नवी दिल्ली
देशातील ई-रिक्षांच्या बॅटरी सिस्टिमवर नियंत्रण मिळवून त्या रिमोटद्वारे बंद पाडणाऱ्या तीन चिनी ॲप्सवर केंद्र सरकारने मोठी कारवाई केली आहे. 'BAT-BMS', 'Lossigy' आणि 'Epoch-i-ion' अशी या तीन ॲप्सची नावे असून, ही ॲप्स हटवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.
नुकतेच सोशल मीडियावर काही व्हिडिओ समोर आले होते, ज्यामध्ये ई-रिक्षांची बॅटरी सिस्टिम या चिनी ॲप्सद्वारे रिमोटली बंद केली जात असल्याचे दिसून आले होते. या प्रकारामुळे इंटरनेटशी जोडलेल्या ई-वाहनांच्या सायबर सुरक्षेबाबत मोठी भीती निर्माण झाली होती. या घटनांची गंभीर दखल घेत केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे.
आयटी सचिव एस. कृष्णन यांनी एका सायबर सुरक्षेच्या परिषदेत बोलताना स्पष्ट केले की, ॲप स्टोअर्सनी अशा प्रकारच्या ॲप्सबाबत अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. हानिकारक ॲप्स उपलब्ध होणार नाहीत, याची खात्री करण्यासाठी सरकार ॲप स्टोअर्ससोबत चर्चा करणार आहे. सरकार कोणत्याही ॲपला चुकीच्या पद्धतीने वापरले जात असल्यास त्याविरुद्ध कारवाई करेल आणि अशी अन्य ॲप्सही ब्लॉक केली जातील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.