इबोला (Ebola) विषाणूचा वाढता प्रादुर्भाव असलेल्या आफ्रिकन देशांमधून येणाऱ्या किंवा तिथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी भारताने आरोग्यविषयक विशेष मार्गदर्शक तत्त्वे (Health Advisory) जारी केली आहेत. ज्या प्रवाशांना इबोलाची लक्षणे आहेत किंवा जे बाधित रुग्णांच्या संपर्कात आले आहेत, त्यांनी इमिग्रेशन क्लिअरन्सपूर्वी विमानतळ आरोग्य अधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क साधावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
आरोग्य सेवा महासंचालनालयाने (DGHS) जारी केलेल्या या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये विशेषतः डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान येथून येणाऱ्या प्रवाशांचा उल्लेख करण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या देशांना 'उच्च-जोखमीचे देश' (High-risk countries) म्हणून वर्गीकृत केले आहे. दिल्ली विमानतळावर एअरपोर्ट हेल्थ ऑर्गनायझेशनद्वारे (APHO) ही नियमावली प्रदर्शित करण्यात आली आहे.
विमानतळांवर प्रवाशांसाठी विशेष मार्गदर्शक सूचना
प्रवाशांनी ताप, अशक्तपणा, डोकेदुखी, स्नायुदुखी, उलट्या, जुलाब, घसा खवखवणे आणि शरीरातून अचानक रक्तस्त्राव होणे यांसारख्या लक्षणांवर बारकाईने लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच, संशयित किंवा निश्चित झालेल्या इबोला रुग्णाच्या रक्त किंवा शरीरातील द्रवांच्या थेट संपर्कात आलेल्या प्रवाशांनी त्वरित विमानतळावरील आरोग्य अधिकाऱ्याला किंवा आरोग्य डेस्कला माहिती देणे अनिवार्य करण्यात आले आहे.
एअरपोर्ट हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, भारतात आल्यानंतर २१ दिवसांच्या आत जर कोणत्याही प्रवाशामध्ये ही लक्षणे दिसून आली, तर त्यांनी तात्काळ वैद्यकीय मदत घ्यावी आणि प्रशासनाला आपल्या प्रवासाच्या इतिहासाबद्दल माहिती द्यावी.
भारतात इबोलाचा एकही रुग्ण नाही; प्रशासनाची खबरदारी
केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी बुधवारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य सचिवांसोबत उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. यामध्ये इबोलाच्या पार्श्वभूमीवर देशातील तयारी आणि प्रतिबंधात्मक उपायांवर चर्चा करण्यात आली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, भारतात आतापर्यंत इबोलाचा एकही रुग्ण आढळलेला नाही.
मात्र, जागतिक आरोग्य संघटनेने इबोलाला 'आंतरराष्ट्रीय स्तरावरील सार्वजनिक आणीबाणी' (PHEIC) घोषित केल्यामुळे, भारत सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून देशभरात पाळत ठेवणे आणि तयारीच्या उपाययोजना वाढवल्या आहेत. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सर्व स्तरांवर सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. प्रवाशांची स्क्रीनिंग, क्वारंटाईन प्रोटोकॉल, केस मॅनेजमेंट आणि प्रयोगशाळा चाचणी यासारख्या विस्तृत मानक कार्यपद्धती (SOPs) राज्यांसोबत सामायिक करण्यात आल्या आहेत.