गंगटोक :
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय दौऱ्यासाठी सोमवारी सिक्कीममध्ये पोहोचतील. या दौऱ्यात ते एका भव्य रोड शोमध्ये सहभागी होतील. सिक्कीम राज्याच्या निर्मितीला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभाला पंतप्रधान आवर्जून उपस्थित राहतील. तसेच ते ४ हजार कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटनही करतील. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
मोदींच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्याची राजधानी आणि आजूबाजूच्या परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे.
दौऱ्याच्या अधिकृत वेळापत्रकानुसार मोदी दुपारी ३ वाजता गंगटोकला पोहोचतील. लिबिंग हेलिपॅडवर उतरल्यानंतर तेथून थेट लोकभवनपर्यंत त्यांचा भव्य रोड शो होईल.
दुसऱ्या दिवशी पंतप्रधान गंगटोकमधील 'ऑर्किडेरियम'ला भेट देतील. राज्याचा नैसर्गिक आणि फुलांचा वारसा जगासमोर आणण्यासाठी 'सुवर्णजयंती मैत्री मंजरी पार्क' उभारले आहे. सिक्कीम राज्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त हे जागतिक दर्जाचे 'ऑर्किड एक्सपिरियन्स सेंटर' विकसित केले आहे.
पाळजोर स्टेडियमवर सिक्कीम राज्याच्या ५० व्या वर्षाच्या सांगता समारंभाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात सहभागी होऊन पंतप्रधान राज्यभरातील तब्बल ४ हजार कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन करतील.
या प्रकल्पांमध्ये अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांचा समावेश आहे. यात पायाभूत सुविधा, दळणवळण, आरोग्य, शिक्षण, ऊर्जा, शहरी विकास, पर्यावरण, पर्यटन आणि कृषी क्षेत्राचा समावेश असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
या विशेष प्रसंगी पंतप्रधान उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शनही करतील.
गेल्या वर्षी पाळजोर स्टेडियमवर सिक्कीम राज्याच्या निर्मितीच्या ५० व्या वर्षानिमित्त वर्षभर चालणाऱ्या महोत्सवाचे उद्घाटन झाले होते. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे मोदींचे नियोजन होते.
पण खराब हवामानामुळे ते तिथे पोहोचू शकले नाहीत. अखेर त्यांनी शेजारील पश्चिम बंगालमधील बागडोगरा येथूनच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमाला संबोधित केले होते.