पश्चिम आफ्रिकेतील नायजेरिया देशामध्ये गेल्या एका आठवड्यात शाळांना लक्ष्य करून करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या मालिकेत ८० हून अधिक मुलांचे अपहरण करण्यात आले आहे. स्थानिक अधिकारी आणि मानवाधिकार संघटनांनी रविवारी या धक्कादायक माहितीला दुजोरा दिला असून, देशात सक्रिय असलेल्या जिहादी आणि इतर सशस्त्र गटांशी लढा देण्यात सरकारला अपयश येत असल्याचे यावरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
दोन वेगवेगळ्या प्रांतांतील शाळांना लक्ष्य
दहशतवाद्यांनी बुधवारी आणि गुरुवारी नायजेरियाच्या ईशान्येकडील बोर्नो प्रांतातील एका प्राथमिक शाळेवर हल्ला केला. संबिसा जंगलाजवळ असलेल्या मुसा गावात झालेल्या या हल्ल्यात ४२ मुलांचे अपहरण करण्यात आले. हा परिसर बोको हराम आणि 'इस्लामिक स्टेट वेस्ट आफ्रिका प्रोव्हिन्स' (ISWAP) या संघटनांचा गड मानला जातो.
या घटनेनंतर अवघ्या काही तासांतच, शुक्रवारी देशाच्या नैऋत्येकडील ओयो प्रांतातील दोन माध्यमिक शाळांवरही सशस्त्र दहशतवाद्यांनी हल्ला केला. अॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या नायजेरिया शाखेने दिलेल्या माहितीनुसार, या भागातून किमान ४० मुलांचे अपहरण झाले आहे. एका स्थानिक सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार ओयो प्रांतातून बेपत्ता झालेल्या मुलांची संख्या ४८ असू शकते.
वाढत्या अपहरणांमुळे मुलांचे शिक्षण धोक्यात
अॅम्नेस्टी इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने रविवारी इशारा दिला आहे की, अपहरणाच्या सततच्या भीतीमुळे अनेक मुले शाळा सोडत आहेत. तसेच, शाळांवरील हल्ल्यांपासून मुलींचे रक्षण करण्यासाठी त्यांचे कुटुंबीय कमी वयातच त्यांचे सक्तीने विवाह लावून देत आहेत. स्थानिक पोलीस प्रवक्ते अयानलादे ओलायिंका यांनी सांगितले की, ओयो प्रांतातील हल्ल्याप्रकरणी तीन बंदूकधाऱ्यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने अटक करण्यात आली आहे.
नायजेरियामध्ये शाळकरी मुलांचे अपहरण होणे ही एक मोठी समस्या बनली असून, सशस्त्र टोळ्या सरकारकडून खंडणी उकळण्यासाठी आणि स्वतःकडे लक्ष वेधून घेण्यासाठी शाळांना धोरणात्मक लक्ष्य बनवत असल्याचे संरक्षण विश्लेषकांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षीही देशाच्या उत्तर भागात एकाच वेळी ३०० हून अधिक मुलांचे अपहरण करण्यात आले होते.