India Pakistan UN Debate: भारताने संयुक्त राष्ट्रात उघड केला पाकिस्तानचा विखारी चेहरा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 10 h ago
संयुक्त राष्ट्रांतील भारताचे स्थायी प्रतिनिधी राजदूत हरीश पर्वथनेनी
संयुक्त राष्ट्रांतील भारताचे स्थायी प्रतिनिधी राजदूत हरीश पर्वथनेनी

 

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत (UNSC) भारताने पाकिस्तानच्या नरसंहाराच्या काळ्या इतिहासाचा पाढा वाचत आंतरराष्ट्रीय मंचावर त्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. अंतर्गत अपयश लपवण्यासाठी शेजारील देशांमध्ये हिंसाचार पसरवणे हाच पाकिस्तानचा मुख्य अजेंडा राहिला आहे, अशा शब्दांत भारताने हल्लाबोल केला. 

संयुक्त राष्ट्रांतील भारताचे स्थायी प्रतिनिधी राजदूत हरीश पर्वथनेनी यांनी 'सशस्त्र संघर्षात नागरिकांचे संरक्षण' या विषयावरील वार्षिक खुल्या चर्चेदरम्यान भारताची बाजू मांडली. पाकिस्तानच्या प्रतिनिधीने या चर्चेदरम्यान पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केल्यानंतर भारताने पाकिस्तानला जोरदार फटकारले.

पाकिस्तानचा खोटारडेपणा 
"स्वतःचा नरसंहाराचा डागाळलेला इतिहास असलेल्या पाकिस्तानने भारताच्या अंतर्गत बाबींवर बोलणे अत्यंत हास्यास्पद आहे," असे राजदूत हरीश पर्वथनेनी यांनी स्पष्ट केले. पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय कायद्यांचा दाखला दिला जाणे हा निव्वळ ढोंगीपणा आहे, कारण हा देश स्वतः निष्पाप नागरिकांना लक्ष्य करतो. 

चालू वर्षाच्या सुरुवातीला मार्च महिन्यात पवित्र रमजान महिन्यादरम्यान पाकिस्तानने अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील 'उमीद व्यसनमुक्ती उपचार रुग्णालयावर' केलेल्या अमानुष हवाई हल्ल्याची आठवण भारताने जगाला करून दिली. संयुक्त राष्ट्रांच्या अफगाणिस्तानमधील साहाय्य मिशनच्या (UNAMA) अहवालानुसार, या भ्याड हल्ल्यात २६९ नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर १२२ जण जखमी झाले होते. एका वैद्यकीय केंद्राला लष्करी लक्ष्य बनवणे कोणत्याही प्रकारे न्याय्य ठरू शकत नाही, असे भारताने म्हटले आहे.

१९७१ च्या 'ऑपरेशन सर्चलाईट'चा उल्लेख करत सुनावले
भारताने पाकिस्तानच्या या आक्रमक कृत्यांवर तीव्र आक्षेप घेत म्हटले की, जो देश स्वतःच्याच लोकांवर बॉम्ब टाकतो आणि पद्धतशीरपणे नरसंहार घडवून आणतो, त्याच्याकडून अशा क्रूरतेची अपेक्षा करणे नवल नाही. १९७१ मध्ये 'ऑपरेशन सर्चलाईट' दरम्यान पाकिस्तानी लष्कराने पूर्व पाकिस्तानातील (आताचा बांगलादेश) राष्ट्रवादी चळवळ दडपण्यासाठी आपल्याच देशातील तब्बल ४ लाख महिलांवर पद्धतशीरपणे अत्याचार केले होते. हे अमानुष वर्तन पाकिस्तानचे अंतर्गत अपयश लपवण्याच्या धडपडीचा भाग आहे. पाकिस्तानात ना धर्म उरला आहे, ना कायदा आणि ना कोणती नैतिकता; त्यामुळे जगाला आता पाकिस्तानचा खोटा प्रचार चांगलाच समजला आहे, अशा कडक शब्दांत राजदूत पर्वथनेनी यांनी पाकिस्तानची कोंडी केली.