UN मध्ये भारताने पाकिस्तानचा दहशतवादावरून घेतला समाचार

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे स्थायी प्रतिनिधी राजदूत पर्वतानेणी हरिश
संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे स्थायी प्रतिनिधी राजदूत पर्वतानेणी हरिश

 

भारताने बुधवारी सीमापार दहशतवादाचा राज्यधोरणाचे हत्यार म्हणून वापर केल्याबद्दल पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला. त्याच वेळी काश्मीर हा भारताचा अविभाज्य आणि अभिन्न भाग आहे आणि सदैव राहील, असा पुनरुच्चारही केला.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या 'नैसर्गिक संसाधनांचे सुशासन: शांतता, सुरक्षा आणि समृद्धीचा पाया' या विषयावरील उच्चस्तरीय खुल्या चर्चेदरम्यान संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे स्थायी प्रतिनिधी राजदूत पर्वतानेणी हरिश यांनी हे वक्तव्य केले. आपला खोटा प्रचार करण्यासाठी या उच्चस्तरीय चर्चेचा गैरवापर केल्याबद्दल त्यांनी पाकिस्तानचा तीव्र निषेध केला.

आपल्या भाषणात भारतीय राजदूत म्हणाले, "या मंचावर इतर मुद्दे उपस्थित करण्याचा आमचा कोणताही उद्देश नव्हता. मात्र पाकिस्तानने आपला खोटा प्रचार करण्यासाठी आजच्या चर्चेचा गैरवापर करण्याचे ठरवले. यामुळे माझ्या शिष्टमंडळाला पाकिस्तानला उत्तर देणे भाग पडले आहे."

"जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशाचा विचार करता, तो नेहमीच भारताचा अविभाज्य आणि अभिन्न भाग राहिला आहे आणि राहील. ही एक घटनात्मक आणि कायदेशीर वास्तविकता आहे, ज्याकडे पाकिस्तान जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो."

राजदूत हरिश पुढे म्हणाले, "जम्मू आणि काश्मीरबाबत एकमेव प्रलंबित मुद्दा म्हणजे भारताच्या सार्वभौम भूभागावरील पाकिस्तानचे नग्न आक्रमण आणि बेकायदेशीर ताबा."

सिंधू पाणी कराराबाबत बोलताना त्यांनी सीमापार दहशतवादाचा 'राज्यधोरणाचे साधन' म्हणून वापर केल्याबद्दल इस्लामाबादवर जोरदार टीका केली.

"सिंधू पाणी कराराबाबत आमची भूमिका अत्यंत स्पष्ट आणि ठाम आहे. जेव्हा सीमापार दहशतवाद नियमितपणे राज्यधोरणाचे साधन म्हणून वापरला जातो, तेव्हा परस्पर विश्वास आणि सद्भावनेच्या आधारे सहकार्याची अपेक्षा केली जाऊ शकत नाही."

आपल्या भाषणाचा शेवट करताना राजदूत पर्वतानेणी हरिश यांनी इस्लामाबादला इतरांवर बोटे दाखवण्यापूर्वी स्वतःच्या अंतर्गत समस्या सोडवण्याचा सल्ला दिला.

"भारताकडे बोट दाखवण्याऐवजी पाकिस्तानने स्वतःचे घर आधी ताळ्यावर आणावे. यामध्येच त्याचे आणि त्याच्या जनतेचे भले आहे."