TMC Congress Merger Rumours: तृणमूल काँग्रेसचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण? ममता बॅनर्जींच्या पक्षाने दिले स्पष्टीकरण

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी

 

तृणमूल काँग्रेस (TMC) आणि काँग्रेस पक्षाच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या असतानाच, ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने बुधवारी या सर्व अफवांना पूर्णपणे फेटाळून लावले आहे. पक्षात विलीनीकरणाची अशी कोणतीही योजना नसल्याचे टीएमसीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तृणमूल काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने या संदर्भातील वृत्त निराधारीत असल्याचे सांगत फेटाळून लावले आहे. आम्हाला याविषयी कोणतीही माहिती नसून या केवळ अफवा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ममता बॅनर्जी आणि काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर या विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण आले होते. 'इंडिया' (INDIA) आघाडीच्या बैठकीत दोन्ही नेत्यांनी एकमेकांना मारलेल्या मिठीचा फोटो काँग्रेसने सोशल मीडियावर जारी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही भेट झाली होती. या दोन्ही दिग्गज नेत्यांमधील बैठकीचा सविस्तर तपशील दोन्ही पक्षांनी जाहीर केला नसला तरी, ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षांच्या एकजुटीवर जोर दिल्याचे सूत्रांनी सांगितले. विविध जनहिताच्या मुद्द्यांवरून भाजपचा मुकाबला करण्यासाठी 'इंडिया' आघाडीने एकत्र काम केले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

राहुल गांधी आणि अभिषेक बॅनर्जी यांची भेट
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बुधवारी टीएमसीचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली. चालू आठवड्याच्या सुरुवातीला दिल्लीत झालेल्या 'इंडिया' आघाडीच्या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर काँग्रेस आणि टीएमसी यांच्यात सुरू असलेल्या सातत्यपूर्ण संवादाचा एक भाग म्हणून राहुल-अभिषेक यांच्या भेटीकडे पाहिले जात आहे.

या बैठकीचा तपशील अद्याप समोर आलेला नसला तरी, ही भेट अशा वेळी झाली आहे जेव्हा टीएमसीला नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर मोठ्या अंतर्गत बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. सोमवारी झालेल्या 'इंडिया' आघाडीच्या बैठकीतही विरोधी नेत्यांनी भाजपला आव्हान देण्यासाठी मित्रपक्षांमध्ये अधिक चांगला समन्वय आणि एकजूट असण्याची गरज व्यक्त केली होती. ममता बॅनर्जी यांनीही आघाडीच्या घटकांना मतभेद बाजूला ठेवून जनहिताच्या मुद्द्यांवर एकत्र काम करण्याचे आवाहन केले होते.

तृणमूल काँग्रेससमोरील अंतर्गत संकट वाढले
ममता बॅनर्जी यांनी १९९८ मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडत तृणमूल काँग्रेसची स्थापना केली होती. त्यानंतर हा पक्ष पश्चिम बंगालमधील एक प्रमुख राजकीय शक्ती बनला आणि २०११ मध्ये राज्यातील डाव्या आघाडीची ३४ वर्षांची सत्ता संपुष्टात आणली. मात्र, गेल्या महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आणि पक्षाच्या विधिमंडळ गोटात झालेल्या बंडखोरीमुळे टीएमसीसमोरील अडचणी वाढल्या आहेत.

गेल्या आठवड्यात पक्षाच्या ८० आमदारांपैकी दोन तृतीयांशपेक्षा जास्त म्हणजेच ५८ आमदारांनी अधिकृत टीएमसी विधिमंडळ पक्षातून बाहेर पडत पक्षातून हकालपट्टी झालेले आमदार ऋतव्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेत मुख्य विरोधी गट म्हणून मान्यता मिळवली आहे. हे संकट गेल्या आठवड्यात दिल्लीपर्यंत पोहोचले असून बंडखोर खासदार काकोली घोष दस्तीदार यांच्या नेतृत्वाखालील गटाने २० हून अधिक लोकसभा खासदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे जे पक्षातून बाहेर पडण्यास उत्सुक आहेत.