सुपरस्टार्सच्या बॉडीगार्ड्सना कोट्यवधींचा पगार? शाहरुख खानच्या सुरक्षा प्रमुखांनी केला उलगडा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

बॉलिवूडमधील बड्या सुपरस्टार्सच्या सुरक्षा पथकातील सदस्यांच्या मानधनाबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा आणि शाहरुख खानचा सुरक्षारक्षक रवी सिंह यांना कोट्यवधी रुपये पगार मिळत असल्याच्या अफवा वारंवार पसरत असतात. आता शाहरुखच्या माजी सुरक्षा प्रमुखांनी या चर्चांवर मौन सोडत बॉडीगार्ड्सच्या वास्तविक मासिक पगाराचा खुलासा केला आहे.

शाहरुखच्या माजी सुरक्षा प्रमुखांचा खुलासा
नुकतेच शाहरुखचे माजी सुरक्षा प्रमुख यासीन खान हिंदी रशने शेअर केलेल्या एका पॉडकास्टमध्ये सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी सुपरस्टार्सच्या सुरक्षा पथकांना मिळणाऱ्या अव्वाच्या सव्वा पगाराच्या बातम्यांवर भाष्य केले.

बहुतेक बॉडीगार्ड्सना ठराविक मासिक पगार दिला जातो, असे त्यांनी स्पष्ट केले. काही जणांना चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अतिरिक्त लाभ मिळत असले, तरी असे फायदे सर्वांसाठी नसतात.

सोशल मीडियावर फिरणारे आकडे आणि प्रत्यक्ष पगार यामध्ये मोठी तफावत असल्याचे यासीन यांनी सांगितले. त्यांच्या मते, अनुभवी सुरक्षा रक्षकांना त्यांच्या कामाचे स्वरूप आणि अनुभवानुसार साधारणपणे महिन्याला एक लाख रुपयांच्या आसपास पगार मिळतो. 

ते म्हणाले, "मला वाटतं सोशल मीडिया चुकीचा संदेश पसरवत आहे. लोक वर्षाला दोन ते अडीच कोटी रुपये कमावतात, असं मुळीच नाही. जर कोणी मोठ्या स्टारचा बॉडीगार्ड असेल, तर त्यांना ठराविक पगार असतो. त्याशिवाय जेव्हा एखाद्या चित्रपटाची निर्मिती होते, तेव्हा वेगळा करार केला जातो. निर्मात्यावर अवलंबून त्या चित्रपटासाठी त्यांना ठराविक रक्कम दिली जाते."

मोठ्या आकड्यांचे वास्तव
शेरा आणि रवी सिंह यांच्यासारख्या प्रसिद्ध नावांचा उल्लेख करताना त्यांनी ऑनलाइन शेअर केल्या जाणाऱ्या मोठ्या आकड्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "मला नाही वाटत की त्यांना वर्षाला इतकी मोठी रक्कम मिळते. जर एखाद्या सेलिब्रिटीने परस्पर सामंजस्याने त्यांना वैयक्तिकरित्या जास्तीचे पैसे दिले तर ती गोष्ट वेगळी आहे. पण पगार इतके जास्त नसतात. दरमहा दहा लाख रुपये कोण देतं?" असा सवाल त्यांनी केला.

या संभाषणादरम्यान त्यांनी एक महत्त्वाची माहिती दिली. पूर्वी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान निर्मात्यांकडून बॉडीगार्ड्सना मोबदला दिला जात नसे. शाहरुखसोबत काम सुरू केल्यावर आपल्याला अधिक मोबदला मिळायला हवा, असे त्यांना वाटले. त्यानंतर त्यांनी योग्य मानधनासाठी निर्मात्यांकडे मागणी केली. त्यांच्या या प्रयत्नांमुळे पुढे संपूर्ण चित्रपट उद्योगात बदल झाला.

यासीन यांनी २००१ ते २०११ या काळात दहा वर्षे शाहरुख आणि त्यांच्या कुटुंबासाठी काम केले. शाहरुखसोबत एक दशक काम केल्यानंतर यासीन यांनी स्वतःची कंपनी सुरू केली. २०१५ मध्ये त्यांनी मुंबईत एक सुरक्षा संस्था स्थापन केली. त्यांची कंपनी आता व्हीआयपी सुरक्षा आणि कार्यक्रमांचे व्यवस्थापन पाहते. त्यांनी विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांच्यासारख्या दिग्गजांसोबतही काम केले आहे.


Latest News