे.
मृत्यूचं तांडव आणि बघ्यांची गर्दी
सोमवारचा दिवस होता. बहराइच-लखनौ नॅशनल हायवेवर फखरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रुकनापूर बाजाराजवळ वाहनांची नेहमीप्रमाणे वर्दळ सुरू होती. अचानक एका जोरदार स्फोटाने परिसर हादरून गेला. बहराइचवरून लखनौच्या दिशेने जाणारी अर्टिगा कार आणि समोरून येणारी ह्युंदाई कार यांची समोरासमोर भीषण धडक झाली. ही धडक इतकी भयंकर होती, त्यात दोन्ही गाड्यांचा अक्षरशः चक्काचूर झाला.
अपघातानंतर काही क्षणांतच ह्युंदाई कारच्या बोनेटमधून काळाकुट्ट धूर येऊ लागला. पाहता पाहता कारने पेट घेतला. गाडीत जखमी प्रवासी अडकले होते. ते मदतीसाठी टाहो फोडत होते. हायवेवर गाड्यांच्या रांगा लागल्या आणि शेकडो लोक जमा झाले. पण आधुनिक समाजाची शोकांतिका पहा. तिथे उपस्थित असलेले बहुतांश लोक आपला मोबाईल काढून या भयानक दृश्याचा व्हिडिओ बनवण्यात मग्न होते. कोणी या अपघाताची रील बनवत होते, तर कोणी सोशल मीडियावर लाईव्ह होते. पेटत्या कारमध्ये होरपळणाऱ्या माणसांच्या जीवापेक्षा लोकांच्या दृष्टीने 'कंटेंट' जास्त महत्त्वाचा झाला होता.
रक्षक बनून आले मदरशाचे तीन उस्ताद
नेमक्या त्याच वेळी जवळच्या एका मदरशात शिकवणारे तीन शिक्षक तिथे पोहोचले. हाफिज शफीउद्दीन, हाफिज इस्लामुद्दीन आणि हाफिज शमशुद्दीन अशी त्यांची नावं आहेत. कार जळत असल्याचं आणि आत लोक अडकल्याचं त्यांनी पाहिलं. त्यावर त्यांनी एका क्षणाचाही विलंब केला नाही. कारची पेट्रोल टाकी कधीही फुटू शकते आणि आपलाही जीव जाऊ शकतो, याची त्यांना पूर्ण जाणीव होती. पण त्यावेळी त्यांच्या डोळ्यासमोर फक्त ती तडफडणारी माणसं होती.
गर्दीला बाजूला सारत हे तिघेही शूरवीर पेटत्या कारजवळ पोहोचले. आगीची धग इतकी प्रचंड होती, तिथे जवळ उभं राहणंही कठीण होतं. पण त्यांचा निश्चय पोलादी होता. त्यांनी एक-एक करून कारचे दरवाजे उघडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आत अडकलेल्या जखमी प्रवाशांना बाहेर काढायला सुरुवात केली. त्यांनी जितेंद्र लाल, मिथिलेश, अमूल्य कुशवाहा, मीना कुशवाहा, अगम्य सिंह आणि रुद्र प्रताप यांना गाडीबाहेर खेचून काढलं. त्यांना रस्त्याच्या कडेला सुरक्षित ठिकाणी झोपवलं. रुग्णवाहिका येईपर्यंत जखमींना धीर दिला.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी याबाबत अंगावर काटा आणणारी माहिती दिली. हे तीन मौलाना तिथे नसते, तर कारमधले लोक जिवंत जळून खाक झाले असते.
माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म
अपघातानंतर पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी पोहोचले. पण तोपर्यंत या तीन नायकांनी आपलं काम चोख बजावलं होतं. कंडासर चौकीचे इंचार्ज पी. एन. पांडे यांनी आपल्या टीमसह जखमींना तात्काळ कैसरगंजच्या सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल केलं. तिथे आता त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वेळीच मदत मिळाल्याने कोणाचाही जीव गेला नाही.
प्रसारमाध्यमांनी या तीन मौलानांना त्यांच्या धाडसाविषयी विचारलं. तेव्हा त्यांच्या उत्तराने सर्वांची मनं जिंकली. हाफिज शफीउद्दीन म्हणाले, "आम्ही कोणतंही फार मोठं काम केलेलं नाही. आम्ही आमचं कर्तव्य पार पाडलं आहे. एका माणसाचा जीव वाचवणं म्हणजे संपूर्ण मानवजातीला वाचवण्यासारखं आहे, अशी शिकवण आमचा धर्म देतो. लोक मदत करण्याऐवजी व्हिडिओ बनवत होते, याचं आम्हाला वाईट वाटलं. कॅमेऱ्याच्या रेकॉर्डिंगपेक्षा एखाद्याचे प्राण वाचवणं जास्त गरजेचं आहे."
डिजिटल असंवेदनशीलतेवर एक चपराक
बहराइचची ही घटना आपल्या आजच्या समाजाचा आरसा आहे. आपण इतके असंवेदनशील झालो आहोत का? कोणाचा तरी मृत्यू आपल्यासाठी फक्त एक 'व्हायरल व्हिडिओ' बनवण्याचं साधन राहिला आहे का? असा विचार करायला ही घटना भाग पाडते. तांत्रिक प्रगतीने आपल्याला स्मार्ट नक्कीच बनवलं, पण कदाचित आपल्यातली संवेदनशीलता हिरावून घेतली.
अशा काळात हाफिज शफीउद्दीन, इस्लामुद्दीन आणि शमशुद्दीन यांच्यासारखी माणसं समाजाची खरी संपत्ती आहेत. या देशाच्या मातीत बंधुभाव आणि मानवता जिवंत असल्याचं त्यांनी सिद्ध केलं. डॉ. फैजुल हसन यांनी इन्स्टाग्रामवर याबाबत पोस्ट शेअर केली आहे. सोशल मीडियावर आता या तिघांचे फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून लोक त्यांना 'रियल लाइफ हिरो' म्हणत आहेत.
पोलिसांनीही या तीन शिक्षकांचे कौतुक केलं आहे. प्रशासनाने त्यांच्या या धाडसाबद्दल त्यांचा सन्मान करावा, अशी मागणी स्थानिक लोक करत आहेत. जग नुसता तमाशा पाहत असतानाही काही हात आगीत उडी मारून जीव वाचवतात. बहराइचच्या हायवेवरील ही घटना येणाऱ्या अनेक वर्षांपर्यंत लोकांना या गोष्टीची आठवण करून देत राहील.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter