ख्रिस्तोफर नोलन यांचा 'द ओडिसी' मुंबईत प्रदर्शित; भारतीय प्रेक्षकांच्या उत्साहाचे केले कौतुक

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 12 h ago
मुंबईत 'द ओडिसी' चित्रपटाच्या प्रीमियरसाठी ख्रिस्तोफर नोलन आणि कलाकार उपस्थित
मुंबईत 'द ओडिसी' चित्रपटाच्या प्रीमियरसाठी ख्रिस्तोफर नोलन आणि कलाकार उपस्थित

 

जगप्रसिद्ध ऑस्कर विजेते दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'द ओडिसी' (The Odyssey) याचे मुंबईत शानदार प्रीमियर पार पडले. मुंबईतील पीव्हीआर आयकॉन आयमॅक्स येथे पार पडलेल्या या प्रीमियरला खुद्द ख्रिस्तोफर नोलन, अभिनेता मॅट डॅमन आणि टॉम हॉलंड तसेच निर्मात्या एम्मा थॉमस उपस्थित होते. कोणत्याही ख्रिस्तोफर नोलन चित्रपटाचा भारतात झालेला हा पहिला अधिकृत प्रीमियर ठरला आहे.

भारतीय प्रेक्षकांचे नोलन यांच्याकडून कौतुक
चित्रपटाच्या स्क्रीनिंगनंतर नोलन यांनी उपस्थित प्रेक्षकांशी संवाद साधला. भारतीय प्रेक्षक हे जगातील सर्वात उत्साही आणि जाणकार प्रेक्षक आहेत, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. "अनेक वर्षांपासून मला माझ्या चित्रपटाचे लाँचिंग भारतात करायचे होते आणि आज ही संधी मिळाली," असे नोलन यांनी सांगितले. याआधी त्यांनी 'द डार्क नाईट रायझेस' आणि 'टेनेट'साठी भारतात चित्रीकरण केले असले, तरी अशाप्रकारे एखाद्या चित्रपटाच्या जागतिक प्रमोशनल टूरदरम्यान थेट प्रेक्षकांना संबोधित करण्याची ही पहिलीच वेळ होती.

कलाकारांचा भारतीय चाहत्यांना सलाम
यावेळी चित्रपटातील मुख्य अभिनेता मॅट डॅमन याने प्रेक्षकांच्या प्रतिसादाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तर 'स्पायडर मॅन' फेम टॉम हॉलंड याने भारतीय चाहत्यांचे 'नमस्ते' म्हणून स्वागत केले. "इतक्या प्रेमाने आणि उत्साहाने स्वागत केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भारतात चित्रपटगृहामध्ये जो उत्साह पाहायला मिळतो, तो जगातील इतर कुठेही नसतो," असे टॉम हॉलंड म्हणाला.

'द ओडिसी' हा चित्रपट होमरच्या महाकाव्यावर आधारित असून, राजा ओडिसियसचा ट्रोजन युद्धानंतर घरी परतण्याचा १० वर्षांचा थरारक प्रवास यात मांडण्यात आला आहे. हा संपूर्ण चित्रपट आयमॅक्स कॅमेऱ्याने शूट केला असून तो १७ जुलै रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.