इराणला लक्ष्य करून २८ फेब्रुवारी रोजी सुरू करण्यात आलेल्या ऑपरेशन एपिक फ्युरी (Operation Epic Fury) दरम्यान अमेरिकेची किमान ४२ विमाने आणि ड्रोन उद्ध्वस्त किंवा खराब झाली आहेत. अमेरिकेच्या काँग्रेसचे संशोधन सेवा (CRS) च्या अधिकृत अहवालात हा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.
वर्गीकरण, सुरू असलेली युद्धे आणि इतर तांत्रिक कारणांमुळे खराब झालेल्या किंवा नष्ट झालेल्या विमानांच्या संख्येत भविष्यात आणखी बदल होऊ शकतो, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या अहवालामुळे इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकन हवाई दलाचे किती मोठे नुकसान झाले आहे, हे स्पष्ट झाले आहे.
अत्याधुनिक फायटर जेट्स आणि ड्रोनचे मोठे नुकसान
सीआरएस (CRS) ने जाहीर केलेल्या या यादीत अमेरिकेच्या अत्यंत अत्याधुनिक आणि महागड्या विमानांचा समावेश आहे. यामध्ये चार F-15E स्ट्राईक ईगल फायटर जेट्स, एक F-35A लाइटनिंग II फायटर विमान, एक A-10 थंडरबोल्ट II ग्राउंड-अटॅक विमान, सात KC-135 स्ट्रॅटोटँकर एरियल रिफ्युएलिंग विमाने आणि एका E-3 सेंट्री अवाक्स (AWACS) विमानाचे नुकसान झाले आहे.
याशिवाय दोन MC-130J कमांडो II विशेष मोहीम विमाने, एक HH-60W जोली ग्रीन II हेलिकॉप्टर, २४ अत्याधुनिक MQ-9 रीपर ड्रोन आणि एका MQ-4C ट्रायटन ड्रोनचा यात समावेश आहे. अमेरिकन संरक्षण मंत्रालय आणि सेंट्रल कमांडच्या हवाल्याने हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
युद्धाचा खर्च २९ अब्ज डॉलर्सवर
हाऊस अॅप्रोप्रिएशन्स उपसमितीच्या १२ मे रोजी झालेल्या सुनावणीत पेंटागॉनचे हंगामी नियंत्रक ज्युल्स डब्ल्यू. हर्स्ट (III) यांनी दिलेल्या साक्षीत अमेरिकेचा काळजी वाढवणारा आकडा समोर आला आहे. इराणमधील लष्करी कारवायांसाठी संरक्षण मंत्रालयाचा अंदाजित खर्च आता २९ अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. खर्चात झालेली ही मोठी वाढ प्रामुख्याने युद्धात खराब झालेल्या लष्करी उपकरणांची दुरुस्ती किंवा त्यांच्या जागी नवीन उपकरणे खरेदी करण्याच्या वाढलेल्या खर्चामुळे झाली असल्याचे हर्स्ट यांनी स्पष्ट केले आहे.