Zubeir Anam Mazumdar : विद्यमान आमदाराचा १ लाखांहून अधिक मतांनी पराभव करणारा हा जायंट किलर आहे तरी कोण?

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 22 h ago
झुबैर अनम मजुमदार त्यांच्या सहकार्यांसमवेत
झुबैर अनम मजुमदार त्यांच्या सहकार्यांसमवेत

 

आसाम युथ काँग्रेसचे अध्यक्ष जुबैर अनम मजुमदार यांची सध्या आसामच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. अल्गापूर-काटलीचेरा या मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेलेले जुबैर हे राज्याच्या विधीमंडळातील सर्वांत तरुण आमदारांपैकी एक ठरले आहेत. विशेष म्हणजे, कोणत्याही प्रस्थापित राजकीय घराण्याचा वारसा पाठीशी नसताना त्यांनी हा पल्ला गाठला आहे.

पेशाने वास्तुविशारद (Architect) असलेल्या जुबैर यांनी जनसेवेचा मार्ग निवडला. 'एनसयूआय'च्या (NSUI) माध्यमातून विद्यार्थी राजकारणातून त्यांच्या प्रवासाला सुरुवात झाली. टप्प्याटप्प्याने त्यांनी संघटनेत आपली जागा निर्माण केली आणि प्रदेश युथ काँग्रेसच्या अध्यक्षपदापर्यंत झेप घेतली. मात्र, अवघ्या काही महिन्यांपूर्वी ते इतक्या मोठ्या फरकाने निवडून येतील, अशी चिन्हे नव्हती.

प्रस्थापितांना धूळ चारणारा विजय सोमवारी जाहीर झालेल्या आसाम विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी सर्वांनाच चकित केले. हायलाकांडी जिल्ह्यातील अल्गापूर-काटलीचेरा मतदारसंघात तब्बल १५ उमेदवार रिंगणात होते. यात निझाम उद्दीन चौधरी आणि सुजाम उद्दीन लष्कर या दोन विद्यमान आमदारांचाही समावेश होता. मात्र, जुबैर यांनी राजकीय समीकरणे पूर्णपणे मोडून काढली. त्यांनी भाजपचा मित्रपक्ष असलेल्या 'आसाम गण परिषद'चे उमेदवार आणि विद्यमान आमदार झाकीर हुसेन लष्कर यांचा १ लाखाहून अधिक मतांच्या फरकाने पराभव करत दणदणीत विजय मिळवला.

शिक्षित कौटुंबिक पार्श्वभूमी ३५ वर्षीय जुबैर हे एका सुशिक्षित कुटुंबातून येतात. त्यांचे वडील खैरूझमान मजुमदार हे सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागात मुख्य अभियंता म्हणून निवृत्त झाले आहेत, तर आई लव्हली बेगम मजुमदार याही उच्चशिक्षित आहेत. कुटुंबात डॉक्टर, वैज्ञानिक आणि उद्योजक अशा कर्तबगार व्यक्ती असताना जुबैर यांनी लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याचे ठरवले.

विकासाचा रोडमॅप आणि सलोख्याचा संदेश विजयाचे प्रमाणपत्र हाती घेतल्यावर पत्रकारांशी बोलताना जुबैर म्हणाले की, "हा विजय केवळ माझा नसून जनतेच्या बदलाच्या आकांक्षेचा विजय आहे. मतदारांनी दाखवलेला विश्वास ही माझ्यासाठी एक नैतिक जबाबदारी आहे."

जुबैर यांनी आपल्या विकासाचा अजेंडाही स्पष्ट केला आहे. मोडकळीस आलेली पायाभूत सुविधांची पुनर्बांधणी, वाहतूक आणि दळणवळण व्यवस्था सुधारणे आणि आधुनिक सुविधा मतदारसंघापर्यंत पोहोचवणे याला त्यांनी प्राधान्य दिले आहे. यासोबतच शिक्षण व्यवस्था बळकट करणे आणि तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे हे त्यांच्या अजेंड्यावरचे मुख्य विषय आहेत.

केवळ विकासच नाही, तर सामाजिक सलोख्यावरही त्यांनी भर दिला आहे. निवडणुका संपल्या असून आता राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी विकासासाठी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले. "मी आता केवळ एका पक्षाचा प्रतिनिधी नसून संपूर्ण मतदारसंघाचा आवाज आहे," असे सांगत त्यांनी आपल्या प्रगल्भ भूमिकेचे दर्शन घडवले.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter