अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणमधील सर्वोच्च नेते मोजताबा खामेनी
इराण आता शरणागती पत्करण्याच्या तयारीत असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी G7 देशांच्या नेत्यांसोबत झालेल्या आभासी बैठकीत सांगितले. 'ॲक्सिओस'ने याबद्दलचे वृत्त दिले आहे. या चर्चेदरम्यान ट्रम्प यांनी 'ऑपरेशन एपिक फ्युरी'च्या निकालांबद्दल समाधान व्यक्त केले. "आपल्या सर्वांना धोक्यात टाकणारा कर्करोग मी मुळापासून उपटून टाकला आहे," अशा शब्दांत त्यांनी मित्रराष्ट्रांना माहिती दिली. इराणमध्ये सध्या त्यांचा नेता कोण आहे, हेच कोणाला माहित नसल्याने ते अधिकृतपणे शरणागती जाहीर करू शकत नसल्याचा दावाही ट्रम्प यांनी केला.
या अहवालानुसार, G7 नेत्यांनी ट्रम्प यांना हे युद्ध लवकर संपवण्याचे आणि होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षित करण्यावर भर देण्याचे आवाहन केले. या धोरणात्मक मार्गाबाबत बोलताना ट्रम्प म्हणाले की, परिस्थिती सुधारत असून व्यापारी जहाजे लवकरच या भागात आपली वाहतूक पुन्हा सुरू करू शकतील. मात्र, त्याच रात्री इराणच्या स्फोटकांनी भरलेल्या बोटींनी इराकी समुद्रात दोन इंधन टँकर्सवर हल्ला केला. या हल्ल्यात जहाजांनी पेट घेतला आणि एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.
इराणकडून 'शरणागती'चे संकेत नाहीत
दुसरीकडे, इराण मागे हटण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. २४ तासांनंतर इराणच्या नवीन सर्वोच्च नेत्याने आपल्या पहिल्या सार्वजनिक विधानात अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यांचा सूड घेण्याची घोषणा केली. "आम्ही शहीदांच्या रक्ताचा सूड घेतल्याशिवाय राहणार नाही. शत्रूने मारलेला प्रत्येक नागरिक स्वतःहून प्रतिशोधाचे कारण आहे," असे त्यांनी म्हटले आहे. अमेरिकेवर दबाव आणण्यासाठी होर्मुझची सामुद्रधुनी बंदच ठेवली जाईल आणि मध्य पूर्वेतील शेजारील देशांवरील हल्ले सुरूच राहतील, असेही खामेनी यांनी जाहीर केले.
मोजताबा खामेनी यांच्याबद्दल ट्रम्प यांची टिप्पणी
रिपब्लिकन नेते ट्रम्प यांनी मोजताबा खामेनी यांची लाईटवेटम्हणून थट्टा केली आणि ते अमेरिकेसाठी "अस्वीकार्य" असल्याचे सांगितले. खामेनी यांचीच धोरणे पुढे नेणारी व्यक्ती नेता बनल्यास अमेरिकेला पाच वर्षांत पुन्हा युद्धावर उतरावे लागेल, असे ट्रम्प म्हणाले. मोजताबा खामेनी यांच्या नियुक्तीपूर्वीच, अमेरिकेचा इराणचा पुढचा नेता निवडण्यात सहभाग असावा, असा आग्रह ट्रम्प यांनी धरला होता. यापूर्वी व्हेनेझुएलामध्ये अमेरिकेने केलेल्या हस्तक्षेपाचा दाखला त्यांनी दिला. 'फॉक्स न्यूज'ला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी इराणच्या नेत्याच्या निवडीबद्दल नाराजी व्यक्त केली. "ते शांततेत राहू शकतील असे मला वाटत नाही," असे ट्रम्प म्हणाले.
अली खामेनी यांच्यानंतर त्यांचे पुत्र मोजताबा खामेनी यांची इराणचे सर्वोच्च नेते म्हणून निवड करून तेथील कट्टरपंथीयांनी अमेरिका आणि इस्रायलला आव्हान दिले आहे. या निवडीतून त्यांनी युद्ध सुरू ठेवण्याचे संकेत दिले असल्याचे तज्ज्ञांनी एएफपीला (AFP) सांगितले. 'इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर इराणी स्टडीज'चे क्लेमेंट थर्मे यांच्या मते, मोजताबा यांची बढती ही इराणच्या व्यवस्थेतील सर्वात कट्टर लोक आता सत्तेत आल्याचे दर्शवते.