दिवंगत मुलगा शिवम कुमार याच्या स्मृतीप्रीत्यर्थ मुस्लिम समाजाला कब्रस्तानासाठी केली जमीन दान
ओनिका महेश्वरी
बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील चौसा तालुक्यातील 'देबे देहरा' गावातून माणुसकी आणि सामाजिक सलोख्याचे एक असे उदाहरण समोर आले आहे, ज्याने संपूर्ण परिसराचे मन जिंकले आहे. येथील एका हिंदू कुटुंबाने आपल्या दिवंगत मुलाच्या स्मृतीप्रीत्यर्थ मुस्लिम समाजाला कब्रस्तानासाठी चक्क एक बिघा (२७,२२० चौरस फूट) जमीन दान केली आहे. या निर्णयामुळे 'गंगा-जमुनी तहजीब' (सामाजिक सौहार्द) अधिक मजबूत झाली आहे.
देहराडून अपघातात विझला घराचा दिवा
देबे देहरा गावातील रहिवासी जनार्दन सिंह यांचा २५ वर्षांचा मोठा मुलगा शिवम कुमार याचा १८ नोव्हेंबरला डेहराडून येथे एका भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला. एका भरधाव कारने त्याला धडक दिली आणि या अपघाताने संपूर्ण कुटुंब शोकाकुळ झाले.
शिवम हा कुटुंबाचा आर्थिक कणा होता. तो आपल्या हिंमतीवर तीन कारखाने (फॅक्टरी) चालवत होता. विशेष म्हणजे याच वर्षी त्याच्या लग्नाची तयारी सुरू होती, पण एका क्षणात सारे काही उद्ध्वस्त झाले. त्याच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

गावचा प्रत्येक जीव हळहळला
शिवमचे काका बिरज राज सिंह यांनी सांगितले की, शिवम केवळ आपल्या कुटुंबाचाच नाही, तर संपूर्ण गावाचा आधार होता. गरजूंना मदत करणे आणि समाजासाठी काहीतरी करणे हा त्याचा स्वभावच होता. त्याच्या अवेळी जाण्याने गावातील प्रत्येक व्यक्ती दुःखी झाली.
श्राद्धाच्या दिवशी घेतला ऐतिहासिक निर्णय
सोमवारी शिवमचे श्राद्ध आयोजित करण्यात आले होते. या शोकाकुल वातावरणात कुटुंबाने एक असा निर्णय घेतला, जो माणुसकीचे उत्तम उदाहरण बनला. शिवमच्या आठवणीत जनार्दन सिंह यांच्या कुटुंबाने पंचायतीच्या मुस्लिम समाजाला वापरण्यासाठी एक बिघा जमीन कब्रस्तानासाठी दान करण्याची घोषणा केली. ही जमीन लवकरच पूर्णपणे मुस्लिम समाजाला सोपवली जाईल.
'शिवम उर्फ अहिर धाम कब्रस्तान'
दान केलेल्या या जमिनीचे नाव 'शिवम उर्फ अहिर धाम कब्रस्तान' असे ठेवण्यात आले आहे. काका बिरज राज सिंह म्हणाले, "शिवमचा नेहमीच बंधुभाव आणि परस्पर सौहार्दावर विश्वास होता. त्याचा हा संदेश पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचावा, अशी आमची इच्छा आहे."
वडिलांचे काळीज पिळवटून टाकणारे शब्द
दुःखात बुडालेले वडील जनार्दन सिंह म्हणाले, "माझ्यावर काय वेळ आली आहे, हे मी शब्दात सांगू शकत नाही. देवाने असे दुःख कोणालाही देऊ नये." यावेळी त्यांनी एका महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधले. रस्ते जितके महत्त्वाचे आहेत, तितकेच दर २० किलोमीटरवर रुग्णवाहिकेची सोय असणेही गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. वेळेवर उपचार मिळाले असते तर कदाचित माझा मुलगा वाचला असता, अशी खंत त्यांच्या बोलण्यातून जाणवत होती.
५० मुस्लिम कुटुंबांच्या जुन्या समस्येचे समाधान
देबे देहरा गावात अनेक वर्षांपूर्वी एक कब्रस्तान होते. पण त्या जागेवर शाळा बांधण्यात आली. यामुळे दोन समस्या निर्माण झाल्या. पहिली म्हणजे गावातील मुस्लिमांच्या जुन्या कबरींच्या खुणा मिटल्या आणि दुसरी म्हणजे मृत्यूनंतर आता मृतदेह कुठे दफन करायचा?
गावात सुमारे ५० मुस्लिम कुटुंबे राहतात, पण आतापर्यंत त्यांच्याकडे दफन करण्यासाठी हक्काची जागा नव्हती. कोणाचा मृत्यू झाला तर मृतदेह पाच किलोमीटर दूर दुसऱ्या गावी न्यावा लागत असे. यामुळे अनेकदा वादही होत. नाइलाजाने काही जणांना नदी-नाल्याच्या काठी मृतदेह दफन करावे लागत होते. आता जमीन मिळाल्याने गावातील मुस्लिमांची ही मोठी अडचण दूर झाली आहे.
"ते आमच्यासाठी मसीहा बनून आले"
गावातील वीटभट्टी कामगार अलाउद्दीन सांगतात, "पूर्वी गावात कब्रस्तान होते. आमचे पूर्वज तिथेच दफन आहेत. पण आम्ही अशिक्षित होतो, त्यामुळे कोणी कब्रस्तानाचे कागदपत्र बनवले नाहीत. नंतर त्याच जागेवर शाळा झाली, तेव्हा शाळेच्या जागेवर कोणालाही दफन करता येणार नाही, असे बंधन आले. आमच्यासाठी ही खूप मोठी समस्या झाली होती."
अलाउद्दीन पुढे भावूक होऊन म्हणाले, "अशा कठीण काळात जनार्दन सिंह आमच्यासाठी मसीहा (देवदूत) बनून आले आणि त्यांनी कब्रस्तानासाठी आम्हाला आपली जमीन देऊन समस्येचे समाधान केले."
आठवणीत लावली झाडे
याच दिवशी कुटुंबाने शिवमच्या स्मरणार्थ वृक्षारोपणही केले. कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, ही रोपे शिवमप्रमाणेच मोठी होतील आणि त्याच्या साधेपणाची, दयाळूपणाचे आणि माणुसकीचे प्रतीक बनतील.

हिंदू कुटुंबाने मुस्लिम समाजासाठी उचललेले हे पाऊल संपूर्ण बक्सर जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरले आहे. लोक जनार्दन सिंह आणि त्यांच्या कुटुंबाला सलाम करत आहेत. देबे देहरा गावाची ही कहाणी केवळ एका दानाची नाही, तर त्या गंगा-जमुनी संस्कृतीची आहे, जिथे धर्मापेक्षा माणुसकीला वरचे स्थान आहे.