मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस सोमवारी संध्याकाळी पुणे रेल्वे स्थानकात प्रवेश करत असताना तिचा एक डबा रुळावरून घसरला. या घटनेत कोणताही प्रवासी जखमी झाला नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मात्र, या अपघातामुळे रेल्वे सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. घटनेनंतर संपूर्ण गाडी रिकामी करण्यात आली असून प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर नेण्यात आले आहे.
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) वरून नैऋत्य महाराष्ट्रातील सोलापूरकडे जाणारी ही प्रिमियम एसी गाडी (क्रमांक २२२२५) संध्याकाळी साधारण ७ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास प्लॅटफॉर्मजवळील क्रॉसिंगवरून जात असताना हा अपघात झाला. वंदे भारत एक्सप्रेसच्या एका डब्याचे चाक डायमंड क्रॉसिंगवर रुळावरून घसरले. हे क्रॉसिंग प्राधान्याने बदलण्याचे काम सुरू आहे. या घटनेत कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. डबा रुळावरून घसरण्याचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.
पुणे स्थानकावरील यार्ड रिमॉडेलिंगच्या कामाचा भाग म्हणून या क्रॉसिंगचे नूतनीकरण करण्याचे नियोजन आधीच करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे. डायमंड क्रॉसिंग म्हणजे असे जंक्शन असते जिथे दोन रेल्वे ट्रॅक एकाच पातळीवर एकमेकांना छेदतात आणि हिऱ्यासारखा (डायमंड) आकार तयार होतो. रेल्वे पोलीस दल (RPF) आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्या मदतीने प्रवाशांना सुरक्षितपणे प्लॅटफॉर्मवर हलवण्यात आले. बाधित झालेला डबा वेगळा करण्यासाठी अनेक पथके तैनात करण्यात आली असून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सीएसएमटी-सोलापूर वंदे भारत घसरल्यामुळे अनेक गाड्यांना उशीर झाला असून काही रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे रेल्वे विभागाच्या व्यवस्थापकांनी (DRM) दिलेल्या माहितीनुसार, पुणे स्थानकावरून रात्री ११ वाजून ४५ मिनिटांनी सुटणारी गाडी क्रमांक १६३८१ पुणे-कन्याकुमारी एक्सप्रेस आता २८ एप्रिल रोजी पहाटे २ वाजता सुटणार आहे. तसेच, पुण्यात झालेल्या या अपघातामुळे २८ एप्रिल रोजी सुटणारी गाडी क्रमांक २२२२६ सोलापूर-सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस रद्द करण्यात आल्याची माहिती मुंबई रेल्वे विभागाने 'एक्स'वरील पोस्टमध्ये दिली आहे.