नवी दिल्ली
प्रतिबंधित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद (JeM) आणि अल-कायदा (AQ) यांच्याशी जोडलेल्या ऑनलाइन रॅडिकलरायझेशन प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) एका व्यक्तीविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपीने काश्मीर आणि लडाख भारतापासून वेगळे करण्याचा कट रचल्याचा आरोप एनआयएने केला आहे.
अहमदाबाद येथील विशेष एनआयए न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले असून, त्यात बेकायदेशीर कृती प्रतिबंधक कायदा (UAPA), भारतीय न्याय संहिता (BNS) आणि शस्त्र कायद्याच्या विविध कलमांचा समावेश करण्यात आला आहे. फैयाज असे आरोपीचे नाव असून, तो पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मदच्या म्होरक्याच्या संपर्कात होता, असे तपासात निष्पन्न झाले आहे.
भारताची सार्वभौमत्त्व, एकता आणि अखंडता नष्ट करण्यासाठी तरुण वर्गामध्ये हिंसाचार आणि सशस्त्र बंडखोरीला प्रोत्साहन देण्याचे काम हा आरोपी करत होता. तसेच, जातीय तणाव पसरवण्यासाठी आणि देशविरोधी कारवाया करण्यासाठी त्याने उत्तर प्रदेशमधून एक बेकायदेशीर शस्त्र आणि जिवंत काडतुसे खरेदी केली होती, जी तपासादरम्यान जप्त करण्यात आली आहेत. या कटात सामील असलेल्या इतर संशयितांचा शोध घेण्यासाठी एनआयएचा तपास सुरू आहे.