दिवाळीचा सण म्हणजे प्रकाशाचा, आनंदाचा आणि नात्यांचा उत्सव. याच सणातील एक महत्त्वाचा दिवस म्हणजे भाऊबीज. बहीण-भावाच्या पवित्र नात्याला समर्पित हा दिवस. समाजातील काही माणसे या नात्याच्या पलीकडे जाऊन संपूर्ण समाजालाच आपले कुटुंब मानतात. याचेच एक प्रेरणादायी उदाहरण रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात पाहायला मिळाले. दुबईतील प्रसिद्ध उद्योजक आणि मूळचे खेड तालुक्यातील उधळे गावचे सुपुत्र बशीर हजवानी यांनी एक अनोखी भाऊबीज साजरी करत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे आदर्श उदाहरण समाजाला दिले आहे.
सोमवारी २० ऑक्टोबरला उधळे गावात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बशीर हजवानी यांनी पंचक्रोशीतील सुमारे सोळाशे महिलांचे भाऊ बनून त्यांचा भेटवस्तू देऊन सन्मान केला. हा कार्यक्रम म्हणजे जणू दोन धर्मांना जोडणारा एक भावनिक सोहळा होता. परिसरातील महिला, नागरिक आणि अनेक मान्यवर या अनोख्या भाऊबीजेचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बशीर हजवानी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांचे शब्द प्रत्येकाच्या हृदयाला भिडणारे होते. ते म्हणाले, “आपले धर्म वेगवेगळे असतील, परंतु आपण केवळ माणुसकी मानायला हवी. दिवाळी असो किंवा ईद, आनंदाचा प्रत्येक क्षण आपण सर्वांनी मिळून साजरा केला पाहिजे. हाच खऱ्या भारतीय संस्कृतीचा संदेश आहे.”
कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान दिसत होते. या उपक्रमामुळे परिसरात ऐक्य, सौहार्द आणि बंधुत्वाची भावना अधिक घट्ट झाली झाल्याचे ग्रामस्तांचे म्हणणे आहे.
बशीर हजवानी हे गेल्या अनेक वर्षांपासून उधळे परिसरात विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय आहेत. त्यांचे कार्य केवळ एका विशिष्ट समाजापुरते मर्यादित नाही. त्यांचा हा सेवाभाव मानवतेसाठी आहे. दिवाळीच्या प्रकाशात त्यांनी लावलेली ही सामाजिक सलोख्याची पणती समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.