बुलंदशहरात हिंदू कुटुंबाच्या घराला आग लागताच नमाज सोडून मदतीला धावले मुस्लिम

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 10 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

एका हिंदू कुटुंबाच्या घराला आग लागल्याची घटना घडली तेव्हा जवळच्याच मस्जिदमध्ये तरावीहची नमाज अदा करणारे भाविक तातडीने आग विझवण्यासाठी धावून आले. या भाविकांनी मस्जिदमधील पाण्याचा पाईप वापरून आग विझवण्यास मदत केली आणि अनेक लोकांचे प्राण वाचवले. इतकेच नाही तर एका भाविकाने चक्क दुचाकीवरून जाऊन अग्निशमन दलाला पाचारण केले.

ही घटना बुलंदशहरमधील कोतवाली नगर परिसरातील फैसलाबाद भागात घडली. येथील एका घरात ठेवलेल्या गॅस सिलिंडरने अचानक पेट घेतला आणि मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

संबंधित घर एका मस्जिदच्या अगदी मागे आहे. ज्यावेळी ही दुर्घटना घडली त्यावेळी मशिदीत तरावीहची नमाज सुरू होती. आग लागल्याचे समजताच भाविकांनी तात्काळ नमाज थांबवली आणि मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मस्जिदीतून पाणी आणून आणि पाईपद्वारे सतत पाण्याचा मारा करून आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले.

या घटनेबद्दल बोलताना स्थानिक रहिवासी संदीप यांनी सांगितले की, "ज्यावेळी इथे आग लागली, त्यावेळी आमचे मुस्लिम बांधव मस्जिदमध्ये तरावीहची नमाज अदा करत होते. आग लागल्याचे समजताच ते सर्व नमाज सोडून मदतीसाठी धावून आले. सर्वांनी मिळून आग विझवण्यासाठी खूप सहकार्य केले. इथे कोणताही भेदभाव न पाळता प्रत्येकाने आपले कर्तव्य चोखपणे बजावले."

स्थानिक रहिवाशांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आणि मोठी दुर्घटना टळली. माणुसकी आणि पाठिंब्याची ही कृती आपण कधीही विसरणार नाही, अशा भावना बाधित कुटुंबाने व्यक्त केल्या आहेत. कुटुंबातील एका तरुणाने कृतज्ञता व्यक्त करत म्हटले की, "आमच्या घराच्या शेजारीच मशीद आहे. तिथून लोक तरावीह सोडून आले आणि त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी खूप मदत केली. आमचे एक मुस्लिम शेजारी आहेत, त्यांनी तर स्वतःहून आग विझवण्यासाठी पाण्याची व्यवस्था केली. आणि त्यांनी आग विजवण्यासाठी सहकार्य केले आहे."

स्थानिक रहिवाशांनी ही घटना बंधुभाव आणि माणुसकीचे प्रतीक असल्याचे सांगितले. एका स्थानिक तरुणाने सांगितले की, "जशी आगीची तीव्रता वाढली तसे लोकांनी नमाज सोडली आणि पूर्ण ताकदीनिशी मदतीसाठी धावले. मस्जिदमधून पुरवलेल्या पाण्याने आग विझवण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. मुस्लिम शेजारी नमाज सोडून इथे मदतीला आल्याने खऱ्या बंधुभावाचे दर्शन घडले. ही घटना जातीय सलोख्याचे एक सकारात्मक उदाहरण बनली असून कठीण काळात आजही माणुसकी टिकून आहे, हेच यातून सिद्ध झाले."


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter