बकरी ईदसाठी मुंबईकरांचा मेगाप्लॅन!

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 11 h ago
मुस्लिम धर्मगुरू, नेते, वकील आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या बैठकीतील दृश्य
मुस्लिम धर्मगुरू, नेते, वकील आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या बैठकीतील दृश्य

 

भक्ती चाळक 

देशभरात बकरी ईदपूर्वी उत्सहाचे वातावरण पाहायला मिळतेय. तर दुसरीकडे सणाच्या निमित्ताने समाजात तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीही सक्रिय होताना दिसतात. धार्मिक परंपरांना राजकीय मुद्द्यांमध्ये ओढल्यामुळे सामान्य मुस्लिम नागरिकांना सण साजरा करताना नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागते. पण यंदा मुंबईकरांनी कोणत्याही भूलथापांना किंवा वादांना बळी न पडता, सणातील पवित्रता आणि सामाजिक सलोखा कसा टिकवून ठेवता येईल, यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. मुंबईतील मुस्लिम समाज आणि स्थानिक प्रशासनाने हातात हात घालून अत्यंत महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत.

सण शांततेत साजरा करण्यासाठी महत्वाचे आवाहन 

मिरा रोड आणि आसपासच्या परिसरात मुस्लिम समाजाची लोकसंख्या मोठी असून येथे सर्वच सण उत्साहात साजरे होतात. मात्र, वाढते शहरीकरण, सोसायट्यांमधील कडक नियम आणि सार्वजनिक ठिकाणांवरील मर्यादांमुळे काही वेळा वादाचे प्रसंग निर्माण होतात. दोन वर्षांपूर्वी मिरा रोड येथे सणाच्या काळात मोठा वाद झाला होता. त्याचे पडसाद राज्यासह देशभरात उमटले आणि वातावरण तणावपूर्ण बनले होते.

अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी काँग्रेस नेते मुझफ्फर हुसेन यांनी मुस्लिमांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, "येत्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिक तसेच अन्य धर्मीयांना कोणताही त्रास होणार नाही, याची विशेष काळजी मुस्लिम बांधवांनी घ्यावी. सण उत्साहात साजरा करताना सामाजिक सलोखा अबाधित राखणे ही सर्वांची जबाबदारी आहे."

मुझफ्फर हुसेन यांनी काही स्पष्ट सूचनाही दिल्या आहेत. "कुर्बानीसाठी महापालिकेने ज्या जागा ठरवून दिल्या आहेत, केवळ त्याच अधिकृत जागांचा वापर करावा. पाळीव बकऱ्यांची देखभाल करताना स्वच्छतेचे नियम पाळावेत आणि रस्ते किंवा सार्वजनिक जागांवर बकऱ्यांना उभे करून नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी. ज्या सोसायट्यांमध्ये कुर्बानी किंवा सामूहिक प्रार्थनेबाबत काही निर्बंध किंवा आक्षेप असतील, तेथे वाद न घालता शांततेच्या मार्गाने प्रश्न सोडवावेत." असे त्यांनी सांगितले. 

ते पुढे म्हणाले की, "धार्मिक सण हे आनंद, बंधुभाव आणि सामाजिक एकोपा वाढवण्यासाठी असतात. त्यामुळे कोणत्याही कृतीमुळे समाजात तणाव निर्माण होणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी." 

विचारवंत, धर्मगुरू आणि वकिलांची बैठक

सण शांततेत पार पाडण्यासाठी केवळ आवाहने करून मुस्लिम समाज थांबलेला नाही, तर त्यांनी कायदेशीर पातळीवरही कंबर कसली आहे. मुंबईत नुकतीच इस्लामिक विचारवंत, मुस्लिम नेते, वकील आणि सामाजिक कार्यकर्त्यांची एक मोठी बैठक पार पडली. या बैठकीत कायदा-सुव्यवस्था आणि पालिकेच्या मार्गदर्शक तत्त्वांवर सविस्तर चर्चा झाली.

काही वेळा सणाच्या काळात गोरक्षणाच्या नावाखाली वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होतो, हा मुद्दा या बैठकीत प्रामुख्याने समोर आला. यावर बोलताना ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (AIMIM) चे प्रवक्ते वारीस पठाण म्हणाले, "काही लोक गोरक्षणाच्या नावाखाली बकरी ईदच्या सणादरम्यान जाणीवपूर्वक गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. व्यक्ती अनेकदा रस्त्यावर वाहने अडवतात आणि तणाव निर्माण करतात. अशा समस्यांवर कायदेशीर मार्गाने तोडगा काढण्यासाठी, तक्रारींचे निवारण करण्यासाठी आणि सणाच्या काळात वाद टाळण्यासाठी एक विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे."

याच बैठकीत वकील अमीन सोळकर यांनीही नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करताना प्रशासनाची मदत घेणार असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, "नागरिकांनी बकरी ईद शांततेत साजरी करावी आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेने घालून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. नागरी मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जिथे गरज असेल तिथे पोलिसांची मदत घेतली जाईल."

कायद्याचे पालन करण्याचे धर्मगुरुंचे आवाहन 

भारताची मूळ संस्कृती ही सलोख्याची आहे आणि ती टिकवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, हा सूर बैठकीत पाहायला मिळाला. मुस्लिम धर्मगुरू मुफ्ती मोहम्मद अश्फाक काझी यांनी याच मुद्द्यावर बोट ठेवत नागरिकांना कायदेशीर चौकटीत राहण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, "भारताची ही सलोख्याची परंपरा कायम राखली पाहिजे आणि सर्व सण नेहमीप्रमाणे शांततेत साजरे केले पाहिजेत. मुस्लिम समुदायातील नागरिकांनी पालिकेच्या नियमांचे पालन करावे. मुंबई महापालिकेकडे जनावरांची नोंदणी करावी. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्या घटनांना आळा घालण्यासाठी वकिलांची एक विशेष टीम काम करणार आहे."

प्रशासनाचा चोख बंदोबस्त : भिवंडी पालिकेचे महानियोजन

मुस्लिम समाजाने घेतलेल्या या सकारात्मक निर्णयानंतर प्रशासनानेही आपली संपूर्ण यंत्रणा कामाला लावली आहे. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेने तर यंदा स्वच्छता आणि सुव्यवस्थेसाठी मोठे नियोजन केले आहे. महापालिका आयुक्तांनी स्वतः तीन उच्चस्तरीय आढावा बैठका घेऊन संपूर्ण तयारीचा आढावा घेतला.

भिवंडीत केवळ निश्चित आणि मान्यताप्राप्त ठिकाणीच प्राण्यांची कुर्बानी देण्यास परवानगी असेल. म्हाडा कॉलनी येथील बकरा बाजाराचे नियोजन पालिकेने पूर्ण केले असून, कुर्बानीच्या दिवशी प्राण्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी विशेष पशुवैद्यकीय अधिकारी तैनात केले आहेत. नागरिकांनी प्राण्यांची तपासणी करून घेऊन ठराविक शुल्क भरून पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कुर्बानीनंतर जागा तात्काळ स्वच्छ करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने ३५ पाण्याचे टँकर सज्ज ठेवले आहेत. तर प्राण्यांचा कचरा थेट डम्पिंग ग्राऊंडवरील विशेष खड्ड्यांपर्यंत वाहून नेण्यासाठी वाहन विभागाने सुमारे २०० टेम्पो आणि डंपर, १७ जेसीबी मशिन्स आणि ३ क्रेन मैदानात उतरवल्या आहेत. दुर्गंधी पसरू नये यासाठी कचरा टाकल्यानंतर तिथे नियमितपणे जंतूनाशक फवारणी केली जाईल. न्यायालयाच्या आदेशांचे पालन करत शांततेत सण साजरा करण्याचे आवाहन भिवंडी पालिकेने केले आहे.

व्यापाऱ्यांच्या मदतीसाठी मुंबई पोलिसांची हेल्पलाईन

सणाच्या काळात जनावरांची कायदेशीर वाहतूक करणाऱ्या व्यापाऱ्यांना, वाहतूकदारांना किंवा खरेदीदारांना काही समाजकंटकांकडून नाहक त्रास दिला जातो. हा त्रास रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी मोठे पाऊल उचलले आहे. पोलिसांनी थेट हेल्पलाईन क्रमांक जारी केले असून, कोणत्याही अधिकृत विक्रीच्या ठिकाणी किंवा वाहतुकीदरम्यान अडचण आल्यास मुख्य नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

मुंबई पोलिसांनी जारी केलेले हेल्पलाईन क्रमांक:

८९७६७५४१०० / ०२२-२२६२३०५४

व्यापाऱ्यांनी आणि खरेदीदारांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण कराव्यात आणि कोणत्याही प्रकारचा छळ किंवा अडवणूक झाल्यास तात्काळ या क्रमांकांवर फोन करावा, असे पोलिसांनी सांगितले आहे. सणाच्या संपूर्ण काळात मुंबई पोलीस संपूर्ण शहरात कडक देखरेख आणि चोख सुरक्षा व्यवस्था तैनात ठेवणार आहेत.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter