पहलगाम हल्ला : कॅमेऱ्याचा खरेदीदार शोधण्यासाठी एनआयएचे चीनला 'रोगेटरी लेटर'

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 1 h ago
NIA seeks China assistance to trace GoPro camera used in Pahalgam attack
NIA seeks China assistance to trace GoPro camera used in Pahalgam attack

 

नवी दिल्ली

२२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाममधील बैसरन कुरणात झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या तपासात आता एक मोठे 'चायना कनेक्शन' समोर आले आहे. या हल्ल्याचा कट आणि दहशतवाद्यांच्या हालचालींची माहिती मिळवण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) आता चीनच्या न्यायव्यवस्थेकडे अधिकृतपणे मदत मागितली आहे. दहशतवाद्यांनी या हल्ल्यादरम्यान वापरलेला 'गोप्रो हिरो १२ ब्लॅक' (GoPro Hero 12 Black) कॅमेरा चीनमधून आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

एनआयएने या संदर्भात जम्मू येथील विशेष न्यायालयात एक अर्ज दाखल केला होता. या अर्जाला मंजुरी मिळाल्यानंतर आता चीनच्या सक्षम न्यायिक प्राधिकरणाला 'लेटर रोगेटरी' (Letter Rogatory - LR) म्हणजेच माहिती मिळवण्यासाठीचे अधिकृत न्यायालयीन विनंती पत्र जारी केले जाणार आहे. या पत्राच्या माध्यमातून एनआयए या कॅमेऱ्याचा खरेदीदार, त्याचा वापरकर्ता आणि संबंधित तांत्रिक नोंदींची माहिती मिळवणार आहे.

नेदरलँड्समधील कंपनीकडून मिळाला सुगावा

तपासादरम्यान एनआयएने या कॅमेऱ्याच्या निर्मितीबाबत माहिती मिळवण्यासाठी नेदरलँड्समधील 'गोप्रो बी.व्ही.' (GoPro B.V.) या कंपनीशी संपर्क साधला होता. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हा विशिष्ट कॅमेरा चीनमधील 'एई ग्रुप इंटरनॅशनल लिमिटेड' (AE Group International Limited) या वितरकाला पुरवण्यात आला होता. धक्कादायक बाब म्हणजे, हा कॅमेरा ३० जानेवारी २०२४ रोजी चीनमधील डोंगगुआन या औद्योगिक शहरात सक्रिय (Activate) करण्यात आला होता.

रेकी आणि हालचाली टिपण्यासाठी वापर

तपासात असे समोर आले आहे की, दहशतवाद्यांनी या कॅमेऱ्याचा वापर हल्ल्यापूर्वीची रेकी, त्यांच्या हालचाली आणि ऑपरेशनल तयारी टिपण्यासाठी केला होता. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार करताना या बॉडी कॅमेऱ्याच्या मदतीने चित्रिकरण केल्याचे प्रत्यक्षदर्शींनीही सांगितले होते. त्यामुळे या कॅमेऱ्याचा मूळ मालक कोण होता, हे शोधणे तपासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.

पहलगाममधील या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता, ज्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला होता. भारताने या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) राबवले होते. या हल्ल्याचा मास्टरमाइंड सुलेमान शाह आणि त्याचे दोन साथीदार जुलै २०२५ मध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत मारले गेले होते. मात्र, या मोठ्या कटाचे धागेदोरे पूर्णपणे उघड करण्यासाठी एनआयए आता आंतरराष्ट्रीय स्तरावर तपास करत आहे.