INDIA-NEPAL: भारत-नेपाळ सीमेवर मोठी कारवाई; 'वारिस पंजाब दे'चा वॉन्टेड सदस्य आणि अमेरिकन नागरिक अटकेत

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 10 h ago
भारत-नेपाळ सीमेवर 'वारिस पंजाब दे'चा वॉन्टेड सदस्य आणि अमेरिकन नागरिक अटकेत; एसएसबी आणि यूपी पोलिसांची संयुक्त कारवाई.
भारत-नेपाळ सीमेवर 'वारिस पंजाब दे'चा वॉन्टेड सदस्य आणि अमेरिकन नागरिक अटकेत; एसएसबी आणि यूपी पोलिसांची संयुक्त कारवाई.

 

बहराईच 

नेपाळमधून भारतात बेकायदेशीरपणे घुसखोरी करणाऱ्या प्रतिबंधित 'वारिस पंजाब दे' संघटनेच्या एका वॉन्टेड सदस्याला आणि त्याच्यासोबत असलेल्या अमेरिकन नागरिकाला सुरक्षा यंत्रणांनी अटक केली आहे. सशस्त्र सीमा दल (SSB) आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्त कारवाई करत भारत-नेपाळ आंतरराष्ट्रीय सीमेवरून दोघांना जेरबंद केले आहे.

बहराईचचे पोलीस अधीक्षक विश्वजीत श्रीवास्तव यांनी गुरुवारी माहिती दिली की, रूपईडीहा पोलीस स्टेशन हद्दीत सीमा चौकीजवळ ही कारवाई करण्यात आली. विक्रमजीत असे वॉन्टेड आरोपीचे नाव असून, तो पंजाबमधील अजनाळा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या २०२३ च्या गुन्ह्यात हवा होता. त्याच्यासोबत असलेला मनवीर सिंह धिल्लों हा अमेरिकन नागरिक असून तो मूळचा पंजाबच्या मोगा जिल्ह्यातील आहे. कायदेशीर तपासणी टाळण्यासाठी त्याने व्हिसाशिवाय नेपाळमार्गे भारतात घुसखोरी केल्याचा संशय आहे.

मदत करणाऱ्या तीन जणांनाही बेड्या

या प्रकरणात बेकायदेशीर प्रवेशास मदत केल्याप्रकरणी सुरेश कुमार पाठक, दिलीप उपाध्याय (दोघेही रूपईडीहा येथील रहिवासी) आणि वाहन चालक राहुल कुमार या तीन भारतीय नागरिकांनाही पोलिसांनी अटक केली आहे. सीमावर्ती भागात तैनात असलेल्या विविध सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी या सर्वांची कसून चौकशी केली असून, रूपईडीहा पोलीस ठाण्यात संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.