‘तब्लीग’चे महाराष्ट्र प्रमुख हाफिज मंजूर सुपूर्द-ए-खाक; हजरत मौलाना साद यांच्यासह हजारो अनुयायांची उपस्थिती

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 4 h ago
इस्लामिक सुधारणावादी चळवळीचे महाराष्ट्र राज्याचे आमीर (प्रमुख) हाफिज मंजूर
इस्लामिक सुधारणावादी चळवळीचे महाराष्ट्र राज्याचे आमीर (प्रमुख) हाफिज मंजूर

 

आवाज द व्हॉइस मराठी ब्युरो, पुणे : १९ मे —

जगभरात पसरलेल्या तब्लीग जमात या इस्लामिक सुधारणावादी चळवळीचे महाराष्ट्र राज्याचे आमीर (प्रमुख) हाफिज मंजूर यांच्या पार्थिवावर सोमवारी रात्री अत्यंत शांततामय आणि भावनिक वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निगडी येथील दफनभूमीत त्यांना हजारो अनुयायांच्या उपस्थितीत सुपूर्द-ए-खाक करण्यात आले.

या अंत्यविधीला भारतातील तब्लीग जमातचे प्रमुख आमीर हजरत मौलाना साद आणि त्यांचा मुलगा विशेष रूपाने उपस्थित होते. त्यांनी हाफिज मंजूर यांचे अंत्यदर्शन घेतले. नव्वदीतील हाफिज मंजूर यांचे काल (१८ मे रोजी) पुण्यात निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे.

अंत्ययात्रेत उसळला जनसागर

प्रसिद्धी आणि कोणत्याही तामझामापासून दूर राहून त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजसुधारणा आणि धर्माच्या सेवेसाठी समर्पित केले होते. त्यांचा दफनविधी अत्यंत साध्या पद्धतीने पण शिस्तबद्ध रीतीने पार पडला.

संपूर्ण देशभरातून त्यांना मानणारे हजारो अनुयायी सोमवारी रात्री पुण्यात दाखल झाले होते. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी फातिमा मस्जिदमध्ये ठेवण्यात आले होते. मस्जिदपासून ते निगडी कब्रस्तानपर्यंत अनुयायांनी मोठी गर्दी केली होती. इतका मोठा जनसमुदाय एकत्र येऊनही संपूर्ण अंत्यविधी अत्यंत शांततेत आणि शिस्तीत पार पडला.

शेवटच्या दिवसापर्यंत धर्मकार्यात होते सक्रिय

हाफिज मंजूर जीवनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत अत्यंत सक्रिय होते. रविवारी रात्रीच ते पुण्यात आले होते. नेहमीप्रमाणे त्यांनी पहाटेची तहज्जुद आणि फजरची नमाज अदा केली होती.

फजरच्या नमाजनंतर त्यांना मस्जिदमध्ये अचानक चक्कर आली. उपचारासाठी त्यांनी तात्काळ दवाखान्यात नेण्यात आले, पण तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

ते दर सोमवारी आणि गुरुवारी नियमितपणे रोजा (उपवास) ठेवत असत. मृत्यूसमयीही ते रोजाच्याच अवस्थेत होते, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.

व्यसनमुक्ती आणि समाजसुधारणेवर भर

पुण्यातील फातिमा मस्जिदमध्ये राहून त्यांनी अनेक दशकं धर्माची आणि समाजाची सेवा केली. तरुण वर्गाला व्यसनापासून दूर ठेवणे आणि समाजात हुंडाविरोधी प्रबोधन करणे यासाठी त्यांनी आयुष्यभर मोठी मेहनत घेतली.

विवाहासारखे कार्यक्रम अत्यंत साध्या पद्धतीने व्हावेत, यासाठी त्यांचा नेहमीच आग्रह असायचा. त्यांच्या निधनामुळे समाजाचे मोठे नुकसान झाले असून अनेकांनी आपला मार्गदर्शक गमावल्याची भावना व्यक्त केली आहे.

'उम्मतचे मोठे नुकसान; शिकवण कायम जिवंत राहील'

हजरत हाफिज मंजूर यांचे निधन हे संपूर्ण मुस्लिम समाजासाठी खूप मोठे नुकसान असल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य दीनची खिदमत, समाजाचे भले आणि मानवतेच्या सेवेसाठी व्यतीत केले.

हजरत यांनी तरुणांना नेहमीच चांगले शिक्षण, उत्तम संस्कार आणि सन्मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली. त्यांची मेहनत, साधेपणा, उम्मतची असलेली काळजी आणि लोकांना जोडण्याची त्यांची हातोटी नेहमीच सर्वांच्या स्मरणात राहील. आज आपल्यात त्यांचे शारीरिक अस्तित्व नसले, तरी त्यांनी केलेली सत्कार्ये आणि त्यांनी दिलेली शिकवण कायम जिवंत राहील, अशा शब्दांत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

तब्लीग जमात नेमकी काय आहे?

तब्लीग जमात ही एक जागतिक सुन्नी इस्लामिक सुधारणावादी आणि आध्यात्मिक चळवळ आहे. या चळवळीची सुरुवात १९२६ मध्ये मौलाना मोहम्मद इलियास कांधलवी यांनी भारतातील मेवात भागात केली होती.

मुस्लिमांना त्यांच्या मूळ धार्मिक मूल्यांकडे आणि शिकवणीकडे परत आणणे, हा या चळवळीचा मुख्य उद्देश आहे. नियमित नमाज पठण करणे आणि साधे जीवन जगणे यावर त्यांचा भर असतो.

ही जमात राजकारण, सामाजिक वाद आणि प्रसिद्धीपासून पूर्णपणे दूर राहते. याचे सदस्य ठराविक दिवसांचा वेळ काढून गावोगावी आणि मस्जिदमध्ये प्रवास करतात आणि इतर मुस्लिम बांधवांना धर्माच्या मार्गावर चालण्याची याद करून देतात.

या चळवळीत राज्याला किंवा देशाला मार्गदर्शन करण्यासाठी एक प्रमुख असतो. या प्रमुखाला आमीर म्हटले जाते. हाफिज मंजूर हे याच तब्लीग जमातचे महाराष्ट्र राज्याचे आमीर होते.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter