राज ठाकरेंचे गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 47 m ago
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे

 

सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्या समाजात जाणीवपूर्वक द्वेष आणि राग निर्माण केला जात असून नागरिकांना जातीय तसेच धार्मिक वादांमध्ये अडकवून ठेवण्याचा कट रचला जात आहे, असा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. आगामी गणेशोत्सवाच्या काळात राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करत त्यांनी हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही समुदायांतील नागरिकांना अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

सोशल मीडिया आणि धार्मिक वादांवर टीका
ठाण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी राज्यातील सद्यस्थितीवर भाष्य केले. देशासमोरील आणि राज्यातील महत्त्वाच्या सामाजिक-आर्थिक प्रश्नांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच धार्मिक तणाव निर्माण केला जात असल्याचे ते म्हणाले. परिस्थिती तापवून समाजात वातावरण दूषित केले जात आहे. आगामी सणासुदीच्या काळात कोणीही चिथावणीला बळी पडू नये आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी जागरूक राहावे, असा सल्ला त्यांनी दिला.

केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर प्रश्नचिन्ह
केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधताना राज ठाकरे यांनी देशाच्या आर्थिक स्थितीवर प्रश्न उपस्थित केले. जर पहिल्या तिमाहीत देशाचा जीडीपी विकासदर ७.८ टक्के आहे, तर मग नागरिकांना परदेश दौरे टाळण्याचे आणि सोने न खरेदी करण्याचे सल्ले का दिले जात आहेत, असा सवाल त्यांनी केला. गेल्या काही वर्षांत देशात ५०३ कंपन्यांचे कामकाज बंद पडल्याचा दावाही त्यांनी सरकारी अहवालाचा हवाला देत केला.

सरकारी कार्यालयांतील फोटोंवरून नाराजी
सरकारी कार्यालयांमधील फोटोंच्या मुद्द्यावरूनही त्यांनी भूमिका मांडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र सरकारी कार्यालयांमध्ये असण्याला विरोध नाही, परंतु छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बी. आर. आंबेडकर आणि महात्मा जोतीराव फुले यांच्यासारख्या राष्ट्रपुरुषांच्या छायाचित्रांच्या बरोबरीने ते लावले जाऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले. पुणे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले. याशिवाय, गैर-मराठी भाषिक नागरिकांचा वापर करून भाषिक वाद पेटवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.