अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील सॅन दिएगो शहरात एका मशिदीच्या आवारात झालेल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक पोलीस या प्रकरणाचा 'द्वेषमूलक गुन्हा' (Hate Crime) म्हणून तपास करत आहेत. या हल्ल्यानंतर दोन्ही संशयित हल्लेखोरांनी स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.
सॅन दिएगोचे पोलीस प्रमुख स्कॉट वॉहल यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, सोमवारी 'इस्लामिक सेंटर ऑफ सॅन दिएगो' (ICSD) येथे हा हल्ला झाला. या संकुलात एक मशीद आणि शाळा देखील आहे. हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई केली, मात्र त्यापूर्वीच हल्लेखोरांनी स्वतःला संपवले होते. मशिदीचे ठिकाण लक्षात घेता, पोलीस या प्रकरणाकडे द्वेषमूलक गुन्हा म्हणूनच पाहत आहेत.
सुरक्षा रक्षकामुळे मोठा अनर्थ टळला
पोलीस प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित हल्लेखोर हे अवघ्या १७ आणि १९ वर्षांचे दोन तरुण होते. या गोळीबारात मृत्यू झालेले तिन्ही व्यक्ती प्रौढ असून, शाळेतील कोणत्याही मुलाला दुखापत झालेली नाही. मृत पावलेल्यांमध्ये मशिदीच्या एका सुरक्षा रक्षकाचा समावेश आहे. या सुरक्षा रक्षकाने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे मोठी जीवितहानी टळली.
गोळीबाराच्या अवघ्या दोन तास आधी एका संशयिताच्या आईने पोलिसांशी संपर्क साधला होता. तिचा मुलगा आत्महत्येचा विचार करत असून घरातील काही शस्त्रे आणि गाडी घेऊन बेपत्ता झाल्याची माहिती तिने पोलिसांना दिली होती. ही घटना नेमकी कोणत्या कारणामुळे घडली, याचा शोध घेण्यासाठी पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. मशिदीचे इमाम ताहा हसन यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून मशीद हे प्रार्थना आणि शिक्षणाचे पवित्र स्थान असल्याचे सांगितले.
अमेरिकेतून तीव्र निषेध आणि सुरक्षा वाढवली
सॅन दिएगोचे महापौर टॉड ग्लोरिया यांनी या घटनेवर दुःख व्यक्त करताना शहरात द्वेषाला कोणतेही स्थान नाही, असे स्पष्ट केले. तसेच मुस्लिम समुदायाच्या सुरक्षेसाठी सर्व आवश्यक पावले उचलली जातील, अशी ग्वाही दिली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही या घटनेची माहिती देण्यात आली असून त्यांनी ही घटना अत्यंत 'भयानक' असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणावर सरकारचे बारीक लक्ष असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.
कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूजम आणि एफबीआय (FBI) संचालक काश पटेल यांनी या तपासात स्थानिक पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून न्यू यॉर्क पोलीस विभागाने (NYPD) शहरातील सर्व मशिदींच्या सुरक्षेत मोठी वाढ केली आहे.