निशात हुसैन : सामाजिक क्रांती घडवणाऱ्या राजस्थानच्या पहिल्या महिला काझी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
निशात हुसैन
निशात हुसैन

 

फरहान इस्रायली

जयपूरच्या जोहरी बाजारातील एक साधे छोटेसे कार्यालय हे रोज सकाळी आशेची किरण घेऊन येणाऱ्या महिलांनी गजबजून जाते. काही महिला कौटुंबिक हिंसाचाराने ग्रस्त असतात, तर काही घटस्फोताच्या वादातून, वैवाहिक कलहातून, दुसऱ्या विवाहाच्या समस्येतून किंवा कौटुंबिक भांडणांतून मार्ग शोधत येथे येतात. 

इथे येणाऱ्या अनेक महिलांना आपले नाते आता कधीही जोडले जाणार नाही असेच वाटते. तरीही गेल्या ३२ वर्षांपासून हे छोटेसे कार्यालय  भांडणाऐवजी संवाद घडवण्याचे केंद्र बनले आहे. संघर्षाऐवजी समुपदेशन केले जाते आणि हजारो कुटुंबांना पुन्हा एकदा आनंदी आयुष्याची दुसरी संधी मिळते.

या संपूर्ण कार्यामागे निशात हुसैन या समाजसेविका आणि समुपदेशक आहेत. त्यांनी तीन दशकांहून अधिक काळ महिलांना आधार देण्यासाठी, कौटुंबिक वाद सोडवण्यासाठी आणि लैंगिक समानता व सामाजिक सुधारांसाठी समर्पित केला आहे.
 

जन्मगावातच तोडली बंधने
निशात हुसैन यांचा जन्म राजस्थानमधील करौली जिल्ह्यातील सीताबारी मोहल्ल्यात झाला. तीन हिंदू मंदिरांच्या मध्ये वसलेले त्यांचे एकच मुस्लिम कुटुंब होते. या वातावरणाने त्यांच्या बालपणातच धार्मिक सलोख्याचा पाया घातला. आपल्या बालपणाच्या आठवणी सांगताना त्या नेहमी म्हणतात की, धर्म ही कधीच भेदभावाची भिंत नव्हती. सर्व मुले एकत्र खेळायची आणि शेजारी एका मोठ्या विस्तारित कुटुंबासारखे राहायचे.

मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य नसलेल्या भागात लहानाच्या मोठ्या झालेल्या निशात यांनी सामाजिक रुढी-परंपरांना आपल्या स्वप्नांच्या आड येऊ दिले नाही. करौली जिल्ह्यातून १० वीची परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या त्या पहिल्या मुस्लिम मुलगी ठरल्या. त्यांच्या शाळेतील सुमारे १२-०० विद्यार्थ्यांमध्ये त्या एकमेव मुस्लिम मुलगी होत्या.

करौलीच्या राजघराण्याचे मुख्य शिंपी असलेले त्यांचे वडील नेहमी त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन द्यायचे. यातूनच त्यांच्या पुढील समाजकार्याचा पाया रचला गेला.
 

जयपूर दंगलीतील महत्त्वाचे वळण
पुरोगामी विचारांचे गॅझेटेड अधिकारी मोहम्मद हुसैन यांच्याशी विवाह झाल्यानंतर निशात यांच्या ध्येयाला भक्कम पाठिंबा मिळाला. पतीच्या पाठिंब्यामुळे त्यांनी 'निशात अकादमी' सुरू केली. या शाळेच्या माध्यमातून सुमारे ३५० गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलांना शिक्षण दिले गेले.

१९८९ च्या जयपूर दंगलीदरम्यान त्यांच्या आयुष्याला अत्यंत महत्त्वाचे वळण मिळाले. धार्मिक हिंसाचाराने शाळेला वेढले होते. परंतु स्थानिक रहिवासी आणि पालकांनी एकत्र येत शाळेचे रक्षण केले. ही संस्था कोणत्याही एका धर्माची नसून शिक्षणाचे मंदिर आहे, असा ठाम विश्वास त्यांनी दाखवला. ही शाळा हिंदू किंवा मुस्लिम नसून आपल्या मुलांचे भविष्या घडवणारे केंद्र आहे, असे त्यांनी सांगितले.

निशात यांच्यासाठी हा प्रसंग मानवतेचा एक मोठा धडा ठरला. त्या प्रसंगी मिळालेल्या पाठिंब्याने प्रेरित होऊन त्यांनी आपले पूर्ण आयुष्य सामाजिक सुधारणा आणि महिलांच्या हक्कांसाठी वाहून घेण्याचा निर्णय घेतला.
 

मुस्लिम महिलांसाठी संस्थेची उभारणी
१९९२ मध्ये त्यांनी 'नॅशनल मुस्लिम वूमन वेअरफेअर सोसायटी' या संस्थेची अधिकृत नोंदणी केली. निशात यांच्या मते, संस्थेच्या नावात 'मुस्लिम' हा शब्द जाणीवपूर्वक वापरला होता. मुस्लिम महिला केवळ प्रेक्षक नसून भारताच्या सामाजिक प्रगतीत आणि राष्ट्र उभारणीत सक्रिय भागीदार आहेत, हे दाखवून देणे हा त्यामागचा उद्देश होता. वर्षानुवर्षे या संस्थेने महिलांचे हक्क, शिक्षण, धार्मिक सलोखा आणि सामाजिक जनजागृती या क्षेत्रांत व्यापक काम केले आहे.

अनेक वर्षांपासून निशात हुसैन यांनी तत्काळ तिहेरी तलाक, बालविवाह आणि महिलांवरील भेदभावाविरोधात सक्रिय मोहिमा राबवल्या आहेत. इस्लाम धर्म महिलांना सन्मान आणि हक्क देतो, परंतु अनेक लोक कुराणचा खरा अर्थ समजून घेण्यात अपयशी ठरले आहेत, असे त्या मानतात.

त्यांच्या मते, तत्काळ तिहेरी तलाकवर बंदी घालणारा कायदा हा कुराणमधील न्यायाच्या तत्त्वांचेच प्रतिबिंब आहे. हा कायदा कुराणच्या शिकवणीचा विजय आहे, कोणताही वेगळा विचार नाही, असे त्या सांगतात.

न्यायाच्या कडक अटी पूर्ण केल्याशिवाय कुराण बहुविवाहाला परवानगी देत नाही, असा युक्तिवादही त्या करतात. अनेक पत्नींना समान न्याय देणे जवळपास अशक्य असल्याने एकपत्नीत्व हाच अधिक नैतिक आणि व्यावहारिक मार्ग आहे, यावर त्यांचा विश्वास आहे. पतीने दुसरे लग्न केल्यामुळे मानसिक आणि सामाजिक त्रास सहन केलेल्या महिलांचे दुःख पाहून त्यांचे हे विचार पक्के झाले आहेत.

महिलांसाठीच्या कायदेशीर संरक्षणाची अंमलबजावणी अजूनही कडक होणे गरजेचे आहे, हे त्या मान्य करतात. तरीही तिहेरी तलाक कायद्याने महिलांना कायदेशीर लढा देण्याचे आणि आपल्या हक्कांवर बोलण्याचे बळ दिले आहे, असे त्या मानतात.
 

कुटुंब जोडणारे तीन दशकांचे समुपदेशन
गेल्या ३२ वर्षांपासून निशात यांच्या कार्यालयात दररोज ३ ते ४ कौटुंबिक वादाचे समुपदेशन केले जाते. कौटुंबिक हिंसाचार, वैवाहिक मतभेद, घटस्फोटाची प्रक्रिया, दुसरे लग्न आणि कौटुंबिक भांडणे अशा विविध समस्या येथे येतात.

संवाद आणि तडजोड यावरच त्यांचा भर असतो. संयमी समुपदेशनामुळे वेगळे होण्याचा निर्णय घेऊन आलेल्या अनेक जोडप्यांनी पुन्हा एकत्र संसार सुरू केला आहे. त्यांच्या टीमने गेल्या काही वर्षांत हजारो कुटुंबे तुटण्यापासून वाचवली आहेत. घटस्फोटाची कागदपत्रे घेऊन आलेली अनेक जोडपी मध्यस्थीनंतर आनंदाने घरी परतली आहेत.

त्यांच्या या कार्यामुळे परदेशातूनही लोक मार्गदर्शन आणि समुपदेशनासाठी त्यांच्याकडे येतात. मध्यस्थीसोबतच गरजू महिलांना कायदेशीर मदत, निवारा आणि सामाजिक सहाय्य देण्याचे कामही त्या करतात.

राजस्थानच्या महिला सुरक्षा केंद्राचे नेतृत्व
सध्या निशात या जयपूरमधील महिला पोलीस ठाण्यात (उत्तर) सुरू असलेल्या राजस्थान सरकारच्या 'महिला सुरक्षा केंद्रा'च्या प्रभारी अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. दररोज महिला कौटुंबिक हिंसाचारापासून वैवाहिक वादांपर्यंतच्या तक्रारी घेऊन या केंद्रात येतात.

या कामात त्यांना एक महत्त्वाची गोष्ट जाणवली. महिलांवरील हिंसाचार हा केवळ आर्थिक किंवा शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गापुरता मर्यादित राहिलेला नाही. श्रीमंत कुटुंबे, डॉक्टर, अभियंते आणि राजकीय नेत्यांच्या घरातूनही आता अशा केसेस समोर येत आहेत.

यावरून लिंगाधारित हिंसाचाराचा संबंध शिक्षण किंवा उत्पन्नाशी नसून समाजातील चुकीच्या मानसिकतेशी आहे, हे सिद्ध होते, असे त्या सांगतात.

बालविवाहाविरोधात मोहीम
बालविवाहाविरोधातील मोहिमांमध्येही निशात यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने त्यांनी अनेक अल्पवयीन मुलींचे विवाह रोखण्यास मदत केली आहे. इस्लाममध्ये वधूची मुक्त संमती आवश्यक असून अल्पवयीन मुलींच्या विवाहाला परवानगी नाही, यावर त्या ठाम आहेत.

खाप पंचायती आणि इतर अनधिकृत सामाजिक परिषदांवर त्यांनी टीका केली आहे. अशा पंचायती न्यायाऐवजी केवळ तडजोडीला प्राधान्य देतात, असा त्यांचा आरोप आहे. गुन्हेगारांवर लादलेला आर्थिक दंड केवळ दाखवण्यापुरता न राहता, त्याचा थेट फायदा पीडित महिलांना मिळाला पाहिजे, असे त्या मानतात.

राजस्थानच्या पहिल्या महिला काझींपैकी एक
राजस्थानच्या पहिल्या महिला काझींमध्ये निशात हुसैन यांची गणना होते. या पदासाठी त्यांनी मुंबईतून इस्लामिक कायदेशास्त्र आणि भारतीय संविधानाचा ५ वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्या काळात महिलांनी काझी म्हणून काम करण्याला मोठा विरोध झाला होता. टीकेला न घाबरता त्या आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. पुढे अनेक इस्लामिक विद्वानांनी त्यांच्या कार्याला उघडपणे पाठिंबा दिला.

राजस्थानमध्ये 'भारतीय मुस्लिम महिला आंदोलन'च्या माध्यमातून त्यांनी तत्काळ तिहेरी तलाकविरोधी मोहिमेत सक्रिय भूमिका बजावली. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांना पाठिंबा दिला आणि जनजागृतीचे कार्यक्रम राबवले. पूर्वीच्या तुलनेत आता तत्काळ तिहेरी तलाकच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाली आहे, असा त्यांचा विश्वास आहे.

जनसेवेचा राष्ट्रीय सन्मान
महिला कल्याणातील योगदानाबद्दल निशात यांना राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर सन्मानित करण्यात आले आहे. १ ऑगस्ट २०२५ रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात राष्ट्रीय महिला आयोगाच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. धार्मिक सलोखा आणि महिला हक्कांच्या प्रचारासाठी त्यांना डॉ. आंबेडकर उत्थान परिषद, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, शांतता समित्या आणि अनेक सामाजिक संस्थांकडून पुरस्कार मिळाले आहेत.

पिढ्यानपिढ्या चालणारा समाजसेवेचा वारसा
निशात यांच्या कुटुंबात समाजसेवा हा एक सामायिक विचार बनला आहे. त्यांची मुलगी अंदलीब फातिमा दुबईतील 'इंडियन वूमेन्स असोसिएशन'शी जोडलेली असून रेस्टॉरंट व्यवसायाचे व्यवस्थापनही पाहते.

त्यांचा नातू अब्दुल मुकीत याला युएईमध्ये 'पेपर बॅग बॉय' म्हणून ओळखले जाते. प्लास्टिक पिशव्यांऐवजी कागदी पिशव्या वापरण्याच्या मोहिमेमुळे त्याला मोठी प्रसिद्धी मिळाली. या पर्यावरणाच्या कामासाठी त्याला 'अबू धाबी पुरस्कार' मिळाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची संधीही त्याला मिळाली.

अखंड सेवाभावी मोहीम
वय वाढले तरीही निशात हुसैन जोहरी बाजारातील त्याच लहानशा कार्यालयातून आपले काम अविरतपणे करत आहेत. आजही दर आठवड्याला हजारो महिला न्यायाच्या आशेने त्यांच्याकडे येतात.

त्यांचे तत्त्वज्ञान अगदी साधे आहे: शाश्वत सामाजिक बदल मोठ्या पदांवर अवलंबून नसतो. ज्यांच्या पाठीशी कोणी नाही त्यांच्या पाठीशी उभे राहणे आणि प्रत्येकाला न्याय, सन्मान व सहानुभूती मिळवून देणे, येथूनच खऱ्या बदलाची सुरुवात होते. गेल्या तीन दशकांपासून याच विचाराने त्यांच्या कार्याला दिशा दिली आहे आणि राजस्थानमधील हजारो महिलांचे व कुटुंबांचे आयुष्य बदलून टाकले आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter