भारतीय क्रिकेट संघ या वर्षाच्या अखेरीस न्यूझीलंडच्या प्रदीर्घ दौऱ्यावर जाणार आहे. २२ ऑक्टोबर ते १ डिसेंबर या काळात होणाऱ्या या दौऱ्यात दोन्ही देशांदरम्यान तब्बल १० मर्यादित षटकांचे (व्हाईट बॉल) सामने खेळवले जाणार आहेत. न्यूझीलंडच्या क्रिकेट इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी द्विपक्षीय मालिका ठरणार आहे.
या दौऱ्यात भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध ५ टी-२०, ५ एकदिवसीय (वनडे) आणि २ कसोटी सामने खेळणार आहे. दोन्ही देशांमधील क्रीडा संबंधांना १०० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा ४० दिवसांचा दौरा अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक मानला जात आहे.
या ऐतिहासिक दौऱ्याची सुरुवात २२ ऑक्टोबर रोजी क्राईस्टचर्च येथे पहिल्या टी-२० सामन्याने होईल. टी-२० मालिकेनंतर एकदिवसीय सामन्यांना सुरुवात होईल, ज्यातील पहिला सामना ४ नोव्हेंबर रोजी ऑकलंडमधील इडन पार्क येथे खेळवला जाईल. त्यानंतर दोन्ही देशांमधील कसोटी मालिकेला सुरुवात होईल. पहिली कसोटी १९ ते २३ नोव्हेंबर दरम्यान वेलिंग्टन येथे, तर दुसरी आणि अंतिम कसोटी २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या काळात क्राईस्टचर्चच्या हॅगले ओव्हल मैदानावर खेळवली जाईल.
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचे व्यावसायिक मुख्य अधिकारी ग्लेन क्रिचली यांनी सांगितले की, जेव्हा क्रिकेटचा विषय येतो, तेव्हा भारतापेक्षा मोठे काहीही असू शकत नाही. हा केवळ मैदानातील सामना नसून दोन्ही देशांमधील संस्कृती आणि मैत्रीचा उत्सव असेल. विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
कसोटी मालिका आणि १०० वर्षांचे क्रीडा संबंध
भारतीय संघ २०१९-२० च्या हंगामानंतर पहिल्यांदाच न्यूझीलंडमध्ये कसोटी मालिका खेळण्यासाठी जाणार आहे. यापूर्वी न्यूझीलंडच्या संघाने भारताचा दोनदा दौरा केला होता, ज्यामध्ये त्यांनी २०२४-२५ मधील कसोटी मालिकेत भारताचा ३-० असा पराभव केला होता. दोन्ही देशांमधील क्रीडा संबंधांच्या शताब्दी वर्षानिमित्त न्यूझीलंड सरकार देखील या दौऱ्याला विशेष सहकार्य करत आहे.
मूळचा भारतीय असलेला न्यूझीलंडचा फिरकीपटू ईश सोढी या दौऱ्याबद्दल कमालीचा उत्सुक आहे. लुधियाना येथे जन्मलेला सोढी अवघ्या ४ वर्षांचा असताना कुटुंबासह न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाला होता. तो म्हणाला की, भारतासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध खेळणे नेहमीच आव्हानात्मक असते. मला माझ्या भारतीय वारशाचा सार्थ अभिमान आहे आणि माझ्याच मायभूमीच्या संघाविरुद्ध मायदेशात खेळणे हा एक वेगळाच अनुभव असेल.
भारत विरुद्ध न्यूझीलंड संपूर्ण वेळापत्रक
टी-२० मालिका :
पहिली टी-२० – २२ ऑक्टोबर, क्राईस्टचर्च
दुसरी टी-२० – २४ ऑक्टोबर, क्राईस्टचर्च
तिसरी टी-२० – २७ ऑक्टोबर, वेलिंग्टन
चौथी टी-२० – ३० ऑक्टोबर, ऑकलंड
पाचवी टी-२० – १ नोव्हेंबर, हॅमिल्टन
एकदिवसीय (वनडे) मालिका :
पहिली वनडे – ४ नोव्हेंबर, ऑकलंड
दुसरी वनडे – ७ नोव्हेंबर, वेलिंग्टन
तिसरी वनडे – १० नोव्हेंबर, हॅमिल्टन
चौथी वनडे – १३ नोव्हेंबर, माऊंट माउंगानुई
पाचवी वनडे – १५ नोव्हेंबर, माऊंट माउंगानुई
कसोटी मालिका :
पहिली कसोटी – १९ ते २३ नोव्हेंबर, वेलिंग्टन
दुसरी कसोटी – २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर, क्राईस्टचर्च