यंदा पावसाने राज्यातच नाही तर देशभरात थैमान घातले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक नद्यांना पूर आल्याने मोठे नुकसान देखील झाले. अशा संकटकाळात माणुसकीचा आधार देत साताऱ्यातील एक मुस्लिम संघटना परंडा तालुक्यातील पूरग्रस्तांसाठी देवदूत बनून धावून आली आहे. 'एक हात मदतीचा' देत 'जमियत उलेमा ए हिंद' या संघटनेची सामाजिक बांधिलकी सध्या सर्वत्र कौतुकाचा विषय ठरली आहे.
गेल्या दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे परंडा तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. याचा सर्वाधिक फटका वडनेर गावाला बसला. हे गाव नदीच्या काठावर असल्याने पुराच्या पाण्याने येथील शेतजमिनी खरवडून गेल्या. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांच्या संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे अनेक संसार उघड्यावर आले.
'एकमेकांना साह्य करू अवघे धरू सुपंथ'
या कठीण काळात अनेक लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांनी मदतीचा हात पुढे केला. याच साखळीत एक महत्त्वाचे नाव जोडले गेले, ते म्हणजे सातारा येथील 'जमियत उलेमा-ए-हिंद' या मुस्लिम सामाजिक संघटनेचे. 'एकमेकांना साह्य करू अवघे धरू सुपंथ' या उक्तीप्रमाणे त्यांनी वडनेर येथील पूरग्रस्तांना मदत पोहोचवली.
या मदतीमध्ये केवळ अन्नधान्य नव्हते, तर एका उद्ध्वस्त झालेल्या संसाराला पुन्हा उभे करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा विचार करण्यात आला होता. त्यांनी संसारोपयोगी भांडी, किराणा साहित्य, लहान मुलांचे कपडे, महिलांसाठी साड्या आणि अंथरुण-पांघरुणासाठी कपडे अशा अनेक वस्तूंचे वाटप केले.
जमियत उलेमा ए हिंद संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, "परांड्यातील वडनेर गाव मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेले होते. आम्ही तेथील रहिवाशांची भेट घेतली तेव्हा त्यांची घरे, गोठे आणि दुकाने पूर्णपणे पाण्याखाली होती. परिस्थिती खूपच बिकट होती. तेथील जबाबदार व्यक्ती चांद सर, जमियत-ए-हिंदचे पदाधिकारी आणि मराठा सेवा संघाच्या मार्गदर्शनाखाली सुरुवातीला ५० विधवा महिलांना किट, साड्या, ब्लँकेट आणि भांड्यांचे वाटप करण्यात आले."
ते पुढे म्हणाले की, "या मदतकार्यानंतर गावातील लोकांच्या डोळ्यांत अश्रू आले. या नेक कार्यासाठी अल्लाहने आम्हाला निवडले यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत. या कामात साथ देणाऱ्या, आर्थिक मदत करणाऱ्या आणि आवश्यक वस्तू देणाऱ्या सर्वांची सेवा अल्लाह स्वीकारो. अमीन..."
मदतकार्यासाठी विविध धर्मीय संघटना एकत्र
विशेष म्हणजे ही मदत गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध संघटनांनी एकत्र येऊन काम केले. जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश महासचिव आशा मोरजकर, संभाजी ब्रिगेडचे धाराशिव जिल्हा कार्याध्यक्ष मनोज कोळगे आणि जमियत उलेमा-ए-हिंदचे परंडा शहराध्यक्ष मुर्तुजा खान पठाण, खजिनदार हप्पूदिन करपडे, सेक्रेटरी रियाज शिकलकर, उपाध्यक्ष नुसरत करपुडे, चांदभाई शेख आणि संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष समाधान खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे मदतकार्य यशस्वी झाले.