१७ रमजान : जंग-ए-बद्रतून मिळते नैतिक आणि मानवी मुल्यांची शिकवण

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

आमिर सुहेल वानी

इसवी सन ६२४ मध्ये मदिनेजवळील वाळवंटात लढली गेलेली बद्रची लढाई ही इस्लामिक इतिहासातील अत्यंत महत्त्वाची घटना मानली जाते. मात्र, तिचे महत्त्व केवळ त्या काळातील लष्करी विजयापुरते मर्यादित नाही.

आजच्या युगात, जिथे सगळीकडे दीर्घकाळ चालणारे संघर्ष आणि हिंसाचार सामान्य झाला आहे, तिथे बद्रची लढाई जगाला एक नवी नैतिक भाषा शिकवते. ही केवळ संकटावर मात करून मिळवलेल्या विजयाची गोष्ट नाही. संघर्षाच्या काळातही संयम, प्रतिष्ठा आणि मानवी जीवनाचे पवित्र जपण्याचा हा एक अत्यंत नैतिक धडा आहे.

बद्रची लढाई आजच्या काळातील त्या समजूतीला आव्हान देते की, युद्ध सुरू झाले की नैतिकतेच्या सर्व सीमा पुसल्या जातात. प्रेषित मोहम्मद यांच्या नेतृत्वाखालील सुरुवातीचा मुस्लीम समाज अस्तित्वाच्या धोक्याचा सामना करत रणांगणात उतरला होता.

त्यांच्यासमोर संख्येने खूप जास्त आणि शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेले सैन्य होते. तरीही, त्यांच्या वागण्यात केवळ शौर्य नव्हते, तर एक कडक नैतिक शिस्त होती. विनाकारण रक्त सांडू नका, मृतदेहांची विटंबना करू नका आणि युद्धकैद्यांशी दयेने वागा, अशा स्पष्ट सूचना तिथे देण्यात आल्या होत्या.

आजच्या काळात जिथे सैनिक आणि सामान्य नागरिक यांच्यातील फरक पुसट झाला आहे, तिथे बद्रची लढाई आठवण करून देते की कठीण परिस्थितीतही नैतिक स्पष्टता राखणे शक्य आहे. या लढाईतील सर्वात महत्त्वाचा धडा म्हणजे संयम. विजय मिळाला म्हणून तिथे सूड घेतला गेला नाही.

या काळात आकाराला आलेल्या कुराणातील तत्त्वांनी नेहमीच शक्य असेल तिथे माफी देण्यास प्रोत्साहन दिले. युद्धकैद्यांचा अपमान केला गेला नाही किंवा त्यांचा छळ झाला नाही. उलट अनेकांशी दयाळूपणे वागले गेले. काही कैद्यांना तर केवळ साक्षरता प्रसार करण्याच्या बदल्यात मुक्त करण्यात आले.

आजच्या काळात जिथे कैद्यांचा वापर राजकीय सौदेबाजीसाठी किंवा छळासाठी केला जातो, तिथे हे उदाहरण अगदी वेगळे ठरते. बद्रची लढाई सत्तेची व्याख्याच बदलून टाकते. सत्ता म्हणजे दुसऱ्यावर वर्चस्व गाजवण्याची क्षमता नव्हे, तर वरचढ असतानाही स्वतःवर ताबा ठेवण्याची क्षमता होय.

ही लढाई मानवी जीवनाच्या प्रतिष्ठेवरही भर देते. संघर्षाच्या काळातही समोरचा शत्रू विचाराने विरोधात असला, तरी तो एक माणूसच आहे, याची जाणीव तिथे ठेवली गेली. आजच्या काळात युद्धाचे समर्थन करण्यासाठी शत्रूला 'अमानवीय' ठरवले जाते. मात्र, बद्रची लढाई या विचाराला छेद देते.

रणांगणाच्या सीमेवर नैतिक जबाबदारी संपत नाही, असे ती ठामपणे सांगते. संघर्ष अटळ असला तरी समोरच्याची माणुसकी अबाधित राहिली पाहिजे, हाच संदेश तिथून मिळतो. बद्रचा न्यायाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही तितकाच सखोल आहे. हे साम्राज्य विस्तारासाठी केलेले युद्ध नव्हते, तर ते जगण्यासाठी केलेले युद्ध होते.

सुरुवातीच्या मुस्लीम समाजाला छळ, विस्थापन आणि आर्थिक नाकेबंदीचा सामना करावा लागला होता. त्यामुळेच ही लढाई आक्रमक नसून बचावात्मक होती. आजच्या 'न्याय्य युद्ध' सिद्धांताच्या चर्चेत हा फरक अत्यंत महत्त्वाचा आहे. युद्धाची वैधता केवळ ते कसे लढले जाते यावर नाही, तर ते का लढले जाते यावर अवलंबून असते.

या युद्धाची मानसिक आणि आध्यात्मिक बाजूही तितकीच महत्त्वाची आहे. युद्धात सहभागी असलेल्यांना स्वतःच्या मर्यादांची पूर्ण कल्पना होती. त्यांचा विश्वास केवळ रणनीतीवर नव्हता, तर एका उच्च नैतिक मूल्यावर होता. या जाणीवेमुळे त्यांच्यात अहंकार निर्माण न होता नम्रता आली.

आजच्या युद्धात तंत्रज्ञाना मुजोरी दिसून येते. विद्ध्वंस करण्याच्या क्षमतेमुळे आपण अजिंक्य आहोत असा भास निर्माण होतो. बद्र आपल्याला आठवण करून देते की खरी ताकद केवळ बळात नसून नैतिक सुसंगतीमध्ये असते. हीच सुसंगती संकटाच्या काळात समाजाला टिकवून धरते.

संकटाच्या काळात नेतृत्व कसे असावे, याचेही प्रतिबिंब बद्रमध्ये दिसते. प्रेषित मोहम्मद यांचे नेतृत्व सल्लामसलत आणि ऐकून घेण्याच्या वृत्तीवर आधारित होते. निर्णय एकतर्फी लादले गेले नाहीत, तर सहकाऱ्यांशी संवाद साधून ते घेतले गेले.

आजच्या काळात जिथे सत्ता एकाच हातात एकवटलेली दिसते, तिथे बद्रचे हे नेतृत्व मॉडेल सर्वांना सामावून घेणारे वाटते. तसेच, बद्रची लढाई भौतिकवादावर टीका करते. संख्याबळ कमी असूनही, त्या काळातील मुस्लिमांनी केवळ भौतिक फायद्यावर यशाचे मोजमाप केले नाही.

त्यांचा पूर्ण भर नैतिक सचोटीवर होता. आजच्या काळात यश म्हणजे केवळ वर्चस्व मिळवणे, असे मानले जाते. जागतिक संघर्षांच्या मुळाशी अनेकदा आर्थिक हितसंबंध असतात. अशा वेळी बद्र आपल्याला धोरणात्मक फायद्यापेक्षा मानवी कल्याणाला प्राधान्य देण्याचे आवाहन करते.

बद्रमध्ये दाखवलेली ही नैतिक चौकट पर्यावरणाच्या रक्षणापर्यंत विस्तारलेली होती. पिकांची नासाडी करू नका, बिगर सैनिकांना इजा करू नका आणि गरजेपेक्षा जास्त विद्ध्वंस करू नका, अशा सूचना होत्या. आजच्या युद्धात जिथे संपूर्ण शहरे उद्ध्वस्त केली जातात, तिथे बद्रचे हे पैलू अधिक महत्त्वाचे वाटतात.

विजयानंतर बद्रमध्ये उत्तरदायित्वाची भावना दिसून आली. विजयामुळे तिथे उन्माद निर्माण झाला नाही, तर आत्मपरीक्षण केले गेले. यश ही एक नैतिक जबाबदारीची परीक्षा आहे, यावर भर दिला गेला. आजच्या संघर्षात या जबाबदारीची जाणीव हरवलेली दिसते.

आजच्या जगात जिथे प्रसारमाध्यमांतून सतत हिंसाचार समोर येतो, तिथे बद्रची लढाई मनाला उभारी देते. कोणताही समाज आपली नैतिक दिशा न हरवता संकटांना सामोरे जाऊ शकतो, हे त्यातून सिद्ध होते. संयम, एकता आणि विश्वास हीच खरी आंतरिक शक्ती ठरते.

कदाचित बद्रचा सर्वात मोठा धडा म्हणजे समेट किंवा पुनर्मिलनाची शक्यता. जे एकेकाळी कट्टर शत्रू म्हणून उभे होते, तेच नंतर एकाच समाजाचा भाग बनले. हे परिवर्तन सक्तीने झाले नाही, तर सातत्याने दाखवलेल्या नैतिक वर्तणुकीमुळे शक्य झाले.

खऱ्या अर्थाने विजयी होणे म्हणजे काय, याचाही फेरविचार बद्र आपल्याला करायला लावते. आजच्या काळात विजय म्हणजे जमिनीचा तुकडा जिंकणे असे मानले जाते. पण बद्र विजयाची व्याख्या 'दबावाखाली असतानाही आपली नैतिक अखंडता टिकवून ठेवणे' अशी करते.

बद्रचा इतिहास अभ्यासणे म्हणजे आपल्या समजुतींना आव्हान देणाऱ्या एका नैतिक क्षितिजाचा अनुभव घेणे आहे. जिथे संघर्ष अटळ असला तरी न्याय, करुणा आणि प्रतिष्ठा यांसारख्या तत्त्वांशी तडजोड केली जाणार नाही, अशा जगाची कल्पना करण्यास ते आपल्याला प्रवृत्त करते.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter