आपल्या लेखणीतून प्रेमाच्या आणि जीवनाच्या विविध छटा मांडणारे, आपल्या पिढीतील सर्वात लोकप्रिय उर्दू कवी बशीर बद्र यांचे गुरुवारी भोपाळमध्ये निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. 'उजाले अपनी यादों के हमारे साथ रहने दो', 'दुश्मनी जम कर करो...' यांसारख्या अनेक अजरामर रचना त्यांनी साहित्याला दिल्या आहेत. बद्र हे गेल्या अनेक वर्षांपासून 'डिमेंशिया' (स्मृतीभ्रंश) या आजाराने ग्रस्त होते.
बशीर बद्र यांचे सुपुत्र सय्यद बद्र यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली. बद्र यांच्या निधनाने उर्दू साहित्य विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
सय्यद बद्र यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, "हा माझ्यासाठी, माझ्या आईसाठी आणि त्यांच्या सर्व चाहत्यांसाठी अत्यंत दुःखाचा दिवस आहे. त्यांची कविता म्हणजे प्रेम आणि जीवनाचे सार होते. स्मृती कमकुवत होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी अत्यंत जाणीवपूर्वक सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेतली होती." बद्र गेल्या १० वर्षांपासून कोणत्याही मुशायऱ्यात सहभागी झाले नव्हते, मात्र त्यांच्या शब्दांचा प्रभाव आजही जिवंत आहे.
१९७२ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या शिमला करारादरम्यान बद्र यांनी एक प्रसिद्ध शेर लिहिला होता— 'दुश्मनी जम कर करो लेकिन ये गुंजाइश रहे, जब कभी हम दोस्त हो जायें तो शर्मिंदा ना हों'. २०१८ मध्ये लोकसभेतील एका चर्चेदरम्यान काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी याच शेरचा वापर केला होता. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बद्र यांच्याच 'जी बहुत चाहता है सच बोलें, क्या करें हौंसला नहीं होता' या शेरने त्यांना चोख उत्तर दिले होते. ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी 'एक्स'वर पोस्ट करत, "आपली उर्दू भाषा आज थोडी पोरकी झाली आहे," अशा शब्दांत दुःख व्यक्त केले.
RIP Bashir Badr saab
A beautiful era of Urdu literature has become a cherished memory today.
ये फूल मुझे कोई विरासत में मिले हैं,
तुम ने मिरा काँटों भरा बिस्तर नहीं देखा।
~Bashir Badr
His poetry will continue to inspire generations to come.#BashirBadr #RIP #UrduLiterature pic.twitter.com/7IN3hzbUYT— Shadab Azam (@Azam_Shaddy) May 29, 2026
संघर्षमय जीवन आणि साहित्यातील मोठे योगदान
१५ फेब्रुवारी १९३५ रोजी उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे जन्मलेल्या बद्र यांना उर्दू, पर्शियन, हिंदी आणि इंग्रजी भाषेचे सखोल ज्ञान होते. १९८७ मध्ये मेरठमध्ये उसळलेल्या जातीय दंगलीत त्यांचे घर जाळले गेले, ज्यामध्ये त्यांचे बरेचसे अप्रकाशित साहित्य नष्ट झाले. या मोठ्या धक्क्यानंतर त्यांनी भोपाळमध्ये जाऊन नव्याने आयुष्याला सुरुवात केली. या घटनेमुळे त्यांच्या लेखणीत अधिक खोली आणि वेदना पाहायला मिळाली.
त्यांच्या 'आस' या ६९ गझलांच्या संग्रहाला १९९९ मध्ये 'साहित्य अकादमी' पुरस्काराने गौरवण्यात आले. याशिवाय त्यांना पद्मश्री, यूपी उर्दू अकादमी, बिहार उर्दू अकादमी आणि मीर अकादमी पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले होते. 'इकाई', 'इमेज', 'आहट', 'आमद' यांसारखे त्यांचे अनेक गझल संग्रह प्रसिद्ध आहेत. देवनागरी लिपीतही त्यांचा 'उजाले अपनी यादों के' हा संग्रह प्रकाशित झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter