US Iran War Updates : अरब देशांच्या विनंतीनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणवरील हल्ला मागे घेण्याचा निर्णय

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 6 h ago
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर करण्यात येणारे नवे लष्करी हल्ले तात्पुरते स्थगित केले आहेत. कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) या अरब देशांच्या नेत्यांच्या विनंतीवरून हा निर्णय घेण्यात आल्याचे ट्रम्प यांनी जाहीर केले. सध्या तेहरानसोबत अत्यंत महत्त्वपूर्ण चर्चा सुरू असून, लवकरच दोन्ही देशांमध्ये एक स्वीकारार्ह शांतता करार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी उशिरा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'ट्रुथ सोशल'वर या निर्णयाची घोषणा केली. विशेष म्हणजे, अमेरिका आणि इराणमधील युद्धादरम्यान मध्यस्थ म्हणून भूमिका बजावणाऱ्या पाकिस्तानचा या घोषणेत कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही.
 
ट्रम्प यांनी सांगितले की, कतारचे अमीर तमीम बिन हमाद अल थानी, सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान अल सौद आणि युएईचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नह्यान यांनी अमेरिकेला मंगळवारी होणारा नियोजित लष्करी हल्ला काही काळासाठी पुढे ढकलण्याची विनंती केली होती. या मित्रराष्ट्रांच्या मते, दोन्ही देश कराराच्या अत्यंत जवळ पोहोचले आहेत.
 
अरब देशांची मध्यस्थी आणि शांततेची शक्यता
व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, आम्ही मंगळवारी इराणवर एक अत्यंत मोठा हल्ला करण्याची तयारी पूर्ण केली होती. परंतु, अरब नेत्यांच्या विनंतीवरून आम्ही ही कारवाई काही काळासाठी थांबवली आहे. जर इराण अण्वस्त्रे तयार करणार नाही या अटीवर करार झाला आणि आमचे मित्रराष्ट्र समाधानी असतील, तर अमेरिका देखील यावर सहमती दर्शवेल.
 
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या मते, सध्या दोन्ही देशांमध्ये अत्यंत गंभीर पातळीवर वाटाघाटी सुरू आहेत. पश्चिम आशियातील शांततेसाठी आणि अमेरिकेच्या हितासाठी हा करार अत्यंत महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास अरब नेत्यांनी व्यक्त केला आहे. इराणसाठी आता वेळ वेगाने संपत चालली असून त्यांनी लवकरात लवकर निर्णय घेणे गरजेचे आहे, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला.
 
अमेरिकी लष्कराला सतर्क राहण्याचे आदेश
लष्करी कारवाई थांबवली असली तरी ट्रम्प यांनी युद्धाची तयारी पूर्ण ठेवली आहे. त्यांनी युद्ध सचिव पीट हेगसेथ आणि जॉइंट चीफ ऑफ स्टाफचे चेअरमन जनरल डॅनियल केन यांना नियोजित हल्ला न करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, जर शांतता करार यशस्वी झाला नाही, तर अगदी काही क्षणांच्या नोटीसवर इराणवर पूर्ण ताकदीने मोठा लष्करी हल्ला करण्यासाठी तयार राहण्याच्या सूचनाही अमेरिकी सैन्याला देण्यात आल्या आहेत.
 
सूत्रानुसार, ट्रम्प मंगळवारी सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा टीमसोबत लष्करी पर्यायांवर चर्चा करणार होते. त्यापूर्वीच त्यांनी सौदी, कतार आणि युएईच्या नेत्यांशी फोनवर सविस्तर चर्चा केली. गेल्या काही आठवड्यांपासून ट्रम्प इराणला इशारा देत आहेत की एप्रिलच्या मध्यात झालेला युद्धविराम संपू शकतो. अमेरिका आणि इस्रायलने २८ फेब्रुवारी रोजी इराणविरुद्ध युद्ध पुकारले होते, ज्यानंतर ८ एप्रिल रोजी तात्पुरता युद्धविराम झाला होता.