मुंबई
बॉलीवूडचा कल्ट क्लासिक आणि तरुणाईचा फेव्हरेट असलेला 'दिल चाहता है' (Dil Chahta Hai) हा चित्रपट रिलीज होऊन २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुंबईत एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रँड सेलिब्रेशनमध्ये चित्रपटाची संपूर्ण टीम एकत्र आल्याने चाहत्यांना एक वेगळीच नॉस्टॅल्जियाची लाट अनुभवता आली. २००१ मध्ये रिलीज झालेला हा चित्रपट फरहान अख्तरच्या दिग्दर्शकीय कारकिर्दीतील पहिलाच चित्रपट होता.
मुंबईत झालेल्या या विशेष कार्यक्रमात आमिर खान आणि सैफ अली खान यांनी दिग्दर्शक फरहान अख्तर, डिंपल कापडिया, सोनाली कुलकर्णी आणि निर्माता रितेश सिधवानी यांच्यासह हजेरी लावली. सोशल मीडियावर या सोहळ्याचे अनेक व्हिडिओ आणि फोटो समोर आले असून चाहत्यांनी या पुनर्भेटेवर भरभरून प्रेम केले आहे. मात्र, चित्रपटातील मुख्य त्रिकूट पूर्ण करणारा अभिनेता अक्षय खन्ना या सोहळ्यात अनुपस्थित राहिल्याने चाहत्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात असून सोशल मीडियावर याचीच चर्चा रंगली आहे.
आकाश, समीर आणि सिद या तीन मित्रांच्या मैत्री, प्रेम आणि प्रौढावस्थेतील प्रवासावर भाष्य करणारा हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर भारतीय सिनेमाचे समीकरणच बदलून टाकले होते. प्रीती झिंटा, डिंपल कापडिया आणि सोनाली कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. पंचवीशी पूर्ण झाल्यानंतरही या चित्रपटाची जादू प्रेक्षकांवर कायम टिकून आहे.