मुलीसोबत दिली १२वीची परीक्षा देणाऱ्या दादू मियांना घवघवीत यश!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 21 h ago
दादू मिया आणि त्यांची मुलगी रुमा अख्तर
दादू मिया आणि त्यांची मुलगी रुमा अख्तर

 

नुरुल हक

त्रिपुरातील सिपाहीजाला जिल्ह्यात जंपुइजला ब्लॉक आहे. तिथे प्रमोद नगरमध्ये दादू मिया राहतात. ते एक माजी शिक्षक आहेत. त्यांनी आपली मुलगी रुमा अख्तर हिच्यासोबत बारावीची परीक्षा दिली. या परीक्षेत बाप-लेकीने घवघवीत यश मिळवलं. त्यांच्या या यशाने कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे.

शुक्रवारी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यात वडील आणि मुलगी दोघेही पास झाले. रुमा अख्तरला ५० टक्के गुण मिळाले. तर दादू मिया यांनी ४२ टक्के गुण मिळवले. या आगळ्यावेगळ्या यशाने कुटुंब आणि शेजाऱ्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मानवी जिद्द काय करू शकते, याचं हे एक उत्तम उदाहरण आहे.

दादू मिया यांना उच्च शिक्षणाची खूप आवड होती. पण आर्थिक अडचणींमुळे त्यांना शिक्षण पूर्ण करता आलं नाही. कुटुंबाची जबाबदारी पेलण्यासाठी त्यांना शाळा सोडावी लागली. उदरनिर्वाहासाठी त्यांनी शेती, मजुरी आणि छोटे-मोठे व्यवसाय सुरू केले.
 
२०१४ मध्ये त्रिपुरा सरकारच्या शिक्षण विभागात त्यांना नोकरी मिळाली. पदवीधर नसलेल्या शिक्षकांच्या कोट्यातून त्यांची नियुक्ती झाली होती. पण पाच वर्षांपूर्वी उच्च न्यायालयाच्या एका आदेशामुळे १०,३२३ शिक्षकांना नोकरी गमवावी लागली. यात दादू मिया यांचाही समावेश होता.
 

कुटुंबाचा गाडा हाकणारे ते एकटेच कमवते होते. नोकरी गेल्याने त्यांच्यावर मोठं आर्थिक संकट कोसळलं. तरीही त्यांनी हार मानली नाही. मुलीच्या शिक्षणासाठी आणि घरखर्चासाठी ते पुन्हा शेती आणि मजुरी करू लागले.

काही दिवसांनी त्यांच्या मुलीची बारावीची परीक्षा जवळ आली. त्यावेळी दादू मिया यांनी एक मोठा निर्णय घेतला. आपणही मुलीसोबत बारावीची परीक्षा द्यायची, असं त्यांनी ठरवलं. त्यांच्या या धाडसी निर्णयात मुलगी रुमा आणि पत्नीने त्यांना भक्कम साथ दिली.

बाप-लेकीने परीक्षेचा एकत्र अभ्यास सुरू केला. दिवसभर काबाडकष्ट केल्यानंतर ते रात्री मुलीच्या नोट्स वाचून अभ्यास करत असत. प्रमोद नगर उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांनी त्यांना बोर्डाच्या परीक्षेला बसण्यासाठी मोलाची मदत केली. अखेर २०२६ च्या त्रिपुरा बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेला दादू मिया आपल्या मुलीसोबत आत्मविश्वासाने सामोरे गेले.

या निकालामुळे ते अत्यंत आनंदी आहेत. आता येत्या काळात मुलीसोबतच कॉलेजची पदवी घेण्याची त्यांची प्रबळ इच्छा आहे.
आपल्या यशाबद्दल बोलताना ते म्हणाले, "गरिबीमुळे माझ्यासारख्या अनेक लोकांचं शिक्षणाचं स्वप्न अपूर्ण राहिलं आहे. त्यांनी आता नव्या उमेदीने पुन्हा प्रयत्न करायला हवेत. प्रामाणिक प्रयत्न केल्यास यश नक्कीच मिळतं."

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter