पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्वीडनचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 21 h ago
स्वीडनचा सर्वोच्च नागरी सन्मान स्वीकारताना पंतप्रधान नरेंद्र मोदी
स्वीडनचा सर्वोच्च नागरी सन्मान स्वीकारताना पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

भारत आणि स्वीडन यांच्यातील द्विपक्षीय संबंध आता नव्या उंचीवर पोहोचले असून, दोन्ही देशांनी या संबंधांना 'धोरणात्मक भागीदारी'चे (Strategic Partnership) स्वरूप देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या स्वीडन दौऱ्यावर असून, त्यांनी स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन यांच्याशी व्यापार, तंत्रज्ञान आणि संरक्षण यांसह विविध महत्त्वपूर्ण क्षेत्रांवर सविस्तर चर्चा केली. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींना त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वासाठी आणि भारत-स्वीडन संबंधांमधील योगदानाबद्दल स्वीडनचा प्रतिष्ठित 'रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार, डिग्री कमांडर ग्रँड क्रॉस' हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे.

व्यापार, तंत्रज्ञान आणि संरक्षणावर चर्चा
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही नेत्यांच्या शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेत भारत-स्वीडन संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेण्यात आला. व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि नावीन्य, हरित संक्रमण (Green Transition), अंतराळ, उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि संरक्षण या क्षेत्रांतील सहकार्य अधिक दृढ करण्यावर दोन्ही देशांनी भर दिला आहे. २०२५ मध्ये दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार ७.७५ अब्ज डॉलर्सवर पोहोचला होता. स्वीडनच्या पंतप्रधानांनी भारताच्या डिजिटल परिवर्तन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील प्रगतीचे विशेष कौतुक केले.

जागतिक मुद्द्यांवर मंथन आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन
या बैठकीत संयुक्त राष्ट्र (UN) आणि इतर बहुपक्षीय संस्थांमध्ये सुधारणा करण्याच्या निकडीवरही चर्चा झाली. या बैठकीला स्वीडनच्या क्राउन प्रिन्सेस व्हिक्टोरिया यादेखील उपस्थित होत्या. याशिवाय, पंतप्रधान मोदींनी मर्सक (Maersk) कंपनीचे अध्यक्ष रॉबर्ट मर्सक उग्ला यांची भेट घेऊन भारतातील बंदर पायाभूत सुविधा, लॉजिस्टिक आणि हरित जहाजबांधणी (Green Shipping) क्षेत्रातील गुंतवणुकीच्या मोठ्या संधींवर सविस्तर चर्चा केली.

स्वीडनमध्ये भारतीय संस्कृतीचा जागर
पंतप्रधान मोदींचे विमान स्वीडनच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच स्वीडिश वायुसेनेच्या लढाऊ विमानांनी त्यांना मानवंदना दिली. गोथेनबर्ग येथे पोहोचल्यानंतर मोदींनी भारतीय समुदायाशी संवाद साधला. यावेळी स्वीडिश ऑपेरा गायिका चार्लोटा हुल्ड यांनी गायलेले 'वैष्णव जन तो' हे भजन आणि लिला अकादमीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला भरतनाट्यम नृत्याविष्कार सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. या स्वागताबद्दल पंतप्रधान मोदींनी स्वीडनचे आभार मानले आहेत.