मतदार यादीतील अनमॅप्ड डेटावरून काँग्रेस आक्रमक; सत्ताधारी पक्षावर हेरगिरीचा आरोप

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 11 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष गहन पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता होत असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्ष काँग्रेसने केला आहे. ज्या मतदान केंद्रांवर (बूथ) काँग्रेसची मजबूत पकड आहे किंवा जिथे पक्षाला सातत्याने आघाडी मिळते, अशा ठिकाणी अनमॅप्ड मतदारांची संख्या नको तितकी जास्त दाखवण्यात आल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.

काँग्रेसच्या प्रचार मोहिमेचे समन्वयक अभिजित सपकाळ यांनी पक्षाच्या बूथ लेव्हल एजंट्सना (BLA) एक अंतर्गत पत्र पाठवून सतर्कतेचा इशारा दिला आहे. या पत्रात मतदार यादी पुनरीक्षणादरम्यान अत्यंत धक्कदायक बाबी समोर आल्याचे नमूद करण्यात आले आहे. अनमॅप्ड डेटाच्या नावाखाली मतदारांची नावे यादीतून कायमची वगळण्याची ही पहिली पायरी असल्याचा आरोप पत्रात करण्यात आला आहे.

'फॉर्म ७'चा गैरवापर आणि कलर-कोडिंगचा आरोपकाँग्रेसने असाही आरोप केला आहे की, अनेक बूथवर गणना प्रपत्र वाटपाचे काम ५० टक्क्यांपेक्षा कमी झालेले असतानाही, विरोधकांनी काँग्रेसचे प्राबल्य असलेल्या भागात मतदारांची नावे कमी करण्यासाठी 'फॉर्म ७' अर्ज आधीच जोडले आहेत.सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पुनरीक्षण प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच राजकीय पसंतीनुसार मतदारांचे 'कलर-कोडिंग' केले होते, असा दावा पत्रात करण्यात आला आहे. या वर्गवारीच्या आधारे काँग्रेस समर्थकांची नावे मतदार यादीतून वगळण्यासाठी अर्ज सादर केले जात असून, त्यांना मुद्दाम 'त्रुटी' (anomaly) श्रेणीत ढकलले जात आहे. 

याशिवाय, काही ठिकाणी बूथ लेव्हल अधिकारी (BLO) भाजपच्या शिबिरांमधून काम करत असल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे.  तफावतीबाबत निवडणूक आयोगाची भूमिकापक्षाने नमूद केले की, एका बूथवर प्रत्यक्ष फॉर्म संकलन केवळ ८ टक्के असताना अधिकृत नोंदींमध्ये ते ३२ टक्के दाखवण्यात आले आहे. त्यामुळे काँग्रेसने आपल्या सर्व कार्यकर्त्यांना मागील निवडणुकांच्या निकालांची तपासणी करणे, BLO कडून अनमॅप्ड मतदारांच्या याद्या मिळवणे आणि कोणत्याही विसंगती आढळल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडे तत्काळ आक्षेप नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, या आरोपांवर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्याने सांगितले की, काँग्रेसकडून अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार प्राप्त झालेली नाही. अधिकृतपणे विशिष्ट प्रश्न विचारल्यास योग्य ते उत्तर दिले जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.