Suman Kalyanpur Passes Away: पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांचे ८९ व्या वर्षी निधन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 Months ago
ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर
ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर

 

ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचे रविवारी संध्याकाळी ८९ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीत विश्वातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला असून, महाराष्ट्रभरातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त केला आहे.

संगीतातील 'सुमन' हरपले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त करताना म्हटले की, "सुमन कल्याणपूर यांच्या निधनाने भारतीय संगीताचा वारसा सहा दशकांहून अधिक काळ समृद्ध करणारा एक दैवी आवाज आपण गमावला आहे." त्यांनी सुरुवातीला चित्रकलेचे धडे गिरवले होते, मात्र संगीत हेच त्यांचे खरे जीवन ठरले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली वाहताना सांगितले की, "सुमन कल्याणपूर यांच्या जाण्याने संगीतातील 'सुमन' (फूल) कोमेजले आहे. त्यांच्या भावपूर्ण आणि गोड आवाजाने अनेक मराठी, हिंदी आणि इतर भाषांतील गाणी अजरामर केली. त्यांनी आपल्या कठोर परिश्रमातून संगीत विश्वात अढळ स्थान निर्माण केले."

सुवर्णयुगाचा अंत - शरद पवार

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले. "सुमन कल्याणपूर यांचे जाणे हा भारतीय शास्त्रीय आणि सुगम संगीतातील एका सुवर्णयुगाचा अंत आहे. त्यांचा गोड आणि भावस्पर्शी आवाज अनेक पिढ्यांच्या कायम स्मरणात राहील," असे पवार म्हणाले. त्यांनी हिंदी, मराठी, बंगाली आणि ओडिया यांसारख्या अनेक भाषांमध्ये गायन करून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. भारतीय संगीतातील या अमूल्य योगदानाबद्दल त्यांना 'पद्मभूषण' पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.

अखेरच्या क्षणी ऐकत होत्या स्वतःचीच गाणी

'सुमन सुगंध' या त्यांच्या चरित्रग्रंथाच्या लेखिका मंगला खाडिलकर यांनी पीटीआयला सांगितले की, रविवारी रात्री आठच्या सुमारास लोखंडवाला येथील राहत्या घरी त्यांनी अत्यंत शांतपणे अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्या स्वतःचीच गाणी ऐकत होत्या. 'आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे', 'ना ना करते प्यार तुम्ही से' आणि 'तुमने पुकारा और हम चले आये' यांसारख्या अनेक गाजलेल्या गाण्यांमधून त्यांचा आवाज रसिक श्रोत्यांच्या मनात कायम जिवंत राहील.