न्यू यॉर्क
फुटबॉल विश्वचषकाचा अंतिम महामुकाबला निश्चित झाला असून, रविवारी ईस्ट रदरफोर्ड, न्यू जर्सी येथे अर्जेंटिना आणि स्पेन हे दोन बलाढ्य संघ खिताबासाठी आमनेसामने येणार आहेत. लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिना आणि लॅमिन यामलचा स्पेन यांच्यातील हा सामना फुटबॉल विश्वातील 'वर्तमान विरुद्ध भविष्य' असा मानला जात आहे.
अर्जेंटिना आणि स्पेन हे सध्या फिफा रँकिंगमधील पहिले दोन संघ आहेत, त्यामुळे हा सामना अत्यंत चुरशीचा होणार असल्याचे स्पष्ट आहे. अर्जेंटिना या स्पर्धेत सर्वाधिक १९ गोल करणारा संघ ठरला आहे, तर स्पेनने आतापर्यंत केवळ एक गोल खाल्ला असून, त्यांची बचाव फळी अभेद्य राहिली आहे.
अर्जेंटिना चौथ्यांदा विश्वविजेतेपदासाठी मैदानात उतरणार आहे. १९५८ आणि १९६२ नंतर सलग दोनदा विश्वचषक जिंकणारा संघ बनण्याचे अर्जेंटिनाचे ध्येय आहे. दुसरीकडे, २०१० नंतर दुसऱ्यांदा विजेतेपदावर नाव कोरण्यासाठी स्पेन उत्सुक आहे. स्पेनने सध्या सलग ३७ सामन्यांत अपराजित राहण्याचा पराक्रम केला असून, त्यांचा शेवटचा पराभव मार्च २०२४ मध्ये कोलंबियाकडून झाला होता.
या सामन्याचे आणखी एक आकर्षण म्हणजे लिओनेल मेस्सी आणि लॅमिन यामल यांची भेट. २००७ मध्ये मेस्सीने युनिसेफच्या एका कार्यक्रमात यामलसोबत फोटो काढला होता, त्यावेळी यामल अवघा बाळ होता. आज त्याच दोन खेळाडूंमध्ये विश्वचषकाच्या फायनलमध्ये सामना रंगणार आहे. एकीकडे मेस्सीचा आक्रमक खेळ आणि दुसरीकडे स्पेनची भक्कम बचाव फळी, यामुळे फुटबॉल प्रेमींसाठी हा सामना एक मोठी मेजवानी ठरणार आहे.