संयुक्त अरब अमिरातीमधील (UAE) बराकाह अणुप्रकल्पाजवळ झालेल्या ड्रोन हल्ल्याबाबत भारताने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला अत्यंत धोकादायक असल्याचे स्पष्ट करत, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व बाजूंना संयम पाळण्याचे आवाहन केले आहे.
आखाती देशातील या एकमेव अणुऊर्जा प्रकल्पाजवळील जनरेटरवर रविवारी एका ड्रोनने धडक दिली. या हल्ल्यामुळे प्रकल्पाच्या बाहेरील सीमेवर आग लागली. या हल्ल्याची अद्याप कोणत्याही संघटनेने जबाबदारी स्वीकारलेली नाही. यूएईच्या संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, ते या ड्रोन हल्ल्याचा स्रोत शोधण्यासाठी सखोल तपास करत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण पश्चिम आशियामध्ये तणाव आणखी वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अधिकृत विधान जारी केले आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, "यूएईमधील बराकाह अणुप्रकल्पाला लक्ष्य करून करण्यात आलेल्या हल्ल्याबाबत भारत अत्यंत चिंतित आहे. अशा प्रकारच्या कारवाया अस्वीकार्य असून यामुळे तणावात भयानक वाढ होऊ शकते." तसेच, परिस्थिती अधिक चिघळू नये यासाठी शांतता प्रस्थापित करण्यासाठी तातडीने मुत्सद्देगिरी आणि संवादाच्या मार्गावर परतण्याचे आवाहन भारताने केले आहे.