गेल्या तीन ते चार वर्षांपासून महाराष्ट्रातील बहुतांश महानगरपालिकांचा कारभार पूर्णपणे प्रशासकीय राजवटीखाली सुरू होता. यामुळे शहरी भागातील निर्णय प्रक्रियेत लोकप्रतिनिधींचा कोणताही प्रत्यक्ष सहभाग उरला नव्हता. पालिकांची सर्व सूत्रे प्रशासन आणि पर्यायाने आयुक्तांच्या हाती एकवटली होती. त्यानंतर महाराष्ट्रभरतील महानगरपालिकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान पार पडले आणि १६ जानेवारी रोजी निकाल जाहीर झाला आहे.
राज्यातील ३६ जिल्ह्यांमधील एकूण २९ महानगरपालिकांसाठी ही निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली. या निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांच्या कामगिरीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. यात मालेगावसारख्या महत्त्वाच्या मुस्लिमबहुल शहराचा समावेश आहे. मालेगाव महानगरपालिकेच्या ८४ प्रभागांसाठीही चुरशीची लढत झाली. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांमध्ये झालेल्या फुटीनंतरची ही पहिलीच मोठी निवडणूक असल्याने, बदललेली राजकीय समीकरणे आणि पक्षांची ताकद या दृष्टीने ही लढत विशेष गाजली.
‘इस्लाम’ने पहिल्याच लढतीत दाखवली ताकद
मागील वर्षी ऐन विधानसभा निवडणुकांच्या काळात माजी आमदार आसिफ शेख यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून बाहेर पडत 'इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेंब्ली ऑफ महाराष्ट्र' (ISLAM - इस्लाम) या नव्या राजकीय पक्षाची स्थापना केली होती. त्यावेळी या पक्षाला अनेक स्तरातून टीकांना सामोरे जावे लागले होते. यावर ‘आवाज-द-व्हॉईस मराठी’ने माजी आमदार आसिफ शेख यांच्याशीसंवाद साधून सविस्तर आढावा घेतला होता.
महानगरपालिकांच्या निवडणुकीत मात्र या पक्षाने आपले अस्तित्व दाखवून दिले आहे. आपल्या पहिल्याच लढतीत या इस्लाम पक्षाने काँग्रेसची अनेक वर्षांची सत्ता संपुष्टात आणली आहे. या निवडणुकीत इस्लाम पक्षाने तब्बल ३५ जागा जिंकत ऐतिहासिक यश मिळवले आहे, मात्र बहुमतासाठी लागणाऱ्या ४३ जागांवरून ते थोडक्यात हुकले.

मालेगाव महानगरपालिकेवर वर्चस्व स्थापन केल्यानंतर माजी आमदार आसिफ शेख यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले की, “आमच्यावर विश्वास दाखवल्याबद्दल सर्वात आधी मी मतदारांचे आभार मानतो. महानगरपालिकेत आमचा महापौर निवडून आल्यानंतर आम्ही नक्कीच मालेगावचा विकास मोठ्या प्रमाणात करू.”
मालेगाव महानगरपालिकेची निवडणूक पूर्व व पश्चिम अशा दोन विभागांत झाली. पूर्व भागात मौलाना मुफ्ती व आसिफ शेख या आजी माजी आमदारांमध्ये अस्तित्वाची लढाई होती. अन्सारी मते आपल्याकडे खेचण्यासाठी शेख यांनी त्यांच्या इस्लाम पक्षाबरोबर शान ए हिंद निहाल अहमद यांच्या समाजवादी पक्षाशी युती केली. 'सेक्युलर फ्रंट'चा हा प्रयोग खूपच यशस्वी झाला.
इस्लाम पक्षाने ३५ तर समाजवादी पक्षाने ६ जागा जिंकल्या. ८४ सदस्यीय सभागृहात बहुमतासाठी त्यांना केवळ दोन सदस्यांची गरज आहे. 'ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन'ने (AIMIM) वैयक्तिक टीका टिप्पणीच्या प्रचाराला मतदारांनी नाकारत मालेगाव विकासाचे व्हिजन मांडणाऱ्या इस्लाम पक्षाच्या पारड्यात मतांचे भरभरून दान टाकले.

दुसरीकडे, असदुद्दीन ओवेसी यांच्या AIMIM पक्षाने २१ जागा जिंकत दुसरा सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे. गेल्या निवडणुकीत त्यांच्याकडे केवळ ७ जागा होत्या, त्यामुळे त्यांची ताकद वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेनेही चांगली कामगिरी करत १८ जागांवर विजय मिळवला. गेल्या टर्मच्या तुलनेत शिवसेनेला ६ जागा जास्त मिळाल्या आहेत.
स्वबळाचा नारा देणाऱ्या भाजपला मतदारांनी नाकारले आहे. पक्षाला दोनच जागा जिंकता आल्या. काँग्रेसला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले. जवळपास डझनभर पक्षांना खातेही उघडता आले नाही. कॅम्प संगमेश्वरच्या पश्चिम भागात अखेरच्या क्षणी भाजपने स्वबळाचा नारा देत मंत्री दादा भुसे यांच्या शिवसेनेला आव्हान दिले होते.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रचार सभा, मंत्री गिरीश महाजन यांची भाजपचा महापौर होण्याची गर्जना, १५ ते १७ जागा जिंकण्याचा नेत्यांना आत्मविश्वास, भुसे व त्यांच्या समर्थकांवर टीका टिप्पणी असे सर्व प्रयोग फेल गेले. याउलट प्रचारसभांमधून विकासावरच भर दिल्याने पश्चिम भागातील पाच प्रभागातील २० पैकी १८ जागांवर विजय मिळवत भुसेंचाच करिश्मा कायम असल्याचे दाखवून दिले.
या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसला मात्र जबर धक्का बसला आहे. भाजपची सदस्यसंख्या घटून ती केवळ २ जागांवर आली आहे. तर मालेगावात एकेकाळी निर्विवाद वर्चस्व असलेल्या काँग्रेसला या वेळी फक्त ३ जागांवर समाधान मानावे लागले आहे. विशेष म्हणजे, काँग्रेसला मिळालेल्या या तीन जागांपैकी दोन जागा काँग्रेसचे शहराध्यक्ष एजाज बेग आणि त्यांच्या पत्नीने जिंकल्या आहेत.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -