अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू
इराणविरुद्धच्या युद्धाच्या पुढील रणनीतीवरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यात फोनवर अत्यंत तणावपूर्ण चर्चा झाल्याचे वृत्त अमेरिकन प्रसारमाध्यमांनी दिले आहे. वॉशिंग्टन हे इराणवर पुन्हा लष्करी हल्ले करण्याऐवजी शांतता कराराच्या बाजूने असल्याने दोन्ही नेत्यांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत.
मंगळवारी झालेल्या या फोन कॉलनंतर इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू अत्यंत संतापले होते, असे अमेरिकेच्या एक्सिओस (Axios) या वृत्तसंस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे. नेतन्याहू यांना इराणच्या लष्करी क्षमता पूर्णपणे नष्ट करण्यासाठी आणि तिथल्या पायाभूत सुविधा उद्ध्वस्त करण्यासाठी पुन्हा हल्ले सुरू करायचे आहेत.
शांतता करारासाठी कतार आणि पाकिस्तानचा पुढाकार
कतार आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) यांसह अरब देशांच्या विनंतीवरून आपण मंगळवारी इराणवर होणारे नियोजित हल्ले पुढे ढकलल्याचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी रविवारी स्पष्ट केले होते. अमेरिका आणि इराणमधील मतभेद दूर करण्यासाठी कतार आणि पाकिस्तानने प्रादेशिक मध्यस्थांच्या मदतीने एक सुधारित शांतता मसुदा तयार केला आहे.
मात्र, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू या वाटाघाटींबाबत अत्यंत साशंक असून इराणमधील राजवट कमकुवत करण्यासाठी युद्ध सुरू ठेवण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. दुसरीकडे, ट्रम्प यांच्या मते अजूनही करार होण्याची शक्यता जिवंत आहे, पण तसे न झाल्यास अमेरिका पुन्हा युद्ध सुरू करण्यास तयार आहे.
ट्रम्प आणि नेतन्याहू यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर
"आम्ही तिथे जाऊन युद्ध संपवायचे की ते करारावर स्वाक्षरी करणार, हाच आता एकमेव प्रश्न उरला आहे," असे ट्रम्प यांनी कोस्ट गार्ड अकादमीमधील एका कार्यक्रमात सांगितले. नंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, अमेरिका आणि इराण सध्या कराराच्या आणि युद्धाच्या अगदी सीमारेषेवर उभे आहेत. जर आम्हाला १०० टक्के योग्य उत्तरे मिळाली नाहीत, तर आम्ही तातडीने लष्करी कारवाई करू.
दरम्यान, इराण राजनैतिक पातळीवर वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करत इस्रायलच्या वरिष्ठ वर्तुळात ट्रम्प यांच्या भूमिकेबद्दल तीव्र नाराजी आहे. ट्रम्प यांनी मात्र 'नेतन्याहू मी सांगेन तेच करतील' असा विश्वास व्यक्त केला आहे. इराणने सुधारित प्रस्तावाचा आढावा घेत असल्याची पुष्टी केली असली तरी अद्याप लवचिकता दाखवलेली नाही. पाकिस्तानचे गृहमंत्री सध्या या मध्यस्थीसाठी तेहरानमध्ये उपस्थित आहेत.