यंदा ईद-ए- मिलाद उन नबी ५ सप्टेंबरला होती. तर दुसऱ्या दिवशी ६ सप्टेंबरला गणेश विसर्जन होत आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही मिरवणुका एकाच वेळी निघाल्यास कायदा व सुव्यवस्था व प्रशासनावर सलग दोन दिवस ताण पडेल आणि दोन्ही मिरवणुका शांततेत पार पडाव्या यासाठी महाराष्ट्रभरातील मुस्लीम समाजाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही समाजाला उत्सवांचा आनंद घेता यावा आणि या काळात कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी मुस्लीम समाजाकडून पुढाकार घेण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाने सामाजिक सलोख्याचे उदाहरण ठेवत ईदची मिरवणूक नंतर काढण्याचा निर्णय घेतला आहे. मुस्लिम समाजाचा हा निर्णय सामाजिक एकतेचा संदेश देणारा आहे. यातून महाराष्ट्रातील धार्मिक समरसतेची ही परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. महाराष्ट्रातील ही काही उदाहरणे...
नांदेड
गणेश विसर्जन मिरवणूक आणि ईद-ए-मिलादच्या मिरवणुका शांततेत पार पडाव्यात म्हणून माहूरमधील मुस्लीम समाजाने ईद-ए-मिलाद मिरवणूक सहाऐवजी १० सप्टेंबरला काढण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे अधिकृत निवेदन माहूर पोलिस ठाण्यात मुस्लिम समाजाच्या वतीने सादर करण्यात आले. या निर्णयाचे पोलिस निरीक्षक गणेश कराड यांनी स्वागत करत मुस्लिम समाजाच्या भान आणि सामाजिक जाणिवेचे कौतुक केले.
याप्रसंगी बोलताना माहूर नगराध्यक्ष फिरोज दोसानी म्हणाले की, "शहरात सामाजिक ऐक्य, शांतता, प्रेम, देशभक्ती, अखंडता आणि बंधूता जपण्यासाठी घेतलेला हा निर्णय अभिनंदनीय आणि स्वागतार्ह आहे."
यावेळी नगराध्यक्ष फिरोज दोसानी, गौसिया मशीदचे सदर जमीर मलनस, इरफान सय्यद, इरशाद रजा, बबलू शेख, इस्माईल काझी, इलियास बावानी, अब्दुल रहमान शेख अली या सर्वांनी बैठक घेऊन एकमताने निर्णय घेतला.
जळगाव
जळगावमधील सुन्नी मुस्लिम समाजाने ईद-ए-मिलादचा जुलूस ८ सप्टेंबरला काढण्याचा निर्णय घेतला आहे. मरकझ सुन्नी जामा मशीद भिलपुरा येथे आयोजित सभेत सर्व समाजबांधवांच्या उपस्थितीत हा निर्णय जाहीर करण्यात आला.
त्यानुसार मरकझी जुलूस कमिटीतर्फे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सुत्री जामा मशीद जळगाव, सुन्नी ईदगाह ट्रस्ट जळगाव आणि मरकझी जुलुसे ईद-ए- मिलाद उन नवी कमिटीचे अध्यक्ष अयाज अली नियाज अली, सय्यद जावेद, जावेद इमाम, सय्यद उमर, अमान बिलाल, शेख रईस, शेख शफी, अयान अलीम उपस्थित होते.
वाशीम
रिसोड पोलिस स्टेशनमध्ये ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मुस्लिम समाजाचे मौलवी व प्रतिष्ठित नागरिकांनासमवेत सभा घेण्यात आली. या सभेत ईदची मिरवणूक ५ ऐवजी ८ सप्टेंबरला साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यापूर्वीही अनेक वेळा हिंदू-मुस्लिमांचे सण एकत्रित आल्याने वाशीममधील मुस्लिम समाजाने अशा प्रकारचे मार्ग काढून निर्णय घेतला होता. यामुळे त्याठिकाणी सामाजिक सलोख्याचे वातावरण पाहायला मिळते. गणेशोत्सव आणि ईद-ए- मिलाद उन नबी हा योग गेली तीन वर्षे सातत्याने एकत्र येत असल्याने मुस्लिम समाजाने स्वतः निर्णय घेत पुढाकार घेतलेला आहे.
चाकण
चाकण येथील औद्योगिक वसाहत शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात परराज्यातील तसेच राज्यातील नागरिक, कामगार येथे आलेला आहे. मोठ्या प्रमाणात रहिवासी वस्ती आहे. त्यामुळे याठिकाणी गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद सण आनंदात साजरे व्हावेत यासाठी मुस्लीम समाजाने मोठा निर्णय घेतला आहे. ईदची मिरवणूक पाच तारखेला न करता आठ तारखेला करण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी पिंपरी-चिंचवडचे पोलिस उपायुक्त बापू बांगर यांनी समाजबांधवांना आवाहन केले आहे. ते म्हणाले की, "गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद हे दोन सण साजरे होत आहेत. या सणा दरम्यान हिंदू, मुस्लिम समाज बांधवांनी शांततेने सण साजरे करावेत. कायदा सुव्यवस्थेत राहून सर्वांनी सण साजरे करावेत व आनंद घ्यावा."
चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या पथसंचलनात पोलिस उपायुक्त बापू बांगर, सहायक पोलिस आयुक्त सचिन कदम, चाकणचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय सोळंके हे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच २७ वरिष्ठ पोलिस अधिकारी, १७५ कर्मचारी, जवान, चाकण, महाळुंगे इंगळे, आळंदी पोलिस ठाण्याचे अधिकारी, अंमलदार, आरसीपीचे अधिकारी, सशस्त्र जवान, एसआरपीएफचे जवान, होमगार्ड यांनी देखील सहभाग घेतला होता.
जुन्नर
ईद-ए-मिलादची मिरणूक दोन दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय जुन्नर तालुक्यातील नारायणगाव, वारुळवाडी, आर्वी, पिंपळगावतर्फे नारायणगाव, येडगाव, वडगाव कांदळी, निमगाव सावा भागातील मुस्लिम समाजाने घेतला आहे. त्यानुसार ईद- ए-मिलादनिमित्त ५ सप्टेंबर रोजी काढण्यात येणारी नियोजित मिरवणूक ७ सप्टेंबर रोजी काढण्यात येणार आहे, अशी माहिती नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिले.
दोन्ही सण एकाच काळात आल्याने पोलिसांवर बंदोबस्ताचा मोठा ताण असल्याचे लक्षात घेत मुस्लीम समाजाने हा निर्णय घेतला. नारायणगाव पोलिस ठाण्यात मुस्लिम समाजाच्या बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी नारायणगाव मुस्लिम जमातचे अध्यक्ष ऐजाज आतार, दादाभीयाँ पटेल, हाजी सिद्दीक शेख, हाजी कुरेशी, उस्मान पठाण, फकीर मोहम्मद मोमीन, जुबेर आतार, तौसीफ कुरेशी, रज्जाक काझी, मुनीर भाई कुरेशी, जावेद पटेल, सकलेन आतार, अश्फाक पटेल आदी मान्यवर व निमगाव, वडगाव कांदळी, पारगाव, येडगाव, खोडद, हिवरेतर्फे नारायणगाव, पिंपळगावतर्फे नारायणगाव भागातील मशीद समितीचे अध्यक्ष व मुस्लिम बांधव उपस्थित होते.
अकोला
शहरात सौहार्द व सामाजिक एकोप्याला प्राधान्य देत गणेशोत्सवामुळे ईद ए मिलादची मिरवणूक तीन दिवस पुढे काढण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. दोन्ही समाजाकडून एकमेकांच्या पारंपरिक मिरवणुकीचे स्वागत केले जाणार आहे, अशी माहिती मुस्लिम समाजाच्यावतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाने आपली मिरवणूक पुढे ढकलून ९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता ताजनापेठ कच्छी मशिदीसमोरून पारंपरिक मार्गाने काढण्याचा निर्णय घेतला. सलग तिसऱ्या वर्षी मुस्लिम समाजाने हा निर्णय घेऊन हिंदू – मुस्लिम एकतेचा आदर्श घालून दिला. गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये ताजनापेठ येथे मुस्लिम समाजाकडून गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला जाणार आहे, तर गांधी चौकात गणेशोत्सव मंडळाकडून ईद ए मिलादच्या मिरवणूक समितीचा सत्कार करण्यात येईल.
यावेळी आमदार साजिद खान पठाण, ईद मिरवणूक कमिटीचे अध्यक्ष हाजी मुदाम खान, सार्वजनिक गणपती विसर्जन मिरवणूक समितीचे अध्यक्ष ॲड. मोतीसिंग मोहता, सचिव ॲड. एस. एस. ठाकुर, कच्छी मशिद ट्रस्टचे अध्यक्ष जावेद जकरिया, शेख सलीम सदर गोरवे आदींसह मिरवणूक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
पुणे
गणेश विसर्जनाच्या दिवशी ईद आल्यानं जूलूस पुढे ढकलण्याचा निर्णय पुण्यातील मुस्लिम बांधवांनी घेतला आहे. ५ ऐवजी ८ सप्टेंबरला निघणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
याविषयी बोलताना सामाजिक कार्यकर्ते अन्वर शेख म्हणाले की, "जूलूस आणि गणपती मिरवणुका एकत्र आल्या तर वाद होण्याची शक्यता असते. कोणत्याही सणाला गालबोट लागू नये, म्हणून आम्ही ५ तारखेला होणाऱ्या ईदसाठीचा जुलूस ८ सप्टेंबरला काढण्याचा निर्णय घेतला. पुण्यातील गणपती विसर्जनाच्या मिरवणुका दोन दिवस चालतात. त्यात पोलीस प्रशासनदेखील कामात असतात. या सगळ्यांवर कोणत्याही प्रकारचा ताण येऊ नये, म्हणून आम्ही हा निर्णय घेतला."
मुंबई
नवी मुंबईतील मुस्लिम समाजाने यंदाही नागरी संवेदनशीलता आणि सामाजिक सलोखा दाखवत ईद-ए-मिलाद-उन-नबीची मिरवणूक पुढे ढकलली आहे. ५ सप्टेंबरला होणारी मिरवणूक आता ८ सप्टेंबरला काढण्यात येणार आहे. सलग तिसऱ्या वर्षी हा निर्णय घेण्यात आला असून समाजाने गणेशोत्सव विसर्जन निर्विघ्न पार पडावे, यासाठी मुस्लीम समाजाने हे पाऊल उचलले आहे. ६ सप्टेंबर रोजी विसर्जन असल्याने पोलिसांवर अतिरिक्त ताण नको, यासाठी मधला एक दिवस पोलिसांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.
गरीब नवाज मशिदीचे इमाम मोहम्मद खलीलुल्लाह सुब्हानी म्हणाले, “ईद-ए-मिलाद-उन-नबी आमच्यासाठी अत्यंत पवित्र दिवस आहे. या दिवशी आमचे प्रेषित जन्मले. त्यांच्यामुळेच आमचे अस्तित्व आहे. प्रेषितांच्या शिकवणी कृतीत उतरवणे आवश्यक आहे. शांततेत सहअस्तित्व आणि इतर धर्मांचा सन्मान करणे हीच खरी आचरणीय शिकवण आहे.”
सुब्हानी यांनी पुढे म्हणाले, “गणेशोत्सव हा आपल्या हिंदू बांधवांचा सर्वात मोठा उत्सव आहे. त्यांचा आनंद कुठल्याही व्यत्ययाशिवाय साजरा व्हावा, हीच आमची इच्छा आहे. नवी मुंबई ही शांतताप्रिय लोकांची भूमी आहे. पोलिसांवर अतिरिक्त ताण येऊ नये, म्हणून यावेळी मिरवणूक एक दिवस नव्हे तर तीन दिवसांनी पुढे ढकलली आहे.”