अदिबा अनम : महाराष्ट्रातली पहिली मुस्लिम आयएएस महिला

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 3 h ago
अदिबा अनम
अदिबा अनम

 

भक्ती चाळक

२०२४ च्या युपीएससीच्या परीक्षेत १४२ वा रँक मिळवून अदिबा अनम महाराष्ट्रातल्या पहिल्या मुस्लिम आयएएस महिला झाल्या. ‘आवाज-द-व्हॉईस’च्या ‘परवाज’ या लेखमालेत आज आपण याच अदिबा अनम अशफाक अहमद शेख यांच्याविषयी जाणून घेऊया…

एप्रिल २०२५ मध्ये माध्यमांवर प्रसारित झालेल्या एका बातमीने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले होते. त्यादिवशी एक इतिहास घडला. यूपीएससी २०२४ चा अंतिम निकाल जाहीर झाला अन् महाराष्ट्राला आपली पहिली मुस्लीम महिला आयएएस मिळाली. यवतमाळमधल्या छोट्याशा गावातील सर्वसामान्य मुस्लिम रिक्षाचालकाची लेक अधिकारी झाली होती. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि अवघ्या महाराष्ट्रात आनंदाची लाट उसळली. 

 
अदिबा अनम या मूळच्या महाराष्ट्रातल्या यवतमाळ जिल्ह्यातल्या. यवतमाळ हे शहर शेतकरी आत्महत्या आणि आर्थिक अडचणींसाठी ओळखलं जातं. अदिबा यांचे वडील अशफाक अहमद शेख हे व्यवसायाने ऑटो रिक्षा चालक तर, आई गृहिणी. त्यांना दोन लहान भाऊ आहेत.  या कुटुंबाची घरची परिस्थिती तशी बेताचीच.

आर्थिक संघर्षावर मात करत अदिबा अधिकारी झाल्या. तहाट मानेने त्यांचे वडील अशफाक हे अभिमान व्यक्त करतात. ते म्हणतात, “सुबह रोशन है, शाम रोशन है.. जिंदगी का निजाम रोशन है, लोग बेटों पे नाज करते है, मेरा बेटी से नाम रोशन है… मी कधीही मुलगा किंवा मुलगी भेद केला नाही. माझी लेक लहानपणापासूनच प्रतिभावान होती. तिचा हा गुण मी तेव्हाच जाणला होता. त्यामुळं तिला चांगलं शिक्षण देण्याचं मी ठरवलं होतं. त्यासाठी मी परिस्थितीशीही लढलो.”

ते पुढे म्हणतात, “अदिबाचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. आम्हाला सर्वांनाच मानसिक त्रास सहन करावा लागला. समाजातून टोमणे ऐकायला मिळत होते, पण मी हे सगळं कानाडोळा केलं. तिच्या शिक्षणावर याचा परिणाम होऊ दिला नाही. तिला शिकवून अधिकारी करायचं एवढंच आमच्या डोक्यात होतं.”

अदिबा यांचं प्राथमिक शिक्षण जफनगर जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेत झालं. त्यानंतर यवतमाळमधील सरकारी संस्थेतून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलं. शालेय जीवनापासूनच त्या अभ्यासात हुशार होत्या. विशेषतः गणित विषयावर त्यांची मोठी पकड होती. १० वी आणि १२ वीच्या बोर्ड परीक्षेत त्यांनी घवघवीत यश मिळवले. पुढील शिक्षणासाठी त्या पुण्यात आल्या आणि तिथल्या आझम कॅम्पसमधून त्यांनी गणितात पदवी घेतली.  
 

पदवीचे शिक्षण सुरू असतानाच अदिबा यांच्या मनात प्रशासकीय सेवेबद्दल कुतूहल निर्माण झाले होते. चौथ्या प्रयत्नात त्यांनी संपूर्ण भारतात १४२ वा क्रमांक मिळवून हे यश संपादन केलं. “जर आपल्याला समाजात काही बदल घडवायचा असेल किंवा लोकांच्या समस्या सोडवायच्या असतील, तर प्रशासकीय सेवा हे एक उत्तम माध्यम आहे,” ही जाणीव त्यांना त्याच काळात झाली.

अदिबा यांच्या वडिलांना काही कारणांमुळे त्यांचं शिक्षण पूर्ण करता आलं नव्हतं. पण आपण जे भोगलं, ते आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नये, हा त्यांचा ठाम निश्चय होता. अदिबा यांच्या कुटुंबात शिक्षणाला नेहमीच प्राधान्य होतं.  प्रतिकूल परिस्थितीतही अदिबा यांच्या वडिलांनी आपल्या लेकीच्या स्वप्नांना कधीही गरिबीची झळ सोसू दिली नाही.

अदिबा भावूक होत सांगतात की, “माझ्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हालाखीची असताना देखील माझ्या आई-वडिलांनी मला शिक्षण सोडायला लावलं नाही. मला कितीतरी लोक नोकरी करण्याचा सल्ला द्यायचे. माझ्या आजूबाजूची कितीतरी मुलं-मुली शिक्षण सोडून किंवा शिकता शिकता नोकरी करायचीही. पण  माझ्या आई-वडिलांनी माझ्याकडे नोकरीचा आग्रह कधीही धरला नाही.”

पदवी पूर्ण करण्यासाठी अदिबा पुण्यात आल्या होत्या. छोट्या शहरातून मोठ्या शहरात येऊन राहणं, एकटीने जगणं सोपं नव्हतं. सुरुवातीला त्यांना बरीच धडपड करावी लागली. जेवणखाण, रहाणं, येणं-जाणं सगळं आपलं पण बघायचं. घरापासून लांब रहायचं, त्यात अभ्यासाचं ओझं. 
 

अशा कठीण परिस्थितीत त्यांचं कुटुंब त्यांच्यासोबत खंबीरपणे उभं होतं, त्यांना आधार आणि आत्मविश्वास देत होतं. “आपण एका पितृसत्ताक समाजात राहतो. परंतु माझ्या घरच्यांनी  मुलगा-मुलगी असा भेदभाव कधीही केला नाही, त्यांनी मलाही माझ्या दोन्ही भावांप्रमाणेच लाडात वाढवलं. उलट त्यांनी मला नेहमी मोठी स्वप्नं पाहायला आणि ती जिद्दीने पूर्ण करायला शिकवलं”. 

या प्रवासात अपयशही आलं. स्पर्धा परीक्षेचे पहिले दोन प्रयत्न फोल गेले. एकदा तर मुलाखतीच्या टप्प्यापर्यंत पोचूनही थोडक्यात अंतिम यादी हुकली. पण त्यांनी हार मानली नाही. पुन्हा शून्यातून सुरुवात केली. त्यातही आर्थिक ओझं पेलणं हे मोठं आव्हान होतं. मग त्यांनी दिल्लीतील हज हाऊस आयएएस ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आणि जामिया रेसिडेन्शिअल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला. या संस्थांच्या मार्गदर्शनामुळे आणि स्वतःच्या जिद्दीच्या बळावर त्या पुन्हा उभ्या राहिल्या. 

अदिबा यांनी आयएयस  होण्याच्या प्रवासातला एक प्रसंग सांगितला. मुलाखतीच्या टप्प्यावर उमेदवाराच्या व्यक्तिमत्त्वाची चाचणी घेतली जाते.. मुलाखत पॅनेलने त्यांना त्यांच्या पार्श्वभूमीविषयी आणि महाराष्ट्रातील सामाजिक विषयांवर प्रश्न विचारले. विशेषतः महिला अधिकारी म्हणून त्या काय बदल घडवू इच्छितात, हे त्यांना जाणून घ्यायचं होतं. विचारांची स्पष्टता आणि आत्मविश्वास यामुळे त्यांनी पॅनेलवर आपली छाप पाडली. 

पुढे अदिबा सर्व परीक्षा पास झाल्या आणि आयएयस झाल्या. त्यांच्या या यशामध्ये सातत्य आणि शिस्तबद्ध अभ्यासाचा मोठा वाटा आहे. त्या रोज ८ ते १० तास अभ्यास करायच्या. वर्तमानपत्र वाचणे आणि स्वतःच्या नोट्स काढणे, हा त्यांच्या दिनचर्येचा भागच होता. 

कोणतंही यश मिळवायचं असेल तर सातत्य आणि सहनशीलता गरजेची असल्याचे अदिबा सांगतात. त्या म्हणतात, “ध्येय गाठण्यासाठी चार अटेम्प्ट देणं, ही खरं तर माझ्या सहनशीलतेची परीक्षाच होती. पण प्रत्येकवेळी सहनशीलता दाखवणे योग्य नसते. कारण कधीकधी असे बरेच प्रसंग येतात जेव्हा कुणावर तरी अन्याय होत असतो आपण तो फक्त पहात असतो, अशावेळी मात्र सहनशीलता न दाखवता आवाज उठवला पाहिजे.”

अदिबा यांचं हे यश अल्पसंख्याक समाजातल्या आणि ग्रामीण भागातल्या मुलींसाठी एक आदर्श उदाहरण आहे. आपल्यासारख्याच स्वप्न पाहणाऱ्या मुलींना संदेश देताना त्या म्हणतात, “ग्रामीण भागात शिक्षण घेणाऱ्या माझ्या मैत्रिणींना मला सांगायचंय की, तुमची परिस्थिती कशीही असो, तुमची स्वप्न मोठी ठेवा. शिक्षणापासून कधीही दूर जाऊ नका. समाजात किंवा आजूबाजूला काय चाललं आहे यापेक्षा तुम्ही तुमच्या ध्येयावर किती लक्ष केंद्रित करता, हे महत्त्वाचं आहे. मेहनत करा, सातत्य ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. यश नक्कीच मिळेल.”

शेवटी त्या म्हणतात, “चांद पर पहुंचने की तमन्ना रखोगे तभी सितारों तक पहुंच पाओगे... एखादी गोष्टी साध्य करायची असेल तर नेहमी मोठ स्वप्ने पाहायला शिका. आणि आयुष्यात काहीतरी ध्येय असले पाहिजे. कारण मृत्युनंतर लोकांनी तुम्हाला तुमच्या कर्तबगारी गोष्टीसाठी आठवले पाहिजे.” 

अदिबा आता प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून वंचितांसाठी, विशेषतः मुलींच्या शिक्षणासाठी काम करू इच्छितात. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत एका अति सामान्य कुटुंबातली मुलगीही जिल्हाधिकारी बनू शकते, हे अदिबा यांनी दाखवून दिलं. 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter