नबीला खान : वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी भारताला आंतरराष्ट्रीय पदक मिळवून देणारी रोलर डर्बी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
नबीला खान
नबीला खान

 

अर्सला खान

अवघ्या १४-१५ वर्षांच्या वयात जेव्हा मुले खेळण्या-बागडण्यात व्यस्त असतात, तेव्हा अलिगडच्या नबीला खानने थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर तिरंगा फडकवण्याचे स्वप्न पाहिला सुरुवात केली होती. रोलर स्केटिंगच्या रिंकवर उतरल्यावर तिचा वेग अन् तिची चपळाई भल्याभल्यांना अचंबित करते. 

'आवाज-द-व्हॉईस'शी खास बातचीत करताना नबीला सांगते की, देशासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक जिंकणे हेच तिचे अंतिम ध्येय आहे. प्रतिस्पर्ध्यांना ज्या कौशल्याने ती मागे टाकते, ते पाहून तिच्या कोचला अन् पालकांना ठाम विश्वास आहे की, ही मुलगी लवकरच जगाच्या पाठीवर देशाचे नाव उज्ज्वल करेल.

मनात एखादी गोष्ट करण्याची जिद्द पक्की असेल, तर यशाचे मार्ग आपोआप मोकळे होत जातात. अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये (AMU) बी.एससी बायोकेमिस्ट्रीचे शिक्षण घेणाऱ्या नबीला खानची ही कथा अगदी अशीच प्रेरणादायी आहे. अवघ्या पाच वर्षांची असताना भावाला स्केटिंग करताना पाहून सुरू झालेला हा प्रवास आज नॅशनल रोलर डर्बीपर्यंत पोहोचला आहे.
 

पाचव्या अवघ्या वर्षी घातले स्केट्स 
नबीलासाठी स्केटिंग हा फक्त खेळ किंवा विरंगुळा नाही; ती तिच्या जगण्याची खरी ताकद मानत आलेली आहे. रोज आयुष्यात पुढे जाण्याची नवी ऊर्जा तिला या खेळातूनच मिळते. पाच वर्षांची असताना तिने पहिल्यांदा पायात स्केट्स घातले. मोठ्या भावाला रिंकवर पळताना पाहून तिच्या मनातही हा खेळ शिकण्याची इच्छा निर्माण झाली.

हळूहळू या छंदाचे रुपांतर एका ध्यासा मध्ये झाले. सुरुवातीला मिळालेली छोटी-छोटी पदके अन् ट्रॉफीज यामुळे तिचा आत्मविश्वास वाढत गेला. आपण या खेळात खूप लांबचा टप्पा गाठू शकतो, असा ठाम विश्वास तिच्या मनात निर्माण झाला. या संपूर्ण प्रवासात तिचे कुटुंब तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.

आई-वडिलांचे प्रोत्साहन
नबीलाची आई गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय आहे. २०१४ पासून त्या 'आशियाना वेल्फेअर सोसायटी' नावाने स्वयंसेवी संस्था चालवतात. आईने मुलीच्या क्रीडाप्रेमाची कदर करत तिला नेहमी पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले.

तिचे वडील कुवेतमध्ये इंजिनियर म्हणून कार्यरत होते, आता ते निवृत्त होऊन घरीच असतात. मोठा भाऊ तर नबीलासाठी नेहमीच प्रेरणेचा स्रोत राहिलाय, जो एएमयूमध्येच 'मास कम्युनिकेशन'चे शिक्षण घेतोय. घरात शिक्षण अन् स्वप्नांना मोकळा श्वास घेण्याचे वातावरण मिळाल्यामुळे नबीलाला कोणत्याही भीतीशिवाय पुढे जाण्याचे धाडस मिळाले.

एका मुलीसाठी क्रीडा क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणे सोपे नसते. नबीलाच्या वाटेतही अनेक अडथळे आले. पण आई-वडिलांनी तिच्या क्षमतेवर विश्वास ठेवला आणि तिला तिच्या आवडीचा मार्ग निवडण्याचे स्वातंत्र्य दिले.
 

बाबांची शायरी अन् जगण्याची प्रेरणा
वडिलांनी सांगितलेली एक शायरी नबीलासाठी सर्वात मोठी प्रेरणा ठरते. प्रसिद्ध कवी अहमद फराझ यांचे हे ओळी तिच्या हृदयाच्या खूप जवळ आहेत.

जो मेरे जब्त का शीराजा मुंतशिर कर दे,
मेरे सितम को भी अब ऐसा कोई सितमगर दे।

कठीण प्रसंगातही शांत राहून स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याची शिकवण तिला या ओळींतून मिळते.

मोहालीच्या कॅम्पने बदलली आयुष्याची दिशा
मोहाली येथील १० दिवसांच्या विशेष प्रशिक्षण शिबिराने नबीलाच्या क्रीडा प्रवासाला एक मोठे वळण दिले. तिथल्या निवडकर्त्यांचे लक्ष तिच्या वेगाने अन् सातत्याने वेधून घेतले.

त्यानंतर तिची उत्तर प्रदेशच्या संघात निवड झाली. नॅशनल रोलर डर्बीमध्ये तिने अप्रतिम कामगिरी केली. आतापर्यंत तिने नॅशनल रोलर डर्बीत ३ सुवर्णपदकांसह एकूण पाच पदके पटकावली आहेत.

राजस्थानमधील बीकानेर येथे झालेली 'फेडरेशन कप रोलर स्केटिंग डर्बी चॅम्पियनशिप' ही तिच्या कारकीर्दीतील सर्वात आठवणीत राहणारी स्पर्धा ठरली. उत्तर प्रदेशच्या संघाकडून खेळताना तिने रिंकवर अप्रतिम ताळमेळ दाखवला. पूल स्टेजमध्ये उत्तर प्रदेशने तामिळनाडूच्या बलाढ्य संघाचा ४४-११ असा धुव्वा उडवला.

त्यानंतर अंतिम सामन्यात यजमान राजस्थानला २६-१२ असे मात देऊन सुवर्णपदकावर नाव कोरले. या ऐतिहासिक विजयात नबीलाचा वेग, अचूक टायमिंग अन् रणनीती अत्यंत महत्त्वाची ठरली.

अचूक रणनीती हेच तिचे हत्यार
रोलर डर्बीमध्ये फक्त वेगाने स्केटिंग करून चालत नाही. संघभावना, अचूक वेळ अन् योग्य रणनीती तितकीच महत्त्वाची असते. सामन्यादरम्यान सहकाऱ्यांशी ताळमेळ ठेवण्यावर भर देत असल्याचे नबीला सांगते. याच रणनीतीच्या जोरावर उत्तर प्रदेशच्या संघाने बीकानेरमध्ये सुवर्ण यश मिळवले.

अभ्यासाचा अन् खेळाचा सुरेख समतोल
नबीलाच्या प्रवासाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे खेळासोबतच ती अभ्यासातही तितकीच हुशार आहे. एएमयूमध्ये ती बी.एससी बायोकेमिस्ट्रीचे शिक्षण घेत आहे. स्केटिंगचा सराव, स्पर्धा अन् कॉलेजचा अभ्यास यांचा ताळमेळ बसवणे सोपे नाही. पण वेळेचे योग्य नियोजन केले तर शिक्षण अन् खेळ दोन्ही सहज सांभाळता येतात, असा तिचा अनुभव आहे.

विशेष म्हणजे, नबीलाने तब्बल दोन वेळा NEET परीक्षा उत्तीर्ण केली आहे! यावरूनच ती अभ्यासालाही किती गांभीर्याने घेते हे स्पष्ट होते. रोज फिटनेस अन् स्टॅमिना वाढवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या नबीलाचे मानणे आहे की, एका खेळाडूला दररोज स्वतःला सिद्ध करावे लागते.

जेनझी ला खास संदेश
आजच्या युगातील तरुण म्हणून नबीला सोशल मीडियावर सक्रिय असते, पण तिच्यासाठी सोशल मीडिया हे फक्त मनोरंजनाचे साधन नाही. स्वतःची नवी ओळख निर्माण करू इच्छिणारी निडर पिढी म्हणून ती आपल्या पिढीकडे पाहते.

टीकेला न घाबरता त्याचा वापर स्वतःची ताकद बनवण्यासाठी करा, असा सल्ला ती तरुणांना देते. कोणी तुमच्या कामावर प्रश्न उपस्थित केले तर त्याला दडपण न मानता प्रेरणा म्हणून घ्या, तसेच कुणाच्याही दबावाखाली येऊन कोणतेही काम करू नका, असे ती सांगते.

आंतरराष्ट्रीय सुवर्णपदकावर नजर
पाचव्या वर्षी सुरू झालेला नबीलाचा हा प्रवास आज अनेक मुलींसाठी एक आदर्श बनला आहे. नावावर अनेक राष्ट्रीय पदके, उत्तर प्रदेशसाठी जिंकलेले सुवर्ण अन् अभ्यासातील उत्तम यश... पण तिची स्वप्ने इथेच थांबत नाहीत.

पायात स्केट्स बांधून रिंकवर वाऱ्याच्या वेगाने धावणारी ही तरुणी आता आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी सुवर्णपदक जिंकण्याच्या तयारीला लागली आहे. कुटुंबाचा विश्वास, वडिलांचे मार्गदर्शन, आईचे प्रेम अन् स्वतःची अथक मेहनत याच्या जोरावर नबीला खान लाखो मुलींसाठी एक मोठी प्रेरणा बनली आहे.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter