बागपत: कांवड यात्रेकरूंसाठी वर्षानुवर्षे सेवा देणारे डॉ. बाबू खान

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 1 d ago
कांवड यात्रेकरूंना सेवा देताना डॉ. बाबू खान
कांवड यात्रेकरूंना सेवा देताना डॉ. बाबू खान

 

श्रावण महिन्यात शेकडो शिवभक्त अनवाणी चालत हरिद्वारला गंगेचे पवित्र जल आणण्यासाठी रस्त्यांवरून आणि महामार्गांवरून जातात. हे जल ते आपल्या घराजवळील शिवमंदिरात अर्पण करतात. या वेळी एक मुस्लिम डॉक्टर त्यांच्या सेवेसाठी तयार असतो.कांवड यात्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रवासात, दिल्लीतून पश्चिम उत्तर प्रदेश आणि पुढे जाणारे रस्ते कांवड घेऊन गंगाजल आणणाऱ्या यात्रेकरूंनी भरलेले असतात.यात्रेकरूंना विश्रांती देणारी शिबिरे, मंद स्वरात भक्तिगीते वाजवणारी भोंगे आणि ‘बोल बम’च्या जयघोषांनी हवा भक्तिमय बनते.

हरिद्वारहून गंगाजल घेऊन परतणारे यात्रेकरू
या सगळ्यामध्ये, बागपत जिल्ह्यातील मुस्लिम डॉक्टर बाबू खान, ज्यांना बाबू मलिक म्हणूनही ओळखले जाते, आपला व्यवसाय बंद करून कांवड यात्रेकरूंची सेवा करतात.गेल्या 24 वर्षांपासून डॉ. खान श्रावण महिन्यात आपला दवाखाना बंद करून यात्रेकरूंची सेवा करतात.डॉ. बाबू खान सांगतात, “जेव्हा मी कांवड यात्रेकरूंना गंगाजल आणण्यासाठी तपश्चर्या करताना आणि भगवान शिवाचा अभिषेक करताना पाहतो, तेव्हा माझ्या मनात सेवेची भावना जागृत होते. माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म आहे, आणि ही सेवा पूजेइतकीच आहे.”दरवर्षी कांवड यात्रेदरम्यान त्यांचा संघ बागपत आणि आसपासच्या भागात यात्रेकरूंच्या मार्गावर मोफत वैद्यकीय शिबिरे उभारतो.50 वर्षांचे डॉ. बाबू खान यांनी सुरुवातीला यात्रेकरूंना जखम, पुरळ यांसारख्या किरकोळ उपचारांसाठी एक स्टॉल उभारला. त्यांना थकलेल्या यात्रेकरूंना मदत करायची होती.आज त्यांचे शिबिर कांवड यात्रेचा अविभाज्य भाग बनले आहे. मलम, पट्ट्या, ग्लुकोज, वेदनाशामक इंजेक्शन्स, प्रतिजैविके यांसारख्या प्रथमोपचाराच्या सर्व सुविधा त्यांच्या शिबिरात उपलब्ध असतात.ते यात्रेकरूंच्या जखमांवर मलमपट्टी करतात. त्यांच्या पायांवरील फोड स्वच्छ करतात. तसेच त्यांना विश्रांतीसाठी जागा पुरवतात.
 
दिल्लीत कांवड यात्रेकरूंच्या जखमांवर उपचार करणारे वैद्यकीय पथक
डॉ. बाबू खान सांगतात, “जेव्हा एखादा कांवड यात्रेकरू थकवा किंवा वेदनेमुळे चालू शकत नाही, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचे दुखणे मला पाहवत नाही. मी डॉक्टर आहे, आणि रुग्णाचे दुखणे घालवणे हाच माझा सर्वात मोठा धर्म आहे. मी कोणता धर्म पाहत नाही. माझ्यासाठी तो माणूस आहे, आणि मला त्याला मदत करायची आहे.”कांवड यात्रेकरूंमध्ये त्यांची लोकप्रियता इतकी आहे की, अनेक यात्रेकरू दरवर्षी त्यांना भेटण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी येतात.काही यात्रेकरू सांगतात की, त्यांच्या शिबिरातून औषध घेतल्यानंतर त्यांना आराम मिळतो, आणि ही सेवा त्यांना मनापासून स्पर्श करते.पांढरी टोपी आणि लांबलचक दाढी असलेले डॉ. खान आपल्या स्टॉलवर उभे राहून कांवड यात्रेकरूंना ‘जय भोलेनाथ’च्या जयघोषाने स्वागत करतात.ते मानतात की, “देवाप्रती भक्ती आणि माणुसकीचा संदेश हा एका धर्माचा नाही. जेव्हा मी ‘हर हर महादेव’ म्हणतो, तेव्हा ती माझ्या मनातून उमटणारी खरी भक्ती आहे.”डॉ. बाबू खान केवळ कांवड यात्रेकरूंची मदतच करत नाहीत, तर ते कांवड सेवा समितीचे सक्रिय कार्यकर्तेही आहेत.

खास बनवलेल्या भांड्यांमध्ये गंगाजल घेऊन जाणारे यात्रेकरू
ते सांगतात की, समितीच्या सहकार्याने दरवर्षी हजारो कांवड यात्रेकरूंसाठी मोफत वैद्यकीय सुविधा, पिण्याचे पाणी, थंड शरबत आणि प्रथमोपचाराची व्यवस्था केली जाते.त्यांचा संघ रात्रंदिवस यात्रेकरूंची सेवा करत असतो.जेव्हा डॉ. बाबू खान यांना कट्टरपंथी त्यांच्या सेवेबद्दल काय विचार करतात, असे विचारले जाते, तेव्हा ते हसत म्हणतात, “समाजात सगळ्या प्रकारचे लोक असतात. पण माझा विश्वास आहे की, हिंदू-मुस्लीम सौहार्दाचा दाखला देणे हेच सर्वात मोठे उत्तर आहे. जर माझ्या सेवेने कोणाचे प्राण वाचले किंवा त्याला आराम मिळाला, तर तोच माझा सर्वात मोठा विजय आहे.”डॉ. खान यांची सेवा केवळ बागपतमधून हिंदू-मुस्लीम सौहार्दाचा संदेश देत नाही, तर संपूर्ण पश्चिम उत्तर प्रदेशला त्यांचा अभिमान आहे. स्थानिक प्रशासनानेही त्यांच्या सेवेचे अनेकदा कौतुक केले आहे. ते म्हणतात, “द्वेषाने कोणी जिंकत नाही, माणुसकी हाच खरा धर्म आहे. जर आपण एकमेकांचे दुखणे समजून घेतले, तर समाजात शांती आणि प्रेम आपोआप बहरेल.”यात्रेकरूंसाठी डॉ. खान यांचे शिबिर म्हणजे जिवंत छाया आहे. अनेक यात्रेकरू सांगतात की, मार्गात जखम झाली किंवा अचानक तब्येत बिघडली, तर डॉ. खान यांचे शिबिर हाच त्यांचा पहिला आधार बनतो.आज बाबू खान केवळ डॉक्टर नाहीत, तर संमिश्र संस्कृती आणि प्रेमाचा आवाज आहेत. ते मानतात की, “जर माणुसकी जागृत झाली, तर धर्माच्या भिंती सद्भावनेने आपोआप कोसळतात.”डॉ. खान म्हणतात, “मला अभिमान आहे की, माझ्या सेवेतून मी समाजात एकतेचा संदेश देऊ शकतो. दरवर्षी जेव्हा कांवड यात्रेकरू मला ‘धन्यवाद’ म्हणतात, तेव्हा तो माझ्यासाठी कोणत्याही पुरस्कारापेक्षा कमी नाही.”