भक्ती चाळक
माणूस जग सोडून जातो, पण त्याच्या आठवणी कायम सोबत राहतात. त्याच आठवणींना सामाजिक बांधिलकीची किनार कशी द्यायची, हे जुन्नरच्या ठिकेकरवाडीचे आदर्श ग्रामसेवक अस्लम हुसेन शेख यांच्याकडून शिकावे. अस्लम शेख यांनी आपल्या पत्नीच्या आठवणींना स्थायी कार्यात परावर्तित केले आहे.
आपली दिवंगत पत्नी शमीम शेख यांच्या स्मृतिप्रत्यर्थ अस्लम यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठिकेकरवाडीला २५ हजार रुपयांची कायम ठेव (फिक्स डिपॉझिट) रक्कम सुपूर्द केली. या ठेवीतून मिळणाऱ्या व्याजाच्या पैशांवर शाळेतील विद्यार्थ्यांच्या भौतिक गरजा पूर्ण करण्याचा पूर्ण अधिकार त्यांनी थेट शाळा प्रशासनाला देऊन टाकला. ‘आवाज द व्हॉईस’शी संवाद साधताना त्यांनी या दानधर्मामागची प्रेरणा सांगितली.
उपक्रमाची प्रेरणा
अनेकदा लोक दशक्रिया, साडेपाच महिन्यांचा कार्यक्रम किंवा वार्षिक पुण्यस्मरण यांसारख्या विधींवर खर्च करतात. पण अस्लम शेख यांनी या परंपरेला एक विधायक अन् सामाजिक वळण दिले. आपल्या या दानधर्माच्या प्रेरणेविषयी सांगताना अस्लम शेख म्हणतात, “मी लहानपणापासूनच पाहतोय, मी ग्रामपंचायतीत असताना जायचो तर कित्येक लोक कुणाच्या आईच्या, कुणाच्या वडिलांच्या, भावाच्या किंवा दिवंगत झालेल्यांच्या स्मरणार्थ शाळेला देणगी द्यायचे. त्यातूनच एका शाळेचं पूर्ण रूप पालटून जायचं.”
ते पुढे म्हणतात, “काहीजण दशक्रिया किंवा वार्षिक पुण्याच्या कार्यक्रमाला देणगी देतात. त्यांचीच प्रेरणा घेऊन मी हा छोटासा प्रयत्न केलाय. जर जिल्हा परिषदेची शाळा टिकली, तरच पुढल्या तरुणांचं आणि देशाचं भवितव्य घडणार आहे. शिक्षणाप्रती आपण जेवढं जागरूक राहू, तेवढाच आपला समाज आणि देश जागरूक राहील.”
झाडू हाती घेणाऱ्या शिपायाचा राष्ट्रपतींपर्यंतचा प्रवास
अस्लम शेख यांच्या या दानशूर वृत्तीमागे त्यांचा स्वतःचा खडतर अन् संघर्षाने भरलेला प्रवास आहे. शिवरायांच्या पावन जुन्नरच्या मातीत जन्माला आलेल्या अस्लम यांच्या डोक्यावरून १९८२ मध्ये, म्हणजे ते अवघे आठवीत असतानाच आई-वडिलांचे छत्र हरवले.
अशा बिकट प्रसंगी गावच्या कै. भागूबाई शेलार, भामाबाई वाळके आणि त्यांच्या कुटुंबाने त्यांना मायेचा आधार दिला. त्यांची बहीण बेबीजान इनामदार हिने आई-वडिलांची पोकळी भरून काढत त्यांच्या शिक्षणाची धुरा सांभाळली.
१९८४ मध्ये दहावी पास झाल्यावर पोट भरण्यासाठी त्यांनी वारूळवाडी ग्रामपंचायतीत शिपाई म्हणून कामाला सुरुवात केली आणि हातात झाडू घेतला. ही नोकरी करत असतानाच त्यांनी मांजरी फार्ममधून कृषी पदविका (अॅग्रीकल्चर डिप्लोमा) विशेष प्राविण्यासह पूर्ण केला अन् मंचर कॉलेजमधून १२ वी उत्तीर्ण झाले.
१९८८ मध्ये त्यांचा विवाह शमीम यांच्याशी झाला. अस्लम यांच्या संघर्षात शमीम यांनी मोलाची साथ दिली, मात्र डेंग्यूच्या आजाराने त्यांचे अकाली निधन झाले. त्यानंतर बिस्मिल्ला शेख यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांनीही अस्लम यांच्या प्रत्येक सामाजिक कार्यात खंबीर साथ दिली. आज त्यांचा मुलगा साजिद आणि मुलगी मुमताज हे दोघेही आपापल्या संसारात सुखाने राहत आहेत.
२०२१ मध्ये अस्लम शेख यांनी ठिकेकरवाडी ग्रामपंचायतीचा कारभार ग्रामसेवक म्हणून हाती घेतला. त्यांनी आपल्या अफाट कर्तृत्वाने गावाचा चेहरामोहरा बदलून टाकला. त्यांच्या कार्यकाळात ठिकेकरवाडी गावाने ‘ग्राम ऊर्जा स्वराज विशेष पंचायत पुरस्कार २०२३’ अंतर्गत थेट संपूर्ण देशात प्रथम क्रमांकाचे १ कोटी रुपयांचे बक्षीस पटकावले. नवी दिल्लीतील विज्ञान भवनात देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ग्रामसेवक अस्लम शेख, सरपंच संतोष ठिकेकर आणि गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
शाळेचा कायापालट अन् MS-CIT मध्ये मुलांचा करिष्मा
ठिकेकरवाडीच्या या जिल्हा परिषद शाळेत पहिली ते चौथीच्या वर्गांत सुमारे ४२ विद्यार्थी शिकतात. ग्रामसेवक म्हणून रुजू झाल्यानंतर अस्लम शेख यांनी १५ व्या वित्त आयोगातून अंगणवाडी, तीन वर्गखोल्या आणि कार्यालयाचे ६ ते ६.५ लाख रुपये खर्च करून संपूर्ण रंगरंगोटी करून घेतली आणि बसण्यासाठी बेंचची सोय केली.
इतकेच नाही, तर या शाळेतील पहिली ते चौथीच्या लहान मुलांनी कॉम्प्युटरच्या MS-CIT परीक्षेला बसून ९०% पेक्षा जास्त गुणांनी पास होण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला. असा पराक्रम जुन्नर तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्यात कोणत्याही जिल्हा परिषद शाळेने केला नव्हता.
या ऐतिहासिक यशाबद्दल अस्लम शेख यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पेन, वह्या, स्पोर्ट्स शूज आणि शालेय गणवेशासाठी स्वतःच्या खिशातून आर्थिक मदत करून त्यांचा उत्साह द्विगुणित केला होता.
शाळेत एक दिवस घालवा अन् खारीचा वाटा उचला!
स्वतः अनाथपणाचे चटके सहन करून लहानाचे मोठे झालेल्या अस्लम शेख यांना ग्रामीण भागातील मुलांच्या अडचणींची पूर्ण जाणीव आहे. म्हणूनच ते जिथे जिथे जातात, मग ते यशदा असो, ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र असो किंवा पंचायत समिती असो, तिथे लोकांना शाळांना मदत करण्याचे आवाहन करतात.
अस्लम शेख पोटतिडकीने सांगतात, “मी जिथे जिथे जातो तिथे सर्वांना सांगतो की, आपण आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत एक दिवस का होईना भेट द्यावी. तिथल्या भौतिक अन् आर्थिक सुख-सुविधांचं आकलन करावं आणि आपल्याला जे शक्य होईल ती मदत शाळेसाठी जरूर करावी. आपण आपल्या गावातील स्थानिक स्वराज्य संस्था किंवा शाळेसाठी आपला खारीचा वाटा उचलणं फार महत्त्वाचं आहे.”
शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या अन् हातात झाडू धरण्यापासून ते थेट राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार घेण्यापर्यंत मजल मारणाऱ्या अस्लम शेख यांनी आपल्या दिवंगत पत्नीच्या नावाने लावलेले हे ज्ञानाचे रोपटे आज अनेक गरजू मुलांच्या आयुष्यात प्रकाशाची नवी पहाट घेऊन आले आहे.