आता VIP व्यक्तींच्या सुरक्षेचे होणार ऑडिट; फारुख अब्दुल्लांवरील हल्ल्याच्या प्रयत्नानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नानंतर, केंद्रीय सुरक्षा कवच असलेल्या सर्व अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या (VIP) सुरक्षेचे सर्वंकष ऑडिट करण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला आहे. अधिकाऱ्यांनी शुक्रवारी याबद्दलची माहिती दिली.

पुढील आठवड्यात हा आढावा घेण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, गृह सचिव गोविंद मोहन, इंटेलिजन्स ब्युरोचे (IB) संचालक तपन डेका आणि गृह मंत्रालयातील व्हीआयपी सुरक्षा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अशा महत्त्वाच्या व्यक्तींना सीआरपीएफ (CRPF), सीआयएसएफ (CISF), एनएसजी (NSG) आणि आयटीबीपी (ITBP) यांसारख्या केंद्रीय निमलष्करी दलांमार्फत सुरक्षा कवच पुरवले जाते.

आगामी काळात आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेत्यांना आणि महत्त्वाच्या व्यक्तींना या राज्यांमध्ये प्रवास करावा लागणार आहे. हे लक्षात घेता या सुरक्षा आढाव्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या केंद्रीय यादीनुसार विविध सुरक्षा श्रेणींमध्ये सुमारे ४०० व्हीआयपी आहेत. यामध्ये सीआरपीएफकडे सुमारे २२०, सीआयएसएफकडे १५६, एनएसजीकडे ९ आणि काही जणांची सुरक्षा आयटीबीपीकडे सोपवण्यात आली आहे.