'देशावर प्रेम करणे हाच खरा ईमान'; अजमेरमधील 'मेरा मुल्क मेरी पहचान' परिषदेत उमटला सूर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 11 h ago
अजमेरमध्ये पार पडलेल्या मेरा मुल्क मेरी पेहचान कार्यक्रमातील क्षण
अजमेरमध्ये पार पडलेल्या मेरा मुल्क मेरी पेहचान कार्यक्रमातील क्षण

 

"आपला देश हीच आपली सर्वात मोठी ओळख आहे. खरा जिहाद कोणाचा द्वेष करणे हा नसून, स्वतःला एक चांगला माणूस बनवणे हा आहे. जर जिहाद करायचाच असेल, तर मुलांना चांगले शिक्षण देण्याचा जिहाद करा. देशातून द्वेष मिटवण्याचा जिहाद करा." असा अत्यंत पुरोगामी आणि प्रेरणादायी संदेश अजमेरच्या ऐतिहासिक भूमीतून संपूर्ण जगाला देण्यात आला आहे.

अजमेर येथील जवाहर रंगमंच येथे 'ऑल इंडिया सुफी सज्जादानशीन कौन्सिल'तर्फे 'मेरा मुल्क मेरी पहचान' या ऐतिहासिक आणि भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी (१९ मे) पार पडलेल्या या कार्यक्रमात शहर आणि परिसरातील हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. संपूर्ण सभागृह 'मेरा मुल्क मेरी पहचान'च्या घोषणांनी दणाणून गेले होते. देशात शांतता, बंधुभाव, माणुसकी, राष्ट्रीय एकता आणि सांप्रदायिक सौहार्द प्रस्थापित करणे, हा या भव्य आयोजनाचा मुख्य उद्देश होता.

सर्वात आधी आपण 'भारतीय' आहोत

या विशेष परिषदेत सुफी सज्जादानशीन कौन्सिल आणि ख्वाजा गरीब नवाज यांच्या विचारधारेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दीवान साहेबांनी अत्यंत परखड विचार मांडले. ते म्हणाले, "भारत हा विविध धर्म, भाषा आणि संस्कृतींचा देश आहे. मात्र, या सर्वांच्या पलीकडे आपली सर्वात मोठी ओळख आपला देश आहे. आपण कोणत्याही धर्माचे असलो, तरी सर्वात आधी आपण भारतीय आहोत आणि हीच आपली खरी ताकद आहे. इस्लाम आपल्याला हेच शिकवतो की, ज्या देशात तुम्ही राहता त्या देशाशी एकनिष्ठ राहा, त्याच्यावर प्रेम करा. देशावर प्रेम करणे हाच खरा ईमान आणि माणुसकीचा भाग आहे."

हाच खरा 'जिहाद' आणि हीच माणुसकीची सेवा

आज जगात आणि देशात धार्मिक कट्टरतावाद आणि युद्धाचे वातावरण निर्माण केले जात आहे, यावरही त्यांनी स्पष्ट शब्दांत प्रहार केला. "आज जिहादच्या नावाखाली गैरसमज पसरवले जात आहेत. मात्र, खरा जिहाद कोणाचा द्वेष करणे हा नाही, तर स्वतःला एक चांगला माणूस बनवणे हा आहे. जर जिहाद करायचाच असेल, तर आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्याचा जिहाद करा. त्यांना यशस्वी, शरीफ आणि माणुसकीच्या मार्गावर चालवण्याचा जिहाद करा. समाजात शांतता प्रस्थापित करण्याचा आणि देशातून नफरत (द्वेष) मिटवण्याचा जिहाद करा. हीच खरी माणुसकीची सेवा आहे," असा अत्यंत महत्त्वाचा विचार त्यांनी मांडला.

कोणत्याही धर्मात कट्टरतावादाला थारा नाही

कोणताही धर्म कट्टरतावादाला (Extremism) शिकवत नाही, हे स्पष्ट करताना ते म्हणाले, "एक शांत आणि सभ्य माणूस नेहमी सर्वांना सोबत घेऊन चालण्याचीच भाषा करतो. तो कोणाचाही द्वेष करत नाही. धर्म तलवारीने नाही, तर माणसाच्या आचरणातून (अखलाक) ओळखला जातो. धर्म लहान किंवा मोठा नसतो, तर माणूस मोठा असायला हवा. माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म आहे."

सर्वधर्मीय नेत्यांची एकाच मंचावर उपस्थिती

या कार्यक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे सर्व धर्मांचे धर्मगुरू, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि विचारवंत एकाच मंचावर उपस्थित होते. सर्वांनी मिळून भारताची 'गंगा-जमुनी तहजीब', आपापसातील बंधुभाव आणि एकता मजबूत करण्याची शपथ घेतली. आपण द्वेषाला प्रेमाने, हिंसेला शांततेने आणि दुहीला माणुसकीने उत्तर देऊ, असा निर्धार यावेळी करण्यात आला.

कार्यक्रमाला पुष्कर गुरुद्वाराचे राज वालिया, इदारा-ए-दावतुल हकचे मौलाना अयुब कासमी, विविध समाजांचे अध्यक्ष जसे की रियाज मंसुरी, शकील अब्बासी, सर्व धर्म एकता समितीचे रफीक कादरी, तसेच बोहरा समाज, कुरेशी समाज आणि अजमेरमधील अनेक पंचायतींचे प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एका सुरात 'मेरा मुल्क मेरी पहचान'चा नारा देत भारताची एकता आणि अखंडता अधिक मजबूत करण्याचा संदेश दिला.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter