महाराष्ट्रात CBSE दहावीचा निकाल ९६.६६ टक्के; यंदाही मारली मुलींनी बाजी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

महाराष्ट्र राज्यातील केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी (CBSE) संलग्न शाळांनी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या दहावीच्या परीक्षेत ९६.६६ टक्के निकालाची नोंद केली आहे. नवी दिल्लीस्थित मंडळाने बुधवारी जाहीर केलेल्या निकालानुसार, मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९७.३५ टक्के तर मुलांचे प्रमाण ९६.०१ टक्के राहिले आहे. परीक्षेस बसलेल्या एकूण १,३४,०८३ विद्यार्थ्यांपैकी १,२८,९३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

ठाण्यातील इंडो स्कॉट ग्लोबल स्कूल आणि ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी सुरभी रानडे मुंबई आणि एमएमआर क्षेत्रात अव्वल ठरली आहे. तिला ९९.२ टक्के गुण मिळाले आहेत. "मी माझ्या सर्व शिक्षकांचे मनापासून आभार मानते. त्यांच्या विश्वासामुळेच मला हे यश मिळवता आले," अशी भावना सुरभीने व्यक्त केली. तिला भविष्यात जेईई (JEE) परीक्षा देऊन अभियंता व्हायचे आहे.

कांदिवली येथील रायन इंटरनॅशनल स्कूलचा धवल सावंत ९९.०४ टक्के गुणांसह आघाडीच्या गुणवंतांमध्ये आहे. धवल म्हणाला, "प्रश्नपत्रिका अधिक क्षमतेवर आधारित होत्या. यासाठी मी ऑनलाइन संसाधने आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाची मदत घेतली. नेहमी सकारात्मक राहिल्यामुळे मला अभ्यासात खूप मदत झाली." धवलला इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगमध्ये करिअर करायचे आहे.

पनवेलच्या सेंट जोसेफ हायस्कूलमधील गर्व सोनी याने ९९ टक्के गुण मिळवले आहेत. "हिंदीसारख्या ज्या विषयांत मला कमी रस होता, त्यावर मी जास्त लक्ष केंद्रित केले. शेवटी मला त्या विषयात १०० पैकी १०० गुण मिळाले," असे गर्वने सांगितले. त्याला एआय (AI) इंजिनिअर बनायचे असून तो आता जेईई मेन आणि ॲडव्हान्सची तयारी करत आहे.

पाठांतराऐवजी क्षमतेवर आधारित शिक्षणाकडे वळल्यानंतर लागलेल्या या निकालावर 'आर एन पोदार स्कूल'च्या संचालिका-प्राचार्या अवनीता बीर यांनी समाधान व्यक्त केले आहे. त्या म्हणाल्या, "एकूणच सर्व भाषांमध्ये मुलांची कामगिरी उत्कृष्ट राहिली. इंग्रजी विषयात १९ तर फ्रेंचमध्ये ९ विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. गणिताचा निकाल थोडा निराशाजनक लागला. एका कठीण पाच गुणांच्या प्रश्नामुळे विद्यार्थ्यांचे गुण कमी झाले." 

बीर पुढे म्हणाल्या, "विशेष गरजा असलेले आणि शिकण्यात अडचणी असलेल्या विद्यार्थ्यांसमोर अनेक आव्हाने असूनही आमच्या शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे." या शाळेचा अंशुमन दास ९९.४ टक्के गुणांसह अव्वल ठरला आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सीबीएसई शाळांचा निकाल ९२.८९ टक्के लागला आहे. मुलुंडच्या मिठागर शाळेतील आर्या लामणे ९७.८ टक्के गुणांसह महापालिका शाळांमध्ये पहिली आली आहे. मुंबईत महापालिकेच्या एकूण ११ सीबीएसई शाळा आहेत. इतर यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये सौरभ यादव (९७.२ टक्के - पूनम नगर शाळा), कौस्तुभ त्रिपाठी (९७ टक्के - राजावाडी शाळा), आर्यन मायेकर (९६.६ टक्के) आणि श्रेया सिंग (९६.४ टक्के - पूनम नगर शाळा) तसेच माही सोळंकी (९६.२ टक्के - मिठागर शाळा) यांचा समावेश आहे.