शबीर अहमद शाहच्या कोठडीत १० दिवसांची वाढ; ३० वर्षे जुन्या दहशतवादी प्रकरणात NIA ची कारवाई

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 Months ago
फुटीरतावादी नेता शबीर अहमद शाह
फुटीरतावादी नेता शबीर अहमद शाह

 

विशेष एनआयए न्यायालयाने सोमवारी फुटीरतावादी नेता शबीर अहमद शाह याच्या कोठडीत आणखी १० दिवसांची वाढ केली आहे. तीन दशके जुन्या दहशतवादी प्रकरणाशी संबंधित हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

१० दिवसांची कोठडी संपल्यानंतर शाहला न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्याने जामिनासाठी अर्ज केला असून पुढील सुनावणीच्या वेळी त्यावर विचार केला जाण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

सुनावणी दरम्यान राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अधिक चौकशीसाठी शाहच्या कोठडीची मागणी केली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने तपास यंत्रणेला १० दिवसांची वाढीव कोठडी मंजूर केली.

एका दहशतवाद्याच्या अंत्ययात्रेदरम्यान पोलिसांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी १९९६ मध्ये गुन्हा दाखल झाला होता. याच प्रकरणात एनआयएच्या श्रीनगर शाखेने १७ एप्रिल रोजी दिल्लीतून शाहला अटक केली होती. पतियाळा हाऊस न्यायालयाने त्याची ट्रान्झिट रिमांड मंजूर केल्यानंतर त्याला दुसऱ्या दिवशी जम्मूतील एनआयए न्यायालयात हजर करण्यात आले होते.

इतर प्रकरणांमधील सुमारे सात वर्षांच्या कारावासानंतर या फुटीरतावादी नेत्याची अलीकडेच जामिनावर सुटका झाली होती.


Latest News